दिनक्षय, कल्याणी, यमघण्ट, दग्धयोग, मृत्युयोग, दारुणयोग, दुष्टयोग, तिथीच्या निषिद्ध घटका व पापयोग यांवर जर जन्म होईल, तर मोठा दोष सांगितला आहे. यमघण्टादि योग ज्योतिषग्रंथांत प्रसिद्ध आहेत दुष्ट योग व तिथि यांचे जे निषिद्ध भाग ते येणेंप्रमाणें :- विष्कम्भयोग व वज्रयोग यांच्या पहिल्या तीन घटका, गण्ड व अतिगण्ड यांच्या पहिल्या सहा घटका परिघाचा अर्धा भाग, शूलाच्या पहिल्या पांच घटका व व्याघाताच्या पहिल्या नऊ घटका; चतुर्थीच्या ८, षष्ठीच्या ९, अष्टमीच्या १४, नवमीच्या २५, द्वादशीच्या १० व चतुर्दशीच्या ५ (या सर्व प्रत्येकींच्या प्रारंभीच्याच घटका धरायच्या) या निषिद्ध मानिल्या आहेत. दिनक्षयादि जे दोष सांