बालकाला जर कोणाची दृष्ट लागली आहे, असें अनुभवाला आलें तर,
’वासुदेवो जगन्नाथ :.......तद्रक्षाभूषितं शिशुम् ॥’
इत्यादि मंत्रानें भस्म मंत्रून तें बालकाच्या मस्तकाला, कपाळाला वगैरे यथाविधि लावून त्याला विभूषित करावें. याच बाबतींत प्रयोगसागरांत जो दुसरा एक प्रकार सांगितला आहे, तो असा :-
’रक्ष रक्ष महादेव नीलग्रीव जटाधर ।
ग्रहैस्तु सहितो रक्ष मुञ्च मुञ्च कुमारकम् ॥’
हा मंत्र भूर्जपत्रावर (पञ्चगन्धानें) लिहून बालकाच्या दंडांत बांधावा. बालक जर फार रडत असेल, तर त्याच्या परिहारार्थ मयूखांत जो मंत्र सांगितला आहे, तो येणेंप्रमाणें :-’सहा कोनांचें यंत्र काढून त्याच्या प्रत्येक कोनांत ’र्हीं हें अक्षर लिहावें. यंत्राच्या मध्यावर मुलाचें नांव लिहावें व
’ॐ लुलुवस्वाहा’
या मंत्राचीं सहा अक्षरें प्रत्येक कोनांत एकेक याप्रमाणें लिहावींत. त्या सहा अक्षरांच्या बाहेरुन येतील अशीं रथचक्रासारखीं दोन वर्तुळें काढावींत व वर्तुळांच्या बाहेर तोंडें केलेले असे (सहा) अर्धचन्द्र (प्रत्येक कोनावर) काढावेत. नंतर त्या यंत्राची पञ्चोपचारें पूजा करुन, तें बालकाच्या हाताला बांधावें. बालग्रहशान्ति, बालग्रहांचीं स्तोत्रें वगैरे शान्तिकमलाकर व शान्तिमयूख या ग्रंथांत पहावींत.