गौरीश, करुणासिंधू, निजभक्तांचा कैवारी, ॥ दुस्तरभवभीति निवारी. ॥ ध्रुवपद ॥
पूर्वीं मृकंडु नामक मुनी ॥ होता, सादर शंकरभजनीं, ॥ पंडित, समर्थ इंद्रियदमनीं, । सात्विक, शुद्ध, ब्रह्मज्ञानी, ॥ यजनादिकषट्कर्मनिरतही, नित्यानित्यपदार्थविवेकी. त्याची भार्या शीलवती, अनुकूल, सुशीला, अतिविमलांगी, कुशला, निर्मल, कुलजा, बाला, वंदुनियां निजपतिपदकमला, जोडुनि करतल, मृदुलवचन. बोले. “ जी, स्वामी, संतानेविण संताप मनीं, चिंता संतत वाढतसे कीं; यास्तव श्रीभगवंताप्रति तुम्हि मागा संतति. ” यापरि विनती. करुनि, शुभमती सती उभी ते सन्मुख असतां, प्रत्युत्तर दे तीस ऋषीश्वर. “ कांते, मात यथाथचि हे; परि दाता ईश्वर. येथें ऑमुची शक्ति न चाले. प्रजेकडुनि तो मनुष्यपूर्ण, प्रसिद्ध ऐसी श्रुति प्रपंचीं; प्रबोधविरहित विप्रगौरव; प्रसूनहीन क्रीडाकानन; प्रतापरहित प्रजेश जैसा; पानीयाविण जशी प्रपा कीं; प्राणाविण हें जेंवि कलेवर; व्यर्थ तसें कुल अपुत्रमंगळ. पाहुनि चंचल जालों व्याकुळ. आतां रक्षिल तो त्रिपुरारी, मनोविहारी, पन्नगहारी, शंभु, शर्व, अविकारी. ॥गौरीश०॥१॥
मृकंडु बोले निजगृहिणीतें. ॥ “ जातों, कांते, आजि तपातें. ॥ राहे सदनीं प्रमुदित चित्तें. ॥ ईश्वर पुरविल मनोरथातें. ” ॥ यापरि विप्र निघाला. सत्वर गंगातटासि आला. रिझला देखुनि वृक्षवल्लिला. ताल, साल, हिंताल, विलोल, प्रवाळ, वंजुळ, नारिकेळ, घननीळ तमाल, प्रियाल, कदली, रसालादि तरु फुलीं, फळीं, म्रुदुदळीं शोभती. वासंती, मालती, शेंवती, मल्लिकादि बहु लता विराजति. जेथें मत्त भ्रमर गुंजती, पंचम स्वरें कोकिल कूजति एणादिक मृगयूथ विचरती, ऐशा विपिनीं शूचिर्भूत मुनि आसन घालुनि, करुनि प्राणायाम, मृडानीरमणध्यानीं. तत्पर होउनि बसतां अकितेक दिवस लोटले. तदुपरि दुश्चर तपें तुष्ट, निजभक्ताभीष्तद, सुरश्रेष्ठ, परमेष्ठी, सन्नुत, सर्वकष्टहर, अष्टमूर्ति, तो वृषारूढ होऊनि प्रगटला. म्हणे, “ मुनिवरा, सांग मनोरथ लौकरि. पुरविन. ” ऐसें ऐकुनि वचन, ब्राह्मण. उघडुनि लोचन पाहे. सुखघन देवा वंदन करुनि तेधवां, अपर्णाधवा, महानुभावा खुणे वळखुनी म्हणे हाचि मज तारी. ॥गौरीश०॥२॥
विनवी मग ऋषि गौरीरमणा. ॥ “ स्वामी, मजवरि करिं, रे, करुणा. ॥ शरणागत मी तुझिया चरणा. ॥ पाहि पाहि मां, दीनोद्धरणा. ॥ तूंचि ब्रह्म सनातन, निर्गुण, होउनि मायोपहित शबल हें नाम वागविसि. बहुत क्षेत्रें कल्पुनि, आपणां क्षेत्रज्ञ असें जगीं म्हणविसी. पूर्णत्वें, पुरिशयनास्तव तुज पुरुष म्हणुनियां गर्जती श्रुती. अघटितघटनापटीयसी तव शक्ति शंकरा. ऐसा तूं चिद्विलासी शिवा. ” - ये रिती स्तुती करुनि, पदिं मिठी घाली प्रेमें. शितिकंठ तदा उठवुनि त्यातें, मोदें भेटुनि, पाठि थापटी. म्हणे धूर्जटी, “ सांगें मनिंची
गोठि, ऋषिवरा. ” तंव तो बोले, “ भक्त तुझा आसक्त नव्हे मीं विषयीं, विरक्त; परंतु आर्या, हृदब्जसूर्या, निर्जरवर्या, भार्या माझी सुत मागतसे. याविण वांछा आन नसे मज. ” ये रिति वचन तयाचें परिसुनि वदे पशुपती. “ षोडशवार्षिक, पंडित, हृदयानंदचंदन, प्रगल्भ अथवा, मूर्ख, दुष्ट सुत; शतायु कुरूप; या दोघांत रुचे जो, तो म्यां दिधला तुजला ” शंभुवाक्य हें पडतां कानीं, मुहूर्तमात्र ध्यान करुनि, मग म्हणे, “ महेशा, गेहिनीमनोभाव विचारुनि येइन लवकरि. ” “ बरें, तसें हो. ” म्हणतां देवें, मनोजवें ऋषिराज निघाला. गृहासि आला, कथी प्रियेला वनीं वर्तली कथा आपुली सारी. ॥गौरीश०॥३॥
परिसें विनती प्राणनाथा. ॥ “ कुपुत्रसंगति जाणिजे वृथा. ॥ धरिल अव्हांटा, त्यजिल सुपंथा; ॥ अकीर्ति येइल ऑमुच्या माथां. ॥ सज्जनसुमनो रंजन नंदन तो हरिचंदन अल्पायु जरी, श्रीशिवभजनें चिरंजीव होइल; हा निश्चय. वंदिन तुमच्या पदारविंदा. जा. सुखकदा, वंदारुजनानंददायका मागा सुंदर, सद्रुणमंदिर पुत्र शाहणा. ” आकर्णुनि तद्वचन तूर्ण तंव पूर्णज्ञानी शर्वाणीरमणामलचरमस्मरण करित ऋषि वना पातला. विनेत्राप्रती नमुनि म्हणे, “ दे, देवा, सुंदर तनय मज भला. ” गीर्वाणप्रभु, “ तथास्तु ” म्हणुनी अदृश्य झाला. पुनरपि विप्र, प्रजाकाम, तो प्रसन्नहृदय, क्षिप्र गृहा येऊनि प्रियेला वृत्त निवेदी. तदुपरि दोघें एकांतीं ऋतुकाळीं तोषें रमतां, शीलवती गर्भातें धरिती झाली. तीतें भर्ता पुसे विनोदें, “ कांतें, सांगें तुझे डोहळे; करिन सोहळे ” हांसुनि लज्जावती सती ते म्हणे “ करा शिवकीर्तन संतत. शिवकथामृत प्राशन करवा. ” तोषुनि तंव तो गृहिणीतें आलिंगी प्रेमें. ये रीती नव मास पूर्ण भरतां, सुमुहूर्तीं पुत्र जाहला बहुत चांगला; शिवें दीधला म्हणुनी. करि ऋषि जातकर्म; मग मार्कंडेय असें द्विजसमंत नामहि ठेवी. बाळ वाढतां, अस्फुटाक्षरें तद्वचनें तें अमृतसमें आवडिनें सेवी. पंचम वर्षीं उपनयन करी. तदनंतर मार्कंडेय मुनी वास करूनी बहु नियमानें सांगवेदपारग तो झाला. षट् शास्त्रें ऑणि सर्व पुराणें पढुनि निपुण सद्गुणीं शोभला. द्विजीं वानिला. जनीं पूजिला. गर्वरहित दृढभावें निशिदिनिं भजे मनीं त्रिपुरारी. ॥गौरीश०॥४॥
देखुनि पितर सुखें तनयाला, ॥ मानिति भूषण निजान्वयाला; ॥ परंतु पंचदशाद्ब वयाला ॥ जाले, उरला येक ययाला; ॥ म्हनुनि दचकती, धैर्य सांडिती, रुदन मांडिती, त्यापुढें बळें दु:ख्ह कोंडिती, धरिल भीति यास्तव हें वृत्त तयासि न सांगति. श्रमतां यापरि कितेक इंगित जाणुनि मार्कडेय पुसे, पितरांप्रति वंदुनि, मजपासुनि सेवेंत उणें पडलें असलीया, क्षमा करावी. बाळ नेणतें लडिवाळपणें करी जरी अपराधकोटिंतें मनिं न धरावें. ” “ ऐसें सविनय वचन परिसुनी, मृकंडु मुनि बोले, “ रे पुत्रा, परमपवित्रा, विमलचरित्रा, कोमलगात्रा, वारिजनेत्रा, तुजपासुनि अपराध कदापि नसे मम वत्सा. त्यजिं विचिकित्सा. स्वच्छहृदय तूं मच्छासनींच वर्तसि, बाळा. ऐकें शोकाचें कारण हें. अपुत्रें मियां दुश्चर तप तें करितां विपिनीं, उमाकलत्र, श्रीदमित्र, तो त्रिनेत्र, शंभू प्रसन्न होउनि, “ अगा मृगंडो, पंडित, षोडशवार्षिक; मूर्ख शतायू; या दोघांत रुचे जो तो देइन. ” म्हणतां, तैं सुंदर, बुधचूडामनि सुत मागितला. तोचि तूं मनीं जाण निश्चयें. मार्कंडेय म्हणे, “ बहु बरवें झालें. जन्मविलें ज्या देवें, तो मज काय उपेक्षिल बापा ? स्वस्थ असें नपवसि परितापा. ” ये रिति जननी तें, जनकातें समजावुनि मुनिनंदन वेगें, विषयविरागें, शुभांतरंगें, स्मरत शिवपदें निघे वना सुविचारी. ॥गौरीश०॥५॥
ऐसा मृकंडुनंदन भला ॥ सदसद्वस्तुवि वेकी, भोळा, ॥ इहामुत्रफळभोगसुखाला ॥ तृणसम लेखुनि, मुमुक्षु जाला. ॥ शम, दम, उपरति, ति, तिक्षा, दृढश्रद्धा, सम्यक् समाधान इत्यादि साधनें संपन्न मुनी, ब्रह्मज्ञाना अधिकारी होऊनि, विचक्षण सद्गुरुचरणा शरण जाउनी, करुना संपादुनि, तद्वाक्यश्रवणेंमनननि दिध्यासें, तो स्वरूपसाक्षात्कारा पावुनि, स्वानुभवें ऋषिराज वदे तैं. ब्रह्मैवाहं. देहप्राणादिक जड दृश्य, विकारी, मायाकार्य, अशाश्वत. हें मी नव्हें कदापि. सदाशिव, साक्षी, चिन्मय, अज, अव्यय, मी. ” ऐसी प्रतीति बाणली तया; तथापि मीतूं पणावीण शिवभक्तिही करी. ऐसा शीलवतीनंदन तो. सकळ तीर्थयात्राही करुनी; कवेरतनयादक्षिणतीरीं, श्वेतारण्यीं असतां तोषें, आयुष्याचा चरम दिवस समजुनी, विवेकें निर्मल तटिनीजळीं नाहुनी, तिल तंदुल, जल, कोमल बिल्वदळें, कल्हारसुबकुलपाटली कुसुमादिक पूजासामग्री संपादुनियां, यथाविधि श्री शिवार्चन करूं बसतां प्रेमें, चंडभानुसुत, दंडधर, तदा प्रचंड दूतां म्हणे. “ शीघ्र जा. मृकंडुतनया. वोढुनि आणा. ” आज्ञा मानुनि अचाट भट ते मार्कंडेया निकट पातले. पाहुनियां शिवमूर्ति परतले. शमनासमीप येउनि म्हणती, “ स्वामी, ऑमुचा यत्न न चाले. ” त्यांतें धि:कारुनि, बहुरोषें लुलायावरी वळॅंघुनि, लवकरि कालमेघनीलच्छवि काळचि आला कोलाहल करित रवें. भालविलोचन भक्त बाळका लक्षुनि जाळें गळां घालुनी; बळें वोढितां, ऋषिश्रेष्ठ शिवपादपल्लवीं मिठी देउनी म्हणे, “ धूर्जटी, इष्टदायका, या संकष्टी धांव, धांव, मज तारीं. ” ॥गौरीश०॥६॥
आकर्णुनि मुनि दीनावाणी, ॥ कळवळुनि मनीं, पिनाकपाणी, ॥ बद्धादर जो नतसंरक्षणिं. ॥ प्रगटे शिवलिंगीं तेचि क्षणिं. ॥ गंगाधर, शतपतंगसुप्रभ, भुजंगभूषण, कुरंगधर, धृतमतंगाजिन, त्रिलोकनाय्हक, सर्वमंगललिंगितांग सुरपुंगव तो अतिरागें वामपदें शमनातें, ताडुनि वक्षस्थळीं, भूतळीं पाडी वेगें. तंव यमकिंकर चळवळ कांपत तळपति दाहि दिशांप्रति धाकें. प्रसन्नवदन, मृडानीवल्लभ, दयानिधी, मुनिवरा भेटुनी, “ दीर्घायुर्भव, दीर्घायुर्भव. ” म्हणे तेधवां. रत्नसानुसा धीर मुनी तो नमुनि शिवपदें, सन्मुख मोदें उभा राहिला. ऐसा शंकर विलास निरखुनि, परमेष्ठीप्रमुखामर सर्वहि जयजयकार करित, अति विनयें प्रणतार्तिहरा प्रणाम करुनी म्हणती, “ स्वामी, तुंवा दीधला वर. “ षोडश वत्सर आयु यया. ” चरम दिवस हा समजुनि शमनें, महादेव, तव सेवा केली. तूं जगदीश, नियंता. ऐसें तुवां केलिया सांगों कवणा ? ” हांसुनि गौरीरमण वदे, “ मद्भजन करिति जे, तयां सज्जनां जननमरणभय लेशहि नाहीं; जाणा निश्चय. ” ये रिति सर्व सुरां समजावुनि; स्वस्थळासि पाठवुनि, स्नेहें मृकंडुतनया अभीष्ट देउनि. अदृश्य झाला, करोनि लीला, महेश, भोळा, नरहरिसुतसुखकारी. । गौरीश, करुनासिंधू, निजभक्तांचा कैवारी, ॥ दुस्तरभवभीति निवारी. ॥७॥