तिथि, वार व नक्षत्रें यांच्या विषघटिका जरी कौस्तुभांत सांगितल्या आहेत, तरी ज्योतिषग्रंथांत नक्षत्रांच्याच विषघटिकांचा विशेष दोष सांगितलेला आहे; म्हणून नक्षत्रांच्या विषघटिकांत जर जन्म झाला, तरच सांगितलेली शान्ति करावी. तिथ्यादिकांच्या ज्या विषघटिका सांगितल्या आहेत, त्यांचा दोष फार थोडा आहे; यास्तव त्यांवर जन्म झाल्यास रुद्राभिषेकादि करावींत. विषघटिकांचें लक्षण कौस्तुभ वगैरे ग्रंथांत पाहावें. ’विषघटिकांत जन्म पावलेलें बालक-पित्याच्या धनाचा व स्वतःचा-विष, शस्त्र, अस्त्र इत्यादिकांनीं नाश करणारें होतें. तद्वतच क्रूर ग्रहानें युक्त असणार्या लग्नावर व लग्नांशांत जन्मलेलें मूलहि हेंच फळ देतें असें जाणावें’ असें वचन आहे. या बाबतींत
’एतद्विषनाडीषु शिशुजननसूचितारिष्ट०’
वगैरे संकल्प करुन, एका कलशावर चार प्रतिमांत--रुद्र, यम अग्नि व मृत्यु--या देवतांचें ’कद्रुद्राय० यमायसोम० अग्निर्मूर्धा० व परंमृत्यो०’ या मंत्रांनीं पूजन करावें. ग्रहांचें अन्वाधान केल्यानन्तर ’रुद्रयमाग्निमृत्यून्समिच्चरुघृततिलाहुतिभिः प्रतिदैवतं प्रतिद्रव्यमष्टोत्तरशतसंख्याभिः
शेषेणत्यादि’
असें अन्वाधान करावें आणि घरांत शिजविलेल्या भाताचा होम करावा.