मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
गजमुखचरित्र

गजमुखचरित्र

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


गौरीतनूज, गणनायक, विघ्नहर्ता,
जो दीनरक्षक सदा दनुजप्रहर्ता, ।
आधीं नरास्य, मग जो गजवक्र जाला,
तो चिंतितां परिहरी भवभीतिजाला. ॥ १
पूर्वीं गजासुर तपें करुनी, विवीतें
संतोषवोनि हृदयीं, करुणानिधीतें, ।
त्याच्या वरें सुरनरांसि अवध्य जाला.
पीडी बळें मग जगीं सकळ प्रजांला. ॥ २
जयाचा असे धाक इंद्रादि लेखां, । तया मानवांचा, वदा, काय लेखा ? ।
महीपाल दुर्गीं, अरण्यीं दडाले. । जगीं धर्म सारे जनांचे बुडाले. ॥ ३
चिंताग्रस्त समस्त देव मिळुनी, कैलासपृथ्वीधरा
वेगें येउनि, आदरें विनविती वंदोनि गंगाधरा. ।
“ स्वामी, दुष्ट गजासुर क्षितितळीं राहोनि सर्वांमरां,
या मर्त्यांप्रति पीडितो निशिदिनीं; त्या संहरीं पामरा. ” ॥ ४
परिसुनि सुरवाणी, त्या शिलादात्मजातें
पुरहर तंव बोले, “ शूर भृत्यव्रजातें
झडकरि मिळवीं, गा, आजि युद्धासि जाया.
रिपुसि वधुनि रक्षूं सर्व देवद्विजां या ”. ॥ ५
होतां आज्ञा, नंदी  धाडुनि दूतासि तो महानंदी, ।
आणवि पारिषदांतें.  जाणवि ईशासि, वंदुनि पदांतें. ॥ ६
तैं देवांसि पिनाकी  सांगे, “ सानंद जा तुम्ही नाकीं; ।
राहा. मी वैरीतें  पाववितों आजि अंतकपुरीतें. ” ॥ ७
देउनि निरोप अमरां   उठिला तो ईश जावया समरा. ।
त्या जगदवलंबातें  दे नंदी निजकरावलंबातें. ॥ ८
बाहेरि येतां मग वेदवेद्यें, । भूतीं तदा त्राहटिली सुवाद्यें. ।
देवा तया वंदुनि सर्व सेना । चाले पुढें, जीस सिमा असेना. ॥ ९
सालंकार वृषावरी वळॅंघला तो शत्रुहंता भला.
कोटिरादिविभूषणीं, सुवसनीं अत्यंत पैं शोभला. ? ।
छत्रें पांडुर, चामरें धरुनियां हातीं तया शंकरा
सेवी भाविक भृत्य वृंद, निकटीं ठाकोनि, सौख्याकरा. ॥ १०
तो महेश सितशैलनिभातें । चालवी दडदडा वृषभातें. ।
आजि दैत्य अवघेचि वधावे ’ । यापरी वदत सैन्यहि धांवे. ॥ ११
ऐसा रुद्र ससैन्य दैत्यनगरापाशीं त्वरें पातला.
प्राकारासहि धीरभृत्यनिकरीं वेढा बरा घातला. ।
वार्ता ऐकुनियां गजासुर महाकोपें रथीं बैसुनी,
सेनेसीं सह तो निघे लगबगें युद्धां पुरापासुनी. ॥ १२
तेव्हां दोनि दळें परस्पर बळें तीक्ष्णायुधीं ताडिती.
कोपें हाणुनि वज्रमुष्टि हृदयीं क्षोणीतळीं पाडिती. ।
होतां युद्ध असें मुहुर्तभरि तें दैतेय कीं भागले,
प्राणांतें मुकले, कितेक नगरा धाकें पळों लागले. ॥ १३
येवोनि सन्मुख सकोप गजासुरानें
ईशाप्रति प्रहरिलें हृदयीं शरानें. ।
तो देवही स्वविशिखीं दनुजेश्वरातें
ताडी, नभीं उडवि सारथिच्या शिरातें. ॥ १४
दोघे यापरि जुंझतां रणतटीं, पाहोनि संधि, क्षणें
दैत्याचें शिर अर्धचंद्रविशिखें तैं छेदिलें तीक्षणें. ।
देवीं स्वर्द्रुमपुष्पवृष्टि करुनी, ठाकोनियां अंबरीं,
आनंदें नतिपूर्वक स्तुति भली केली प्रभूची बरी. ॥ १५
दानवकलेवरातें  टाकुनि, देवत्व पावुनि, हरातें ।
वंदुनि, गज तो मानी  बोले, बैसोनि सादर विमानीं. ॥ १६
