विटाळशीपणाचे तीन दिवस झाल्यावर चौथ्या दिवशीं सहा वेळां माती लावून गळ धुवून टाकल्यावर आणि दांत घांसल्यावर संगवकालीं म्हणजे सूर्योदयानंतर सहा घटकांनीं स्नान करावें. सूर्योदयापूर्वी स्नान करणें हा अनाचार आहे. विटाळ जाणें थांबलें असल्यास चौथ्या दिवशीं नवर्याची सेवा करण्यास हरकत नाहीं. देव व पितर यांची कर्में करण्यास पांचव्या दिवशीं शुद्धि होते. रजोदर्शन जर कांहीं दिवस सुरुच राहील, तर रजोनिवृत्ति होईपर्यंत देव व पितर यांच्या कर्मासाठीं शुद्धि नाहीं. रोगामुळें जर सुरु असेल, तर त्याचा निर्णय पूर्वीच सांगितला आहे. दर्शेष्टयादि श्रौतकर्में चौथ्या दिवशीं करण्यास कित्येक ग्रंथकार सांगतात. इतर दिवसांपेक्षां चौथा दिवस जर प्रतिकूल नसेल तर त्याच दिवशीं गर्भाधान व दुष्टरजोदर्शननिमित्त शांति, हीं कर्मे करावींत. मोठेंच जर संक्ट असेल, तर श्रीसूक्ताचा होम व अभिषेक हीं आधीं करुन, नंतर उपनयनादि कर्मेंहि करण्यास चौथ्या दिवसाची हरकत नसल्याचें कोणी ग्रंथकार सांगतात. हा जो चौथ्या दिवशीं कर्मे करण्याचा अधिकार सांगितला, तो विटाळ जाणें जर थांबलें असेल, तरच आहे असें समजावें.