मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
श्रीसांबशिवध्यान

श्रीसांबशिवध्यान

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्रीमद्भैरव भूतनाथ, भगवान्भर्गा, भवानीपती,
भोगिंद्राभरणा, भवाभवभयच्छेदा, सुभव्याकृती, ।
भीमा, भर्म गिरीश, भूतिनिलया, भस्मांगरागप्रिया, ।
भालाक्षा, भ्रमनाशका, तुज नमो भक्तार्तिहा, स्वामिया. ॥१
कैलासाचल वंदितों कलिमल ध्वंसावयाकारणें,
जेथें सुंदर कल्पपादपवनें तीं शोभती पावनें. ।
चिंतारत्नशिलामला विलसती त्रैलोक्यचिंताहरा
तेथें मी नमितो स्वभक्तिमनसें न्यग्रोध विश्वेंश्वरा. ॥२
वेदी वेदनुता विचित्र विलसे, वज्रोपलें निर्मिलीं.
वैडूर्यें विमलें विशेष रचिली सोपानमाला भली. ।
वापी दिव्य सुधोपमान सलिलें शोभे जया सन्निधीं,
पद्में फुल्ल सुवर्ण केशरयुतें जीमाजि लक्षावधी. ॥३
द्वारीं पद्मकशंखमुख्य नवहीं म्यां ते निधी वंदिले.
तेथें दिक्पति अष्ट अष्ट ककुभे सन्नद्भ ते पूजिले. ।
गंधर्वादिक सिद्ध किन्नर, तशा त्या अस्परा सुंदरीं,
रंभाउर्वसिमेनकादि करिती गानें महासुस्वरीं. ॥४
जेथें नारदतुंबरादिक उभे, सानंद वीणा करीं;
गाती सुस्वर सामगानसवनें सानंदले अंतरीं. ।
जेथें सिद्ध शुकादि मुक्त वसती व्यासादि सारे ऋषी.
मार्कंदेयकुमारमुख्य नमिले दिव्योघ सन्मानसीं. ॥५
जेथें रावणबाणमुख्य गण ते चंडीश नंदीश ते.
हातीं कांचनदंड तिष्ठति महाद्वारीं सदां धीर ते. ।
पाहें मी प्रमथादि भूतगणही, वेताळ, मात्रावळी.
तेही सायुधवाहनें विलसती म्यां वंदिले त्या स्थळीं. ॥६
श्रीमद्भास्कर दिव्यरूपधर हा रश्मी सहस्त्रें बरा;
जो कां सर्व दिशां प्रकाशित करी दे दृष्टि निद्रातुरा; ।
त्रैमूर्त्यात्मक कर्म कारन विभू सृष्ट्यादि लीला स्रजी;
म्यां भागें नमिला ग्रहाधिप उभा संबद्धहस्तांबुजीं. ॥७
ब्रह्माणीसह बद्धपाणिपुटकें ब्रह्मा, उभा सन्मुखीं,
स्तोत्रें तोषवितो शिवा श्रुतिशिरें वर्णोनि च्यारी मुखीं ।
हंसारूढ कमंडलाक्ष, वटिकासंयुक्त दृष्टांतरें
विज्ञानांबुधि आदिदैवतगणा म्यां वंदिला सादरें. ॥८
लक्ष्मीकांत खगेंद्रवाहन पुढें तिष्ठो सदां सांवळा.
कंदर्पायुतसुंदराकृति दिसे देवेश सर्वांगळा. ।
हस्तीं अंबुज, शंख, चक्र, बरवी कौमोदकी सुंदरी;
कंठीं कौस्तुभरत्न दिव्य मिरवी; म्यां वंदिला श्रीहरी. ॥९
जो साक्षाद्व्टषरूप धर्म विलसे सानंद नंदी पुढें.
जैसा तो स्फटिकाद्रि, उन्नतमहा शृंगें मना आवडे ।
घंटा किंकिणिका गळां विलसती सेव्या पदीं नूपुरें;
दों कर्णीं चवरें विराजति असा म्या वंदिला सादरें. ॥१०
तिष्ठे श्रीगणनाथ कुंजरमुखें, जो विघ्नहर्ता विभू.
सिंदूरारुण अंगराग मिरवे सर्वायुधांसीं प्रभू. ।
भाळीं चंद्रकळा, भुजंगम गळां, जो उंदिरीं शोभला,
भक्ताभीष्ट समस्तही पुरविता चिंतामणी वंदिला. ॥११
साक्षाच्छंकरपुत्र षण्मुख पुढें. माता पिता तोषवी.
बालादित्यसमप्रभाव विलसे लीला स्वयें दाखवी.
सनानी, शिखिराजवाहन, पहा सच्छक्ति शोभे करीं.
क्रौंचारी अभिवंदिता निजहिता चिंतोनियां अंतरीं. ॥१२
श्रीसिंहासन कोटिभास्करकलानाथांपरीं भासतें.
नक्षत्रांसम मौ क्तिकस्रज युतें सन्मडंपें शोभतें. ।
पाहा रत्नवितान हें विलसतेम मंजिष्ठवर्णांबरीं.
तें म्यां वंदियलें. अभीष्ट फल दे भक्तांसि सर्वांपरी, ॥१३
तेथें आसन रत्नकंबळ महाचित्रें विचित्राकृ ती.
पाहा त्यावरि पद्मकोमळदळें दाहा शतें शोभती. ।
वामांकीं गिरिजासमेत निवसे शंभू जगाचा धणी
तो म्यां सादर वंदिला अभय दे भक्तांसि लोकाग्रणी. ॥१४
देवी सुंदर पर्वतेंद्रदुहिता, नामें उमा, शंकरीं,
कामाक्षी, कमलानना, भगवती जे सर्वभूतेश्वरी. ।
नानारत्नविभूषणें विलसलीं दाळिवपुष्पापरी.
झूणा बारिक नेसली कुचतटीं ते कंचुकी साजिरी. ॥१५
माथां नील गुडालकें मिरवती, रोलंब पद्मावरी
मध्यें रल्लुकपंक्ति रम्य विलसे अत्यंत शोभाकरीं ।
तेही सिंदुररेघ सुंदर दिसे संयुक्त मुक्तास्रजें.
भाळीं भांगटिळा विचित्र झळके, साम्यासि येना दुजें; ॥१६
वेणी रम्य विराजली नवमणिश्रेणीगणीं शोभली
जाळी त्यावरि सिंधुसंभव महा सन्मौक्तिकीं निर्माली ।
भाळीं तें सिसफूल, चंद्र मिरवे अर्धें दुखंडापरी.
नक्षत्रासम भोंवतीं विकसलीं मुक्ताफळें साजिरीं. ॥१७
शोभे अष्टमिच्या शशांकसम तें सद्भाळ हें; त्यावरी
साजे हा मृगनाभिबिंदु बरवा पाहा कळंकापरी ।
कामाच्या धनुषाकृती विलसती त्या भोंवया साजिर्‍या
नाराच्यापरि पक्षपंक्ति दिसती अत्यंत या गोजिर्‍या. ॥१८
नीळांभोजसमान नेत्रयुगुलें आधींच होतीं बरीं.
पाहा त्यावरि अंजनें कृत दिसे शोभा अनंतापरी ।
बाणातें गरळेंचि माखुनि जसें त्या मन्मथें ठेविलें
शंभूच्या हृदयारविंददळणा शस्त्रासि या निर्मिलें. ॥१९
पाहें भक्तजनां कृपार्द्र नयनें, कूर्मीं जशी बाळकां,
हे ही त्याचपरी त्रिलोकजननी अंबा जगत्पालका. ।
कारुण्यामृतवृष्टिवर्षण करी या दृष्टिधाराघनीं, ।
लौकानुग्रहकारणी, भगवती, माहेश्वरी, पावनी. ॥२०
आकर्णांत विशाल रम्य दिसती भावे अनेकापरी.
संपूर्णानन चन्द्र त्यावरि दिसे हे चित्र शोभा वरी. ।
सौंदर्यांबुधिमाजि शुक्तिशकलें हें श्रोत्रयुग्में बरीं.