“ स्वामी, मज माराया  केलें येणें परंतु ताराया ।
तें जालें, जी, दैवें.  आतां मद्वाक्य ऐकिजे देवें. ॥ १७
माझें शिर हें कामा  येइल, ऐसें करीं विजितकामा. ।
पूर्ण करीं तर्षातें.  तेणें पावेन फार हर्षातें. ” ॥ १८
तें शिर घे शिव हातीं  तोषुनि; कौतुक सुरासुर पहाती. ।
तो गज, नमुनि पदातें,  गेला सानंद निर्जरपदातें. ॥ १९
अभिलाष दानवाचा पुरविनि तोषं, समस्त देवांचा, ।
दावुनि चित्र विलासा,  चालियला तो महेश कैलासा. ॥ २०
तेथें हैमवती सखीप्रति वदे,  “ मी नाहतें, सुंदरी.
आणीं तैल सुगंध, पूरुष पहा कोण्ही नसे मंदिरीं. ” ।
ऐसें ऐकुनि वाक्य, ते झडकरी माखी वयस्या भली.
तैं लावी तनुतें हळेदचि कसा; तेणें सती शोभली. ॥ २१
आंगावरील मळ काढुनि पार्वतीनें
केला बरा पुरुषदेह चमत्कृतीनें. ।
प्राणादिकां प्रगटवोनि निजप्रभावें,
स्नेहें तयासि कथिलें मग पुत्रभावें. ॥ २२
“ गेले युद्धासि सारे प्रमथ; तरिच तूं जाउनी द्वारदेशा,
तेथें राहीं, न सोडीं परपुरुषगणा, मानुनी मन्निदेशा. ” ।
मातेची मात ऐशी परिसुनि, मग तो घेउनी दंड हस्तीं,
आला बाह्यांगणातें डुलत, मदभरें जेंवि आरण्य हस्ती. ॥ २३
गृहारामवापीजलामाजि काळी । करी स्नान वीतांशुका. त्याच काळीं ।
महादेव तो पावला मंदिरातें. । निरोधी गणाधीश त्या ईश्वरातें. ॥ २४
रोषावेशें पाहुनी अर्भकातें, । तीक्षें खङ्गें छेदुनी मस्तकातें, ।
येता जाला शीघ्र अंत:पुरातें, । गेले सारे लोकही मंदिरातें. ॥ २५
भार्यतें न विलोकुनी स्वसदनीं, तो तेथुनी येकला
आरामाप्रति येउनी, लगबगें वापीतटीं ठाकला. ।
त्यातें पाहुनि, लाजुनी गिरिसुता तैं त्या जळीं बैसली.
झाला आड कळोनि भाव; मग ते अत्य्म्त उल्हासली. ॥ २६
नेसोनि वस्त्र, मग ते गिरिशोपकंठीं
येवोनियां, विनवि वंदुनि कंबुकंठी ।
“ ऐसा विनोद मज काय तुम्हीं करावा ?
बालापरी कपटाभावहि कां धरावा ? ॥ २७
असो हें. तुतें माझिया बाळकानें । कसें सोडिलें, द्वारसंरक्षकानें ? ।
तनूच्या मळें निर्मिला जो स्वहातें, । दिली शक्तिही ज्यासि रक्षूं गृहातें. ” ॥ २८
“ तेणें फारचि निंदुनि अडविलें मातें, मदें मोहुनी;
तेव्हां म्यां असिनें तयासि वधिलें उन्मत्तशा पाहुनी. ।
येथें मी मग पावलों, गिरिसुते. त्या अर्भका या क्षणीं,
पाहें, जीववितों. जगीं प्रथित तो होईल सल्लक्षणीं. ” ॥ २९
होतें जें गजदैत्यमस्तक तया कंठावरी लावुनी,
हातें स्पर्शुनि तच्छरीर गिरिशें, स्वापत्यसें भावुनी, ।
कारुण्यें अवलोकितां, उठुनि तो तेथें उभा राहिला.
गौरीनें गजवक्र पुत्र बरवा संतोषुनी पाहिला. ॥ ३०
“ केलें विघ्न तुवां बळेंचि मजला, येतां यया मंदिरा;
तूं ‘ विघ्नेश ’ म्हणोनि होतसि जगीं विख्यात, लंबोदरा. ।
जे तूंतें भजतील, तेचि सकळें कर्में बरीं साधिती.
ज्याला भक्ति नसे त्वदर्चनविधीं, विघ्नें तया बाधती. ॥ ३१
ऐसे अनेक वर देउनि नंदनातें,
संतोषवी शिव, तथा गिरजामनातें. ।
भोळा, वदान्य, करुणाकर भक्तलोकां
वीरेश्वरप्रभु सदा सुखवी, विलोका. ॥ ३२

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP