कान टोंचणें- जन्माच्या दहाव्या, बाराव्या किंवा सोळाव्या दिवशीं, सहाव्या सातव्या, आठव्या, दहाव्या, बाराव्या, महिन्यांत किंवा पहिल्या, तिसर्या वगैरे वर्षीं करावें. कनय अथवा पुत्र यांचा कर्णवेध समवर्षीं करुं नये. तिसर्या वगैरे (विषम) वर्षीं करणें झाल्यास त्याबाबतींत चैत्र, कार्तिक, पौष व फाल्गुन हे महिने शुभ होत. जन्माचा महिना निषिद्ध समजावा. भद्रा व विष्णुशयन (चतुर्मास) यांमध्यें कर्णवेध करुं नये. अर्थात् कार्तिकांत जर करणें असेल, तर द्वादशीनंतर करावा. मीनेचा सूर्य असतां चैत्राचा महिना व धनेचा असतां पौष महिना हे वर्ज्य करावेत, असें कांहीं ग्रंथकारांचें मत आहे. द्वितीया, तृतीया, पञ्चमी, षष्ठी, सप्तमी, दशमी, द्वादशी, व त्रयोदशी या तिथि; चन्द्र, बुध, गुरु व शुक्र हे वार; पुष्य, पुनर्वसु, मृग, चित्रा तीन उत्तरा, हस्त, चित्रा, अश्विनी, श्रवण, रेवती व धनिष्ठा, हीं नक्षत्रें--इतकें सर्व कर्णवेधास शुभ होय. विष्णु, रुद्र, ब्रह्मदेव, सूर्य, चन्द्र, अष्टदिक्पाल, अश्विनी कुमार, सरस्वती, गाई, ब्राह्मण व गुरु यांची पूजा करुन, अळित्याच्या रसाची खूण केलेला पुत्राचा उजवा कान आधीं टोंचून मग डावा कान टोंचावा. कन्येचा डावा आधीं टोंचून (मागून उजवा टोंचावा). टोंचण्यास आठ आंगुळें लांबीची सुई घ्यावी. राजपुत्रासाठीं सोन्याची, ब्राह्मण आणि वैश्य यांना रुप्याची व शूद्रांना लोखंडाची अशा सुया घ्याव्या. सूर्यकिरण आरपार जाईल इतका कान टोंचावा. कान न टोंचलेलें (अविन्ध) बालक दृष्टीला पडल्यास पुण्यनाश होतो. येथें कर्णवेधनिर्णय संपला.