मध्यें मुक्तमणी ययांत दिसती बाळ्या फुलें साजिरीं ॥२१
रत्नाच्या बुगड्या अपुर्व रचिल्या, तें भोकरें सोज्वळें,
हीर चंद्रसमान तें मिरवती ताराकृती केवळें. ।
ताटंकें मणिमंडितें विलसती सद्रत्नकर्णद्वयें
कामाचा रथ वस्त्रपंकज, तया चक्रें तसीं निश्चयें. ॥२२
आहे नासिक कीरतुंडसम हें, कीं नीट चांपेकळी,
किंवा हें तिळपुष्प काय म्हणिजे ? शोभा दिसे आगळी. ।
तेंही केसरयुक्त फार मिरवे त्या ओष्ठबिंबावरी.
मुक्तामाणिकहेममिश्रित दिसे देवेंद्रचापापरी. ॥२३
आधीं ओष्ठ सुसूक्ष्म पल्लव तसे, तांबूल रागें अती
झाले शोण; अतेव हे विलसती बंधूकपुष्पाकृती. ।
मध्यें दाडिमबीजपंक्तिसम तें दंतावळी शोभली;
किंवा मौक्तिकपंक्ति वक्त्रकमळीं उत्पन्न हे जाहली. ॥२४
शोभे हें अतिहास्य मंदवदनीं अंतस्थ मुक्तप्रभा.
साम्यें शुभ्र अतीव हे विलसते अन्योपमा दुर्लभा. ।
माणिक्योत्तम कंदुकासम पहा साजे कपोलाकृती;
किंवा पंचशरें पिधान रचिलें तारुण्यरत्नाप्रती. ॥२५
लावण्यामृतपात्र कीं चुबुक हें; लावण्यपेटी हनू.
मुद्रा गोंधुनि मन्मथें विरचिली ऐसेंचि आम्ही गणूं. ।
किंवा श्रीमुख आरसा, चुबुक हें दांडी तयाची बरी.
पाहावें जरि वाटतें शशिधरा, हस्तें ययातें धरी. ॥२६
वाणी हे पिकनायकाकसमा, माधुर्यता, शोभली.
रेखा कंठगता विचित्र विलसे जे काम त्रिभागें भली; ।
किंवा हे अमृतौषधी शुभलता ग्रीवेसि वेष्टीतसे.
कंदर्पज्वर तप्त शंकर तया सौख्यप्रदा होतसे. ॥२७
बाहू कोमल हेचि नाळ कमळें, पाणीतळें, शोभती.
पांकोळ्यांसम अंगुळी त्रिलसती हस्ताब्जकोशाकृती. ।
चुंबाया नळिनीस चंद्र बहुधा रूपें धरी ज्यापरी,
तैसी हे नखचंद्रपंक्ति उजळी दाही दिशा सुंदरी. ॥२८
केयूरें, वलयें, विचित्र, परिचीं. तें भूषणें शोभती.
रत्नाच्या विविधा परीं विरचिल्या सामुद्रिका ज्यासती ।
आलक्तें अति रंगिलें दिसति ते बाळारुणाचे परीं.
भक्तांचे परि कल्पिताचि उदया हे आणिती सत्वरी. ॥२९
वक्षीं बाळ करींद्रकुंभसमता, वक्षोज हे शोभती;
किंवा हे कनकाचलात्मज भयें इंद्राचिया राहती. ।
ज्यांचें गोपन हे करीं स्वपदरीं झांकोनि अत्यादरें
कैंसें या शरणागता न दह्रिजे ऐशा कृपेच्या भरें; ॥३०
किंवा हे घटकांचनी भरुनियां पीयूष देवाधिपें
आहे ठेवियलें, असेंचि दिसतें पाहा महासाक्षपें. ।
जैं हाळाहळतप्त शंकर घडे, तैं या कुचालिंगनीं
व्हावी शांति म्हणोनि निश्चित असें वाटे कवीच्या मनीं ॥३१
किंवा सूर्यशशांकमंडलयुगें राहूभयें ये स्थळीं ।
आलीं कीं वसतीस काय न कळे राहावया निश्चळीं.
पाहा हो शिवहृत्सरोज विकसे; ज्यातें दिठी देखतां,
किंवा नेत्रचकोर तृप्त घडती नोहे वृथा हे कथा. ॥३२
नाना तें पदकें अमोलमणिचीं मुक्ताफळांच्या स्रजें
केले भूषित कुंकुमाक्त मकरीं पत्रें यया चित्रिजे.
कीं हे मन्मथसंगरीं रणधरे जाणोनि धाता यया
ठेवी साच पुढें, करोनि बरवें काठिण्य देखोनिया. ॥३३
यातें वेष्टितसे सदा भगवती रत्नाचिये कंचुकीं;
हे तों मन्मथकोश रक्षण किजे ऐशापरी कौतुकीं. ।
या अत्यंत कृशोदरीं त्रिवंळिका, पाहा, कशा शोभती, ।
जैसा रोमलतेसि मंडप दिजे पावावया उन्नती. ॥३४
नाभी हा अति निम्न काय म्हणिजे हें तों सुधावापिका ?
जेव्हां मन्मथभंग होत समरीं येथें घडे जीविका. ।
नोहे हें शिखिकुंड धूम्र उठिला रोमावळीच्या मिसें,
कामी होमिति ये स्थळीं नियत तें हव्यें तसीं मानसें ॥३५
पाहा हा कटि सूक्ष्म फार मिरवे पचास्य मध्यापरी,
किंवा हे तरि विश्वकर्म पुतळी निर्मोनि मुष्टीं धरी; ।
तेव्हां बारिक माज साच घडला मुष्टींत हा मातसे,
नाहीं अन्य कदापि यासि उपमा याची ययाला असे. ॥३६
पाहा स्थूळ नितंब वाटति मला मातंगगंडस्थळें;
येथें सिंहभया लाजोनि असती आंगीं यिच्या निशळें.
रंभास्तंभसमान हे जड कवी ऊरुद्वया मानिती;
हे ऐरावतपोतशुंड, परि हे सन्मार्दवें शोभती. ॥३७
जानू रत्नकरंडमंडित महा साजे पिधानापरी,
देवी सौष्टव तें हरोनि भरिलें भंडार याभीतरीं. ।
जाणो वासवगोपवर्ण रचिल्या सत्कामतूणीरशा.
जंवा शोभति मंगलप्रद जनां, ध्याती सदां सद्यशा. ॥३८
घोटें तों कुरविंद पाटल तसें वर्णें बरें साजती.
टांचा पद्म, पलाश, विद्रुमतशा संध्यारुणा जिंतिती. ।
कूर्मांगाहुनि उच्यता धरिति ते पादांबुजांचे कळे,
श्रीचें हें सुखधाम होउनि कसें लोकत्रयीं शोभलें. ॥३९
साजे हे नखदीप्ति, भक्त हृदयीं तामिश्रसंहारिणी
चित्ताभीष्ट समस्त पूर्ण करुनी सज्ञान दे पावनी ।
लोकानुग्रहकारणींच धरिलीं गात्रें विचित्रें असीं
भावें सज्जन सन्मुनी सुनियमें ध्याती सदा मानसीं. ॥४०
वज्राब्जांकुश ऊर्ध्व रेखसहिते चिन्हें पदीं शोभती
त्रैलोक्येश्वरनायका म्हणुनिया लोकत्रयीं दाविती ।
शंभूचें मन मोहिते पर शिवा सौंदर्य ऐसें धरीं
ईची काय तुला वरील वनिता वर्णावया दूसरी. ॥४१
अंबेचें मुख हें घडोनि जगती पावें महा उन्नती. ।
लक्ष्मी तों वदनारबिंव भुवनीं राहे सदा सुंदरी
आहे दिव्य सुधा करोनि वसती या रम्य वोष्टांतरीं ॥४२
शोभे कार्मुक भोलता घडुनियां हे कामधेनू दिठी
दोर्वल्ली धडलीच कल्पलतिका सद्बांधवाची मिठी ।
यांचा सोदर कंबु घेउनि असे हे दिव्य कंठाकृती
क्षीराब्धीतनुजासि मुख्य वदवी हे साधिली निश्चिती. ॥४३
मातंगी गमनांगिकार करुनी यीच्या पदीं राहती.
रंभा हे ठरयुग्म साच घडवी देखों तदीयाकृती. ।
चिंतारत्नमणी यिच्या पदनखीं पाहा सदां राहिला;
त्याचा दिव्य महाप्रभाव समुहा भक्तीं असें पाहिला. ॥४४
लज्जाकंधर नम्रता धरितसे उच्चै:श्रवा येपरी.
देवी हे तरि पारिजातकुसुमामोदासि देईं धरी ।
संसारामयनाशना घडतसे प्रत्यक्ष धन्वंतरी
अश्रद्धापर दुष्ट कामिकमना मोही सुधेच्यापरी. ॥४५
अज्ञानांधजनर्थ हे धरितसे सत्फाळकूटक्रिया
मृत्यूपासुनि मृत्यू पाववि, करे हे सज्जनांतें दया. ।
हा सद्रत्नसमूह सर्वहि जिच्या आंगींच राहे सुखें
झाली हे शिववल्लभा म्हणुनियां गाती श्रुती हें मुखें. ॥४६
ऐसें सुंदर साहजीक विलसे हें रूप लोकोत्तरीं;
याहीमाजि विशेष भूषणगणीं अत्युन्नतीतें वरी. ।
केयूरें, वलयें, अनेकपरिचीं जांबूनदें, माणिकें,
मुद्रा, हार गळां, सरत्न पदकें संवेष्टिली मौक्तिकें. ॥४७
ऐशी हे हिमशैलजा विलसली जैशी लता कांचनी,
किंवा ही चपलत्व टाकुनि धरी सन्मूर्ति सौदामिनि. ।
श्रीकंठांकमहासनीं मिरवली त्रैलोक्यराजेश्वरी,
ते म्यां सादर वंदिली भवहरा, अंबा, महासुंदरी. ॥४८
आतां शंकर वंदितों सुरतरू, भक्तार्तिसंहारिता,
ज्यातें विष्टितसे सदां भगवती श्रीशैलजा चिल्लता. ।
विश्वाभीष्टफलप्रदानकरणीं उद्युक्त जो सर्वदा,
जो कां दीनजनावनीं विमुखता घेवोंचि नेणे कदां. ॥४९
कर्पूरद्रिसमान गौर विलसे चिन्मात्र दिव्याकृती,
किंवा हा शरदभ्रशुभ्र मिरवे रूपें यया निश्चिती. ।
वामांकीं विलसे जया गिरिसुता नैश्चल्यसौदामिनी,
प्रालेयाचलअंकमंडित जसी सानंद मंदाकिनी. ॥५०
माथां दिव्य जटा सुवर्णरुचिरा या राजती सुंदरा,
बाळादित्यकळा जशा मिरवती मून्द्धीं महामंदरा. ।
तेथें दिव्य शशांकखंड विलसे तें पुंडरीकाकृती,
जें कां शोभवितें मला गमतसे गंगांबुरोवाप्रती. ॥५१
तें विस्तीर्ण कपाल फारचि दिसे, रेखा अनेका धरी;
मध्यें पावकनेत्र तो विलसतो शोभा दिसे साजिरी. ।
क्षीराब्धीलहरींत युक्त दिसतो और्वाग्नि संदीपला;
येणें कामपतंग दुर्धर महा तात्काळ विध्वंसिला. ॥५२
हें आस्यांबुज रम्य: त्या वरि दिसे भृंगावळी देवडी;
भ्रूयुग्में अतिनीळ तें विकसलीं पाहों अम्ही आवडी. ।
हा रातोत्पळपत्रताम्रनयनें भक्तार्तितापा हरी,
कारुन्यामृतवृष्ठि पूर्ण अपुल्या अंत:प्रसादें करी. ॥५३
शोभे सुंदर नासिका तिळसुमा जिंतोनियां नेटकी,
किंवा तें शुकतुंड नीट म्हणती त्यातें प्रभावें ठकी. ।
विश्वोत्पत्तिक सूत्र काय धरिलें देवें स्वनासा मिसें
हा विश्वस्रज आपुल्याच विभवें सद्रूप हें घेतसे. ॥५४
दोन्ही दिव्य कपोल ते मिरवती आदर्शबिंबापरी
कर्णीं कुंडलि, कुंडलें विलसती, रत्नें अनर्घ्ये शिरीं. ।
ओष्टीं पल्ल्वराग पूर्ण दिसतो संपक्क तुंडीफळें,
किंवा विद्रुमखंड हे मिरवती माधुर्यधारागळें. ॥५५
मध्यें कुंदकळ्यांसमान बरवी बारीक दंतावळी
किंवा हीरकपंक्ति रम्य मिरवे सर्वप्रभां आगळी. ।
कंदर्पायुत कोटिचंद्र सगळे वोंवाळिले ज्यावरी
ऐसें सुंदर आस्यपद्म विभुचें अत्यंत शोभा धरी. ॥५६
कंठीं नीळमणीसमान बरवें तें क्ष्वेड साजे जया,
कस्तूरी धरिली विलासविभवें तैसें दिसे स्वामिया. ।
ऐशीं पंचमुखें बरीं विलसती, देवांत पंचास्य हा;
यासाठीं सुर सर्व यासि नमिती, सर्वांहुनी श्रेष्ठ हा. ॥५७
देवांचा विभु, आदिदेव म्हणती, गाती श्रुती सादरें.
श्रीपादांबुजरेणु दिव्य धरिती ते मस्तकीं भास्वरें. ।
दाहा बाहु करींद्रशुंडसमता आजानु ते शोभती.
भक्ताभीष्ट समग्र पूर्ण करिती कल्पागशाखास्थिती. ॥५८
घंटा, पट्टिश, शूल, सन्मृग, करीं डौरासि एकें धरी,
दों हस्तें वरदाभयासि विवरी, खट्वांगही आदरी. ।
एकें बाण, पिनाक सज्जुनि धरी, तें खङ्ग साजे करीं,
ऐसे हे दश हस्त सायुध वरी म्यां ध्याइंजे अंतरीं. ॥५९
जें अत्यंत विशाळ वक्ष विलसे नक्षत्रलोकापरी,
जे कां दानवदैत्यशस्त्रकिण ते शोभा उडूंची बरी. ।
दीजे या उदरासि एक उपमा अश्वत्थपर्णी जरी
ते तोंही न; म्हणोनि लज्जित घडे माझी तदां वैखरी. ॥६०
त्रैलोक्याश्रय कुक्षि विस्तृत तया अन्योपमो ते नसे,
देती सत्कविराज भाविक बळें चित्तास माने तसें. ।
नाभी हा अति खोल फार दिसतो पाताळलोकापरी,
तेथें कुंडलिका निवास करिते ते आदिशेषासरी. ॥६१
त्याचाही तळिंचा जसा दिसतसे श्रीकूर्म, येथें असे
पाहा हा कटिभाग उन्नति तसा लोकांसि दावीतसे. ।
शोभा स्फटिक खांब साम्य धरिती ऊरूयुगें सुंदरीं,
जें पृष्ठीवरि आदरेंचि धरिजे सानंद नंदीश्वरें. ॥६२
रत्नाच्या मुकुटाकृती मिरवती जंघा बर्‍या गोजिर्‍या,
जें कां शैलसुतांकपीठउपरी संल्लाळिजेल्या बर्‍या. ।
घोंटे माणिकगुच्छ तुच्छ करिती शोभा असी साजिरी,
कूर्मांगा जिणती प्रपाद, उपमा येना ययां दूसरी. ॥६३
भक्तांचे सुखकंद पादकमळें, शाखाकृती अंगुळी,
पुष्पें हें नखपंक्ति शुभ्र विलसे मोक्षादिसिद्धीफळी. ।
छाया शीतळ शांति दे अतिशयें संसारपांथा जनां
विश्रांतीप्रति हेतु जाणुनि किजे अत्यादरें पूजना. ॥६४
हे पादांबुज दीनभाविककुळां तारावया तिष्ठती;
संसारार्णवलंघना प्लव तसे प्रत्यक्ष हे दीसती. ।
हें जे जाणति तत्व, तेच भजती; त्यांतें कळीचीं भयें
बाधूं ना सकती; कृतांतभट ही भीती तया निश्चयें. ॥६५
श्रीनागाभरणें कडीं मणगटीं, ग्रैवेय हारादिकें,
मुंडें अक्षमणी बरे झळकती संमिश्र ते स्फाटिकें. ।
आंगीं शुभ्र विभूतिलेप विलसे, शार्दूलकृत्ती कटीं,
खांदीं सद्गजचर्म रम्य धरिलें, पाहों दिठी धूर्जटी. ॥६६
पाहा काळकळी धरोनि बरवे या तोडरी बांधिले
दासातें भय काय यावारि असे ? प्रत्यक्ष म्यां देखिले. ।
हा मृत्युंजय मृत्युनाशन करी. ध्यातां यया मानसीं
बाधूं नाच सके कदापि सुजना माया महाराक्षसी. ॥६७
याचें हें यश सर्व देव कथिती; गाती पुराणें किती;
सारे हे मुनिवृंद हेंच वदती; ब्रह्मादिही वर्णिती; ।
पापी देखत देखतांचि तरती, जे चिंतिती एकदां;
संसारार्णव लंघिती, न फिरती; आश्चर्य नोहे कदां ? ॥६८
ऐसा म्यां शिव धूर्जटी निरखिला; सानंद म्या ध्यायिला;
कायावाचिक मानसीक समुदा सद्भाव त्या अर्पिला; ।
केलें स्तोत्र यथामती पशुपती चिंतोनियां अंतरीं;
माझे चोविस पाश तोडुनि कृपासिंधू धरो या करीं. ॥६९
जो कां निर्गुण, निष्प्रपंच, निगमीं निर्धारिला ज्यापरी,
ध्याती दिव्य निरंजनाख्य समुद्र ज्योतिस्वरूपी तरी. ।
आहे साच; परंतु हें धरितसे सद्रूप दीना जनां. ।
तारावें म्हणवोनि. सत्करुण हा ध्यायीं सदां तूं मना. ॥७०
याला योग्य उमा समान विभवें; या योग्य काशी पुरी;
नंदीही तरि योग्य वाहन यया; चंद्रावतंसा धरी; ।
दोघे पुत्र ययासि योग्य असती; शोभे गळां वासुकी;
हे लोकोत्तर संपदा मिरवली; साम्या नये आणखी. ॥७१
कैलासाचल शुभ्र, त्यावरि उभा नंदी बरा पांढरा,
तत्पृष्ठीं गिरिनंदिनीसहित तो देखों विभू साजिरा. ।
गंगा, पन्नंग, अर्धचंद्र ढवळे संपत्ति हे सात्विकी
शैवी वेदविदीं असे स्तवित कीं देखों अम्ही नेटकी. ॥७२
ब्रह्मा, वेद, फणीद्रं वर्णन करूं ज्यातें कदां नेणती,
त्याचें वर्णन अल्पधी करीन मी कोण्या गुणें निश्चिती ? ।
भूमीचे रज मोजवेति, परि ते याच्या गुणां मोजिता
ना झाला पहिला, पुढें तरि नव्हे; वाटे मना तत्त्वता. ॥७३
तो म्यां शंकर वर्णिजे स्वमतिनें, सामर्थ्य कैसें घडे,
तत्रापी कथितों स्वशक्ति जितुकी, सद्भक्तिभावें दृढें. ।
सूर्यातें लघुदीप घेउनि जसें नीरांजनातें किजे,
सिंधूतें चुलकोदकेंचि सहसा अर्ध्यां जसें अर्पिजे. ॥७४
धाता हो, हरि हो, त्रिलोकपति हो, ते दिक्पती होतु कां,
येयीनात कदापि साच सहसा या शंकराच्या तुका. ।
ज्याचें पूजन एकदांचि करितां कैवल्य दे आपुलें
यासाठींच कवी निरंजन सदां चिंतीतसे पाउलें. ॥७५
ज्याला सर्वार्थसिद्धी अभिमत असती, तो पढो स्तोत्र वाचे,
किंवा निष्कामभावें पदयुगभजनीं नित्य लागो शिवाचे. ।
ध्यानीं ध्यावो सदांही सगिरिगिरिसुतापार्षदाम्सेसें सुतांसीं;
शंभू वोळेल त्यातें श्रुतिशिरगत त्या पूर्णबोधामृतासीं. ॥७६
इति श्रीनिरंजनमाधवयोगीविरचित सांबशिवध्यान.

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP