कन्येचेसुद्धां जातकर्मापासून चौलकर्मापर्यंतचे सर्व संस्कार करावेत, पण ते अमंत्रक करावेत; तिचा विवाह मात्र समंत्रक करावा. कन्येच्या जातकर्मादि संस्कारांचा जर लोप होईल, तर त्या त्या वेळीं अथवा विवाहाच्या वेळीं त्याबद्दलचें प्रायश्चित्त करुन मग तिचा विवाह करावा. जातकर्म, नामकरण वगैरे सर्व संस्करांच्या खर्या वेळीं जर ते ते संस्कार झाले नसले, तर गुरुचा अस्त वगैरे वेळा वर्ज्य करुन शुभ नक्षत्रावर जातकर्मादि संस्कार करावेत. या जातकर्माला-रोहिणी, तीन उत्तरा, अश्विनी, हस्त, पुष्य, अनुराधा, रेवती, मृग, चित्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, स्वाती व पुनर्वसु हीं नक्षत्रें घ्यावींत. रिक्ता म्हणजे चतुर्थी, नवमी व चतुर्दशी या तिथी आणि पौर्णिमा व अमावास्या हीं पर्वें घेऊं नयेत. मंगळवार व शनिवार हे सोडावेत. वैधृति वगैरे योगरहित व ज्या लग्नीं केन्द्र चांगले असेल ती वेळ योग्य होय.