मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
निरंजनमाधव ( बनाजी )

निरंजनमाधव ( बनाजी )

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


ॐ कारात्मक विश्वरूप घटना निर्माण केली स्वयें,
तो त्यामाजि प्रवेशला हरि जसें आकाश भूतान्वयें ।
सूत्रात्मा जडजंगमांत कुसुमीं गंधापरी राहिला,
तो हा श्रीपति नंदगोपतिघरीं रांगे बरा तान्हुला ॥१॥
नंदें खेळविला, सखीं कवळिला, माये स्तनीं लाविला, ।
गोपी चुंबिति सुंदरास्यकमला प्रेमें पदीं न्हाणिला, ।
अंगीं भूषण लेववीत अबला, कोणीं सुखें भोगिला, ।
भावें गोरज पाजिला, व्रजकुळीं हा भोगिती सोहळा. ॥२॥
मोठाले दैत्य गाढे धड सबळ पुढें देखतां देव वेडे, ।
होती सक्रोध, दाढे रगडिति, तंव ते टाकिती स्वर्गवाडे
ते कंसें बैल घोडे करुनि हरि पुढें पाठवीले निवाडें, ।
त्यांतें संग्राम होडे निवटुनि तुकडे थोर केले पवाडे. ॥३॥
भक्तांचे विघ्न वारी, दुरित परिहरी, शोखिली बाळमारी ।
माया दावी मुरारी, अघ बक समरीं मारिले दैत्य भारी, ।
ऐसा हा दानवारी नमित सुरवरीं बाळभावांगिकारी. ॥४॥
गंधर्वादिक सिद्ध गाति बिरुदें तो यादवांच्या कुळीं ।
झाला आनकदुंदुभीसुत, अरी वाढे तुझा गोकुळीं, ।
ऐसा श्रीपति नारदें विनविला तो देव जाणावया, ।
प्रेरी भोजपती वडील चुलता अक्रूर आणावया. ॥५॥
वंशीं मारक जन्मला म्हणुनियां चिंता करी भूपती ।
तेणें दैत्य विदारिले रणमही म्यां प्रेरिले जे क्षितीं;
हा गोवर्धन थोरला उचलिला, तो बाळ कैसा म्हणों ?
जेणें भक्षुनि वोणवा विझविला त्या केविं आम्ही जिणे ? ॥६॥
तेव्हां चापमखासि निर्मुनि करी आज्ञा प्रभू गोकुळा ।
यावें कृष्णहलायुधासह पुरीं पाहावया सोहळा, ।
मार्गीं यादव चालतां म्हणतसे पाहेन तो श्रीपती, ।
ज्याचे पाय अपाय दूर करिती, ब्रह्मेंद्र ज्या वंदिती. ॥७॥
वाणी ही स्तवितां शिणे, निगम तो त्यालागिं नेणें म्हणे; ।
तो देवेश विलोकितां व्रजकुळीं दृष्टी घडो पारणें. ।
देखे भूवरुते अपूर्व हरिच्या पादांबुजाचे ठसे, ।
लोळे त्यांवरि भक्तिनम्र पुरता सुप्रेम ज्या उल्लसे. ॥८॥
सूर्यास्तीं रथ पातला व्रजपुरीं अक्रूर आला घरा, ।
ऐसें जाणुनि भेटती सुरपती हा आमुचा सोयरा, ।
साष्टांग प्रणिपात सांत्वन करी, ब्रह्मेंद्र ज्या वंदितो ।
तेही जाणुनि भाव हृत्कमळिचा भक्तेंद्र या पूजितो. ॥९॥
देवा घेउनि चालिला, व्रजवधू अक्रूर तो निंदिती, ।
देवें दाखविलें स्वरूप यमुनाडोही स्वभक्तांप्रती ।
नेला मोक्षपदासि कंसनृपती चाणूरमल्लासवें, ।
स्थापी राज्यपदीं यदुत्तम पुन्हा मातामहा वैभवें. ॥१०॥
वाहे भर वसुंदह्रा दडपली दैत्येंद्र राजें बळीं ।
गर्वीं कौरव बाण भूसृत जरासंधादि चैद्यावळी ॥
त्या सर्वांसि वधोनि धर्मनृपती संस्थापिला आदरें ।
केला दिग्विजयी महा विजय तो भूभार जेणें हरे ॥११॥
एके सोळा सहस्त्र क्षितिपतितनया भोगिल्या एक वेळा ।
स्वर्गीच्या कौतुकानें सुरवरविटपी आणिला द्वारकेला ॥
केला श्रीवासुदेवें कुरुयदु मथनीं बोध पार्थोद्धवाला ।
ते झाली ज्ञाननौका भवनिधितरणोपाय सद्वैष्णवाला ॥१२॥
श्रीकृष्णाचीं चरित्रें परम शुभकरें ऐकतां दोष जाती ।
स्वच्छंदें प्रेमबंधें हरिजन हरिची सत्कथा नित्य गाती ॥
हृत्पद्मीं ब्रह्मरंध्रीं सुदहरकुहरी लक्षिती वासुदेवा ।
ध्याती त्या पंकजाक्षा नवजलदनिभा अर्पिती भक्तिभावा ॥१३॥
मंत्राचे वर्ण बारा प्रणव प्रथमतो वासुदेवाभिधानी ।
त्यावर्णीं श्लोक बारा रचुनि हरिपदीं अर्पिली रम्य वाणी ॥
कैचें सामर्थ्य मातें परि सकळ कृपा बापलक्ष्मी धरावी ।
प्रार्थी भावें बनाजी कविवर परिसा कीर्ति हे केशवाची ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP