ब्राम्हणांनीं आपल्या सोदर बंधूचा पुत्र मुख्य आहे याकरितां तोच दत्तक घ्यावा. सोदर बंधूचा पुत्र नसेल तर दुसरा कोणीं आपल्या गोत्राचा सपिंड अथवा सापत्न बंधूचा पुत्र घ्यावा. तसाहि न मिळेल तर भिन्न गोत्रांतला पण सपिंड असा मातुलकुलांतला अथवा पित्याची भगिनी इत्यादिकाम्च्या कुलांतला घ्यावा. तसा न मिळेल तर असपिंड पण समान गोत्र घ्यावा. तसाहि न मिळाल्यास असपिंड व भिन्नगोत्राचा घ्यावा. आपल्या गोत्रांतले असून सपिंड अशांपैकीं भगिनीचा पुत्र व कन्येचा पुत्र हे दत्तक घेऊं नयेत. याप्रमाणेंच विरुद्ध संबंध होतो म्हणून पुत्र असें मानण्याला अयोग्य असा मातुलही घेऊं नये आणि तसेंच सगोत्र असून सपिंड यांपैकीं आपला भाऊ किंवा चुलता हे घेऊं नयेत. ब्राह्मण इत्यादि वर्णांनीं आपापल्या वर्णांतलाच दत्तक घ्यावा. त्यामध्यें देखील देशभेदप्रयुक्त गुर्जरत्व, आंध्रत्व इत्यादि भेदांस अनुसरुन समान असेल तोच घ्यावा. कोणताहि दत्तक घ्यावयाचा तो भ्रातृसहित असेल तो घ्यावा. ज्येष्ठ पुत्र दत्तक घेऊं नये व देऊं नये. शूद्रानें कन्येचा पुत्र व बहिणीचा पुत्र हेही दत्तक घेण्यास हरकत नाही. "सोदर बंधूमध्यें जर एकाला पुत्र असेल तर त्याचे योगानें सर्व बंधु पुत्रवान् होतात असें मनूचें वचन आहे. "अपुत्रकाला स्वर्गलोक नाहीं," "जन्मास आलेला ब्राह्मण (देव, ऋषि व पितर यांच्या ) तीन ऋणांनीं युक्त असतो" इत्यादि शास्त्रवचनांनीं सांगितलेला जो अपुत्रत्वप्रयुक्त दोष त्याची निवृत्ति विधिपूर्वक दत्तक न घेतलेल्या सोदर बंधूच्या पुत्रानेंही होते, याकरितां सर्वांमध्यें भ्रात्याचा पुत्र हा दत्तक घेण्याला सर्वांत अधिक योग्य आहे असे जाणावें. कारण मुख्य नसेल तर त्या जागीं त्यासारखा दुसरा योजावा असा न्याय आहे. "विधिपूर्वक न घेतलेल्या" या शब्दांवरुन बंधूचा पुत्र तो आपला पुत्र होतो असें समजूं नये. पुत्र होतो असें समजल्यास औरस, दत्तक इत्यादि जे बारा प्रकारचे पुत्र त्यांप्रमाणेंच या सोदर बंधूच्या पुत्राला द्रव्य, पिंड इत्यादिकांविषयीं स्वतःचा विवाह होण्याच्याही पूर्वी अधिकार प्राप्त होतील; आणि "स्त्री, कन्या, आई, बाप, भ्राता, भ्रातृपुत्र, गोत्रज आणि बांधव" असा पूर्वींच्या अभावीं पुढचा असा क्रम अधिकाराविषयीं सांगितला आहे. त्यांत भातृपुत्राचें नांव भ्रात्याच्या पुढें लिहिलें आहे तें निरर्थक होईल. अर्थांत् स्वतःचा विवाह होण्याच्या अगोदर आपला पिंड, द्रव्य इत्यादिकांविषयीं अधिकारी असावा अशा इच्छेनें भ्रात्याचा पुत्र विधिपूर्वक दत्तक घेतला तरच तो अधिकारी होतो, विधिपूर्वक घेतल्यावांचून होत नाहीं. इच्छा नसेल तर पितरांचें ऋण दूर करणें इत्यादि परलोकसंबंधीं कृत्यांकरितां दत्तक पुत्र घेऊं नये. कारण भ्रात्याच्या पुत्रानें पितृऋणाचें दूरीकरण होतें. असें तात्पर्य जाणावें. कित्येक देशांत वैदिक विधिवांचून दत्तक पुत्र घेणारा व देणारा यांची संमति, राजपुरुष इत्यादिकांची संमति वगैरे लौकिक व्यवहारानें अथवा केवळ मुंज इत्यादि संस्कार केल्यानें सगोत्र व सपिंड असा पुत्र आपला पुत्र असें मानून सर्व व्यवहार चालतो, पण त्याविषयीं प्रमाण मिळत नाहीं. "एका पुरुषाच्या पुष्कळ स्त्रिया असून त्यांपैकीं एका स्त्रीला पुत्र असेल तर त्याचे योगानें सर्व स्त्रिया पुत्रवती होतात असें मनूचें वचन आहे. या वचनानें सवतीचा पुत्र विधिपूर्वक दत्तक घेतला नसेल तथापि त्यालाही पुत्रत्व व पिंड देणें वगैरेचा अधिकार आहे. यावरुन एका सवतीला पुत्र असेल तर दुसरीनें दत्तक घेऊं नये. कन्येचा व बहिणीचा पुत्र हे शूद्रांनीं दत्तक घ्यावे; ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनीं कधींही घेऊं नयेत. एक पुत्र असेल तों दत्तक देऊं नये व घेऊंही नये; तसेंच ज्येष्ठ पुत्र दत्तक देऊं नये व घेऊं नये. यावरुन ज्याला अनेक औरस पुत्र असतील त्यानें दत्तक पुत्र द्यावा असा विधि प्राप्त होतो. तथापि पूर्वीं दत्तक पुत्र आणि नंतर औरस पुत्र झाला या योगानें प्राप्त होणार्या अनेक पुत्रत्वाला हा विधि नाही. पति विद्यमान असतां पत्नीनें पतीच्या आज्ञेनें दत्तक पुत्र घ्यावा व द्यावा. पतीची आज्ञा नसेल तर घेऊं नये. व देऊंही नये. "तूं दत्तक पुत्र घे" असें सांगून पति मृत झाला असेल तर विधवा स्त्रीनें दत्तक घ्यावा. "दत्तक पुत्र घे" असें पतीनें पत्नीला सांगितलें नसतां आप्ताच्या मुखांतून दत्तक पुत्र घेण्याविषयीचा पतीचा अभिप्राय समजल्यास पत्नीनें दत्तक पुत्र घ्यावा असें सर्वसंमत आहे. या दोन्ही प्रकारांपैकीं कोणतीही आज्ञा नसेल तरी, नित्यव्रतें आणि काम्यव्रतें इत्यादि धर्म आचरण करण्याविषयीं जसा अधिकार असतो, त्याप्रमाणेंच "अपुत्राला स्वर्गलोक नांहीं" या सामान्य शास्त्रानेंच दत्तक पुत्र घेण्याला विधवा स्त्रीला अधिकार आहे. "पतीच्या आज्ञेवांचून पत्नीनें दत्तक पुत्र घेऊं नये व देऊं नये" असें जें वसिष्ठाचें वाक्य आहे तें ज्या स्त्रीला पतीची आज्ञा नाही त्या स्त्रीला दत्तक घेणें नसल्यास लागू होतें. स्त्रीनें सर्वथा दत्तक पुत्र घेउं नये असा निषेध दर्शवीत नाहीं. कारण शास्त्रप्राप्त गोष्टीचा निषेध संभवत नाहीं. दत्तक पुत्र घेण्यास योग्य अशा स्त्रीला दत्तक पुत्र घेण्याविषयीं प्रतिबंध करणारा तो वृत्तीचा लोप व पिंडचा विच्छेद करणारा होऊन नरकास पात्र होतो. कारण "ब्राह्मणाच्या वृत्तीला विघ्न करणारा विष्ठा भक्षण करणार्या कृमीमध्यें उत्पन्न होतो" असें वचन आहे. याप्रमाणें कौस्तुभ ग्रंथामध्यें विस्तार सांगितला आहे. स्त्रियांनीं दत्तक पुत्र घेतल्यावर होम वगैरे करणें तो व्रतांदिकांप्रमाणें ब्राह्मणाकडून करवावा. शूद्रांनीं दत्तक घेतल्यास असेंच करावें. शूद्रांपासून दक्षिणा घेऊन जो ब्राह्मण त्याजकरितां होम इत्यादि करतो तो दोषी होऊन पुण्यफल मात्र शूद्रास मिळतें. दत्तक पुत्र घेणारानें त्या पुत्राचे जातकर्म, चौल इत्यादि संस्कार करावे हा मुख्य पक्ष. तसें संभवनीय नसल्यास सगोत्र व सपिंड यांपैकीं मुंज झालेला अथवा विवाह झालेलाही दत्तक पुत्र घ्यावा. दत्तक पुत्र विवाह झालेला घेणें तो पुत्र झालेला घेऊं नये असें मला वाटतें. असपिंड व सगोत्र यांमधील दत्तक घेणें तो मुंज न झालेलाच घ्यावा असेंही वाटतें. भिन्नगोत्रांतील घेणें तो मुंज न झालेलाच घ्यावा. भिन्नगोत्रांतील मुंज झालेलाही दत्तक घ्यावा असें कोणी ग्रंथकार ह्मणतात. याप्रमाणें दत्तक पुत्राविषयीं ग्राह्याग्राह्य विचार सांगितला.