मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
नौकाचरित्र

नौकाचरित्र

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


लोकानुग्रहकारणें, व्रजजनानंदें, जगत्कारणें,
श्रीगोवर्धनधारणें, सुखघनें, पापत्मकोद्धारणें, ।
भक्तत्राणपरायणें, सुचरितें गंभीर, नारायणें
केलीं तें भवहारणेंचि परिसा, श्रोत्रांसि जें पारणें. ॥ १
पुरंध्री गोपांच्या क्वणितवलया त्या चमकती.
गतीनें त्यां हंसी लवभरिहि डोलों न सकती. ।
नगांच्या त्या श्रेणी झळकति सुवेणीवरि तयां.
सदा गोविंदाच्या विचरति सवें ज्या फिरतया. ॥ २
व्रजामाजि मोठा चमत्कार देखा. । जनीं नाणिजे कामकैवल्यलेखा. ।
यशोदासुतें, कोटिकंदर्परूपें, । दुखें दीधलीं गोपिकांला अमूपें. ॥ ३
वेडावल्या हरिगुणीं सुगुणाभिरामा,
रामा, रमाकृति समा, भजती सकामा. ।
कामाचिया विनटल्या जनका प्रकामा. ।
कामांत या विफळ काळ असे रिकामा. ॥ ४
ऐका त्याउपरी अनर्घ टिपरीं हाणीत नानापरी;
गाती त्या कुसरी. जयास दुसरी नाहीं त्रिलोकीं सरी; ।
कृषीं प्रीति बरी; विलोलकबरी त्या नाचती; अंबरीं
तेजाची लहरी, तडिद्द्युतिहरी, देखूनि तुष्टे हरी. ॥ ५
एणीदृशांसि चल वेणीवरी खचित लेणीं तदा मिरवती.
पाणीलता मृदुल, वाणी सुधा मधुर, गाणीं न ते वदवती. ।
घ्राणीं महोज्वल सुपाणी सदा डुलत माणिक्यभा प्रगटल्या.
राणी अशा, शुक पुराणीं जयां स्तवित, रानीं सुखें विनटल्या. ॥ ६
या रिती सरस गात रातल्या. । भानुजातटसमीप पातल्या. ।
भव्य, दिव्य पुलिनें विराजती. । चंद्रिकाद्युति जयांसि लाजती. ॥ ७
घेती कडे घडिघडि गडि योगियांचा,
जो वैद्यनायक जगीं भवरोगियांचा, ।
ज्याच्या पदासि विनयें नमि लोकमाता,
त्यासीं सहास्य वदती व्रजलोकमाता. ॥ ८
त्या खेळती, हेमलसहुकूला, । कृष्णावलोकीं परमानुकूला, ।
तों देखिली नाव नदींत कूला - । पाशीं; तदा दाविति त्या ठकूला. ॥ ९
ब्रह्मादिकांचा ठकडा मुरारी, । अंकीं तया घेउनि सर्व नारी, ।
आल्या चिरें सांवरुनी करानें । संतोषिजे तैं कमलाकरानें. ॥ १०
भक्तांच्या वरदायकासह तरी आल्या जशा पायिका.
मोठ्या थोर बलाय कातरदृशा प्रीती जगन्नायका. ।
पूसे त्या हरि, काय काम सलिलामध्येंच भीदायका ?
भासे, वाहिनि सायकासम चले. सार्‍या तुम्ही बायका. ॥ ११
ऐका मायानदीच्या प्रबळगतिजळीं शक्ति कैंची तराया ?
बाळाला युक्त नोहे कहिं परपुरषावीण हे ऊतराया. ।
अभ्यासज्ञानयोगाविरहित अबला, काम टाकोनि कांहीं.
शौरीगंभीरवाणी परिसुनि, धरिलें चोज तें बायकांहीं. ॥ १२
आकर्णुनी वचन पूर्ण सुवर्णवर्णा
तारुण्यघूर्णमति वर्णिति वर्णावर्णा. ।
हा लाहनांत अति लाहन; थोर, थोरीं.
कीं नेणिजे हरिगुणार्णव थोरथोरीं. ॥ १३
क्रीडल्या वधु मनोरम नावे । ग्रंथ हे जनिम मृषा नमनावे. ।
यादवें प्रगटितां जनलीला । येकदा रस असा उचलीला. ॥ १४
ऐका म्हणे शुक. ‘ तया तरणी तराया
आल्या सतोष तरुणी तरणींत, राया. ।
हा खेळ वो बहु दिसां मनिं सूचला, गे.
नावेंमधें सकळ आजि बसूं चला - गे. ॥ १५
स्कंधावरोनि कटिं खोंविति अंचलातें,
आच्छादुनी पदरिं पीन कुचां चलांतें. ।
एकीं ढिले करुनि बंध बरे निरीचे,
तैं सज्जिती कुसुमहार परोपरींचे. ॥ १६
येकींपुढें येक धजोनि बाळा, । घेवोनि संगें व्रजलोकपाळा, ।
नौकेमधें लौकरि त्या बसाया । येती; अशी अद्भुत देवमाया. ॥ १७
हातीं धरोनि अबलीं, नवलाव देखा,
ते लोटिली तरि जळीं, न करोनि लेखा. ।
तागा तळासि नलगे, तंव अंघ्रिटेंका
घेवोनि, तोडिति जळें, हंसती कितेका. ॥ १८
कर्णींचे नग हालती, उचलती वक्षोजहारावळी,
जंघोरुद्रम तोलतो, अलकभा डोले तदा सांवली, ।
अंदू नूपुर बोलती, वलय ते हातीं झणत्कारिती,
धम्मिल्लांतर मालती गळति, त्या योषा चमत्कारती. ॥ १९
गाताति हुंकृतिरवें कलकंठकंठीं,
जेणें रवें दिवस तो शितिकंठ कंठी. ।
गानध्वनी अमृतनिर्झरसारसाचा,
भोक्ता तया यदुपती, श्रुतिसार, साचा. ॥ २०
“ जय दयाघना, इंदिरावरा, । जय पुरातना, लोकनागरा. ।
जय निरंजना, निर्गुणा हरी. । निरखिं आमुतें, स्वामि, लौकरी. ॥ २१
जो साधुन कासी । देखत या कामाच्या जनकासी. । हां सखये । कंसाचा मारक, वो. । मोहमहासिंधूचा तारक, वो. । हां सखये । तो गानानिशीं दिवशीं । भोगावा बहु नवशीं. । हां सखये । बैसुनियां तनुनावे, । श्रीहरिचे गुण गावे. । श्रीगुरुराज । बांधुनि मज । पाहुनि चोज । चालवी भोज । नावाडी तो तारी. । हां सखये । अंतविणा जळतंतु हा खळासि । तारिति बळवंत नरासि. । आशेच्या घनसुसरी । आंकळुनी नेति दुरी. । हां सखये । गर्वजळें उसळतसे । गगनवरी तळपतसे. । हां सखये । मदलहरी नांवरती । नर आचरी वावरती. । हां सखये । मी चतुरोत्तम, । मी परमाधम, । मी सुखिया, दुखिया, दुखिया, जड. । मीपणमासा खळबळितो, । घोरविषयघांसा तळमळितो. । हां सखये । ममतेची नागिण, हो. । सरितेची जोविण, हो. । हां सखये । ऊठ झडझडोनि सावध हो पथ नीट विचारुनि कांस कशी जरि साट पिसाटपणें धरिशिल तरि लाटबळें दुरी वाहसी. । तरि तारुण्याची गति ऐका. । तरे देह हे नौका. । हां सखये । जोडिलिसे सुलभपणें । आदरिजे हे आपणें. । हां सखये । पांचांचें दळ वाढे । रचुनियां पडिपाडें, । रचिलें, हो, भवतारूं. । जडजीवां हें तारू. । हां सखये । पावविता परपारीं, । दीनांचा कैंवारी, । तो, बाई, भव वारी. । शंखचक्रधर, वो. । दयानिधि रंकजनोद्धर, वो. । परात्पर, कोटिकामतनु, वो. । रमापति,  पंकजलोचन, वो. । तो हा मंदरोद्धर, नंदनंदन, पुरंदरवृंदवंदह, सुंदर, शोभन, पावन, सज्जनभावन, आनंदतनयविभु. ॥
नावेसि नेत यमुनेंत सदानवारी,
गाती विशंक, तरती अनिवार वारी. ।
“ आम्ही बळेंचि तरलों ” म्हणतां स्वभावें,
केलें तदाम कुतुक तेथ महानुभावें. ॥ २२
नौका जुनी, अति पुरातन, भूरी गात्रा,
जीमाजि कोशगृहपंचक पूर्ण मात्रा. ।
वायोबळें चळतसे, न कळेचि कोणा.
ये, जाय ते कसि ? अहा दिसते निमोणा. ॥ २३
सच्छिद्र ते सहज धांवली मध्यधारे
नौका तरंगगुणसंकुलिता त्रिधारे. ।
त्या नेणती सुमति हांवभरीं तरीच्या.
पोटीं उठे उभळ तो मृदुअंतरींच्या. ॥ २४
नावेच्या उदरीं झरे वरि वरे, त्या लक्षिती सुंदरी.
भांबावोनि परोपरी चमकती साशंक शातोदरी. ।
तेव्हां युक्ति बरी, विनोदकुसरी, सांगे हरी. “ आयका.
आशा कुंचकिची त्यजा, मग बुजा नौका तुम्ही बायका. ॥ २५
नागकन्या जशा देहकांचोळिया, । तेंवि काढाचि संदेहकांचोळिया. ।
भीति कैंची श्रुतीसार सांभाळितां ? ” । धीर दे त्यांसि दृक्सार सांभाळिता. ॥ २६
“ सच्छिद्व कुंभासि जशा रितीनें, । कीजे, सख्यांनो, दृढता मतीनें. ” ।
ऐकोनियां गोकुळिंच्या पुरंध्री । त्या कंचुकी दाटिति नांवरंध्रीं. ॥ २७
कृष्णाची परिसोनि युक्ति, विवरीं त्या कंचुकीचे पिळे
रोषें दाटिति; लोट ते न धरती, लोटोनि जाती खिळे. ।
वोघाची उकळी बळें उसळतां, बाळा चळीं कांपती.
लोलाक्षी सकला अतीव विकळा होवोनिया ठाकती. ॥ २८
“ वारी कांहिंच नांवरे. डगमगी राहे कशी नाव, रे ?
गर्भीं भीकर भोंवरे. गमति ते पुष्पीं जसे भोंवरे. ।
भेणें मानस वावरे, यदुवरा, वाटे जिणें वाव, रे.
ये वेळे कसि आंवरे तरि ? हरी, गेला दिसे आव, रे. ॥ २९
कैंचा वोडवला विलास नसता ? कीं सर्व संसारिका
कां आलों निरखूं तटीं शुकशिखीहंसादिकां, सारिका ? ।
कैंची आठवली सरित्तटतरी ? आम्ही जडा बायका.
कैसें आजि चुके महा व्यसन हें, हे द्वारकानायका ? ॥ ३०
नाहीं चिंता गेहदेहादिकांची । तूतें आम्हीं आणुनी बुद्धि काची ।
केली. कृष्णा, केंवि राखों जिवाच्या । जीवा, देवा, तूज गेया शिवाच्या ? ॥ ३१
कां आणिलें, कटकटा ! तुज संकटीं या ?
कीं गोरटी धमकटी त्रिजगन्नटी या. ।
होतासि खेळत घरीं व्रजगोविलासीं
दाटोनि आणुनि तरीप्रति गोंविलासी. ” ॥ ३२
दैन्यें अशा निगदती व्रजगोपकन्या.
धन्या जनीं निगममान्य, हरीअनन्या. ।
युक्ती दुजी प्रगटिली विहगासनानें,
संसारिकांसि भयकृद्भयनाशनानें. ॥ ३३
“ ऐका, गे, अचिरें चिरें सुरुचिरें घ्यावीं, विचारा बरें.
दाटवीं विवरें करें. ” सुखकरें त्या कृष्णवाग्डंबरें ।
त्या नि:संग, कुरंगमंजुनयना, भृंगालका, अंबरें
हातीं घेति. विनोद तो निरखिजे देवें सुवर्णांबरें. ॥ ३४
संगत्यक्त दिगंबरा तरितटीं कोंदाटिती अंबरां,
ज्ञाता मानुनि शंबरारिजनका, संतप्तहेमांबरा. ।
नोहे हे धड शंभराहि वसनीं, भ्रांता वधू, बंभरा
ऐशा, प्रार्थिति दंभरागरहिता त्या येक विश्वंभरा. ॥ ३५
चीरें बिळीं मुरडिताति अपाप साच्या,
पेळा जशा उचटती मग कापसाच्या. ।
पाणी उचंबळत तुंबळ अंबरासी,
ऐसें तरींतुनि उफाळत अंबुराशी, ॥ ३६
नीराधारी, हा निराधार जाला. । थारा सारा वारिधारां बुजाला. ।
चिंताक्रांता सर्व गोपाळकांता । घेती धांवा, लोलनीलालकांता. ॥ ३७
त्या बोलती पुनरपी ललना हरीतें.
“ हा ! हा ! कटा ! कवण संकट हें हरीतें ? ।
पृथ्वी उडो, नभ पडो, परि तूं मुरारी
यावा कडेसि. तुज रक्षु विधी, पुरारी. ” ॥ ३८
ऐशा जों वदती समस्त सुदती, तों मेघमाळांतरीं
नेटें वीज कडाडिली. दचकल्या गोपांगना अंतरीं. ।
वारा चंड झडाडिला, घनरवें वृक्षावळी वांकल्या,
गारावर्ष धडाडिला निबिड तो, दाही दिशा दाटल्या. ॥ ३९
अस्ताद्रीवरि रश्मिराज चढला, ध्वांतौघ हा रूढला,
कावेवेढुनि वारिचारिगण तो नावेसि आरूढला. ।
पूरोत्कर्षहि वर्षवारिसुभरें कल्लोळसा वाढला.
कांतांच्या निजअंतरीं प्रबळ तो चिंतांबुधी गाढला. ॥ ४०
नारी सर्वहि घाबिर्‍या, वळॅंघलें तच्चित वार्‍यावरी.
“ कृष्णातें उचला, धरा. ” म्हणुनियां हाकारिती त्यावरी. ।
येकीयेक पुढें सरोनि हरितें ‘ मी मी ’ म्हणोनी कडे
घेती, पाहति नीलरूप सरिता ते जीकडे तीकडे. ॥ ४१
“ बाई, नदी हे भगिनी यमाची. । काळी तशी भीकर; मात साची. ।
तरंगहस्तें अचळा धराया । उंचावली. आंवरि, कृष्णराया. ” ॥ ४२
जानूपर्यंत पाणी त्वरित जंव चढे, तों कडे चक्रपाणी
पाणिद्वंद्वारविंदें सदृढ बसविला, गाइला जो पुराणीं. ।
वाणी लक्शी पुन्हा तों जल कटिनिकटीं ये; तदा शीतभानू,
भानू, डोले जया, त्या हृदयिं कंवळिला. चित्र तें काय वानूं ? ॥ ४३
जळिं बुडेल हा बाळ धाकला, । युवतिंचा तदा जीव धाकला. ।
प्रथम जाउनी घेतला कडे. । तटिनिच्या भयें चित्त सांकडे. ॥ ४४
चढतिया जळीं मज्ज मातला, । तंव उरस्थळीं कृष्ण सज्जिला. ।
भुजलतायुगें त्या स्तनद्वया - । वरि वरांगना घेति अद्वया. ॥ ४५
सलिल तेथही पातलें जईं । हरिपदा नमूं वेध तानईं. ।
लगबगां तदा स्कंधकंधरीं । उचलिती हरी गोपसुंदरीं. ॥ ४६
वदन जों बुडे त्या पुरें पुरें, । भिजती जोंवरी अंघ्रि. नूपुरें, ।
अहह ! योषिती ऊर्ध्वहस्तकीं । हरि उभारिला स्वस्वमस्तकीं. ॥ ४७
तशा त्या निर्वाणीं सकळ सति गीर्वाणवरदा,
महादीनावाणी स्तविति कलवाणी, शुभरदा. ।
“ जगद्बंधू, अंबूमधुनि, गुणसिंधू, निजकरीं
त्वरें काढीं, देवा ! कवं चरणसेवा झडकरी. ” ॥ ४८
तदा प्रौढा नारी समजुनि हरीचीच करणी,
शिरस्था कृष्णातें विनविति सती त्या प्रकरणीं. ।
“ तुझ्या, कृष्णा, आम्ही सकलहि कृपापात्र ललना.
तरी तारी तारारमनवदनालीककरणा, लोकललना. ॥ ४९
नेणों भूप्रांत पाणी उसळत चढतें ? पार नाहीं विजांला.
वारा वेगें झडाडी, तुटुनि नभ पडे, थोर उत्पात जाला. ।
बारा वाटा मनाच्या. प्रबळ भुललिसे बुद्धि झोला. असारं
मूढाहंकारयोगें निखिलहि घडतें. कांपती लोक सारे. ॥ ५०
मेघीं अंबर वोळलें, तमभरें सर्वत्र झांकोळलें,
कृष्णा, मानस पोळलें, बहुभयें हें धैर्य आंदोळलें, ।
तारूं ऊर्ध्व उफाळिलें, जलचरीं दंष्ट्रोत्करीं चालिलें,
आतां पूर्ण न्यहाळुनी, यदुवरा, तां पाहिजे पाळिलें. ॥ ५१
आत्मारामा, योगमायाधवा, रे, । रक्षीं रक्षीं सर्वथा यादवा, रे. ।
पूर्णानंदा, वेदवेद्या, अपारा, । आम्हां दीनां पाववीं आजि पारा. ” ॥ ५२
“ लावोनि लोचन, धरा हृदयीं मला या.
चिंता न कांहिं मग; कारण ना हलाया. ” ।
घेवोनि हें युवतिहीं निजवाक्य कानीं,
आलिंगिला हरि जसाच शुकादिकांनीं. ॥ ५३
सकळहृदयदेशीं जो प्रभू सज्ज नांदे,
परम सुख निजाचें शीघ्र जो सज्जनां दे, ।
निजहृदयिं हरी तो घेतला वेगळाला.
युवतिंस तनुभावाभास नावे गळाला. ॥ ५४
येकलाच सकळा ललनांचे । श्रीहरी हृदयिं निश्चल नाचे. ।
येक तो परि अनेकपणातें । पावुनि प्रगटवी ऑपणातें. ॥ ५५
अंभोजावरि जेंवि बंभर बसे, वक्षोजकुंभावरी
अंभोदद्युति जृंभला हरि तसा, साक्षात्स्वयंभापरी. ।
जंभारी, विधि, शंभु, कुंभज मुनी स्तंभोनियां अंबरीं,
वर्षांरंभ फुलीं भला विरचिला रंभादिकीं सुंदरीं. ॥ ५६
तों त्या गोपनितंबिनी निरखती श्रीकृष्णवाक्यानुगा.
जालें व्योम निरभ्र; शुभ्र किरणीं अभ्रीं तपे भानु गा. ।
झाला मारुत मंद; मत्स्यमकरी गेल्या प्रवाहासवें;
नौका ते तटिनीतटीं निरखिली. केलें जगद्वासवें. ॥ ५७
तेव्हां सस्मित विस्मिता व्रजवधू नौका अकस्मात ते
तीरीं देखुनि, लेखिले तृण असे उत्पात ते मातते. ।
जालें क्षेम, गुणाभिराम हरिनें गोपांगना तारिल्या.
तद्वस्तुस्तवनीं समस्त सुदती सप्रेम विस्तारल्या. ॥ ५८
आनंदले युवतिवृंद. अरिंदमाला ।
ते अर्पिली कनकचंपककुंदमाला. ।
त्या नंदनंदनपदाप्रति येकभावें
आनंदनंदन कवी नमितो स्वभावें. ॥ ५९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP