सुतकांत अमन्त्रक प्राणायाम करावा व मार्जनाचे मंत्र मनांत म्हणून मार्जन करावें आणि गायत्रीचा सम्यक् (यथातथ) उच्चार करुन सूर्याला अर्घ्य द्यावें. उपस्थान करुं नये. मार्जनसुद्धां कृताकृत (करणें किंवा न करणें) आहे. सूर्याचें ध्यान करुन, त्याला नमस्कार करावा. गायत्रीजप करुं नये. ’अर्घ्यापर्यंतच मनांत सन्ध्या करावी’ असें वचन आहे, म्हणून मनांतलय मनांतच दहा गायत्रीजप करावा असें कोणी म्हणतात. वैश्वदेव, ब्रह्मयज्ञ वगैरे पंचमहायज्ञ करुं नयेत व वेदाभ्यासहि करुं नये. औपासन (गृह्याग्नि किंवा वैश्वदेव वगैरे), होम व पिण्डपितृयज्ञ --हीं सगोत्राखेरीज इतरांकडून करवावींत. "श्रौतृकर्मासंबंधानें तेवढयापुरती शुद्धि असते’ असें वचन असल्यानें अग्निहोत्र, होम, स्नान व आचमन करुअन तें कर्म स्वतःच करावें असेंही कोणी सांगतात. ’सर्व कर्मांना अशौच हा नियमानेंच अपवाद असल्यानें ब्राह्मणानें आपलीं कर्में दुसर्या ब्राह्मणाकडून करवावींत. ब्राह्मण न मिळाल्यास स्वतःच करावींत’ असेंही दुसरे सांगतात. स्थालीपाक अशौच संपल्यावर करावा, अशौचांत करुं नये. त्याचा जर सर्वस्वीं लोप होत असेल, तर तो ब्राह्मणांकडून करवावा. प्रतिवार्षिक श्राद्ध अशौच (दहाव्या दिवशीं) संपल्यावर अकराव्या दिवशीं करावें, व तसें करणें अशक्य असल्यास व्यतिपातादि पर्वदिवशीं तें करावें. पत्नीच्या विटाळशीपणांतही याप्रमाणेंच पिण्डयज्ञ व दर्शश्राद्ध हीं करावींत. रजोदर्श्न जर अन्वाधानानंतर होईल, तर इष्टि व स्थालीपाक हीं करावींत व (रजोदर्शन जर) पूर्वीं होईल तर कालान्तरानें करावींत. दान देणें घेणें व अध्ययन हीं करुं नयेत. अशौचांत दुसर्याचें अन्न भक्षण करुं नये. पितृयज्ञ, स्थालीपाक, श्रवणाकर्म वगैरे संस्थांचा प्रथामारंभ--दोन्ही प्रकारच्या (सोयर व सुतक) अशौचांत ब्राह्मणाकडूनसुद्धां होणें अशास्त्र आहे. प्रथमारंभानंतरचें श्रवणाकर्म अशौचांत किंवा बायको विटाळशी असतां ब्राह्मणाकडून करवावें. आग्रयण करवूं नये. अग्नीचा समारोप म्हणजे समिध शेंकून वर अग्नि घेण्याचें कर्म आणि प्रत्यवरोहण म्हणजे शेंकून ठेविलेली समिधा अग्नींत टाकण्याचें कर्म--हीं अशौचांत होत नाहीत. यावरुनच--समारोपानंतर जर अशौच आलें तर तैत्तिरीयांचा तीन दिवस होमलोप झाल्यास अग्निनाश होतो; यास्तव अशौच गेल्या नंतर दोघांनींही श्रौताग्नि व स्मार्ताग्नि यांचें पुन्हा आधान (स्थापन) करावें. कारण, अग्नीचा समारोप व प्रत्यवरोहण---हीं कृत्यें दुसर्याकडून करवितां येत नाहींत. अग्नि विच्छिन्न झाल्यास प्रायश्चित्त घेऊन, तो दुसर्याकडून पुन्हां उत्पन्न करवावा. जेवीत असतां जर अशौच समजलें, तर तोंडातला घांस टाकून स्नान करावें. तो घांस खाण्यांत आल्यास एक दिवस उपास करावा. पात्रांतलें सर्व अन्न भक्षण केल्यास तीन दिवस उपास करावा. सुतक व सोयर यांचा राहुदर्शनांत दोष नसल्याचें वचन आहे; म्हणून ग्रहणांत स्नान करुन, श्राद्ध, दान, जप वगैरे कर्में अशौचांतही करावींत. याप्रमाणेंच संक्रान्तिकालाचाही स्नानदानादिकांबद्दलचा निर्णय समजावा. संकट असतां, नान्दी श्राद्ध केल्यानंतर मुंज व लग्न यांच्यासंबंधानें सोयराच्या विटाळ नाहीं. संकटकाळीं मधुपर्क पूजेनन्तर ऋत्विजांना अशौच नाहीं. दीक्षा घेतल्यानंतर अवभृथस्नान होईपर्यंत यजमानाला अशौच नाहीं. अशौच संपल्यानंतर अवमृथस्नान करावें. व्रतादिकांच्या बाबतींत अशौच नाहीं, म्हणून अनन्तादिक व्रतें दुसर्याकडून करवावींत. आरंभ केलेल्या अन्नस्त्रादिकांत अन्नदान करण्यास अशौचाचा दोष नाहीं व पूर्वी संकल्प केलेल्या अन्नाबद्दलही दोष नाहीं. पाणी, दूध, दहीं, तूप, फळें, मीठ, मुळें भाजलेलें अन्न वगैरे जे पदार्थ घरांत असतील ते घेण्यांत दोष नाहीं. मात्र ते पदार्थ सुतक्याच्या हातून घेऊं नयेत. तांदुळादि अपक्व अन्न सुतक्याच्या हातून घ्यावें, असें कोणी म्हणतात. याप्रमाणें येथें थोडक्यांत निर्णय सांगितला. पुढें विस्तारानें सांगण्यात येईल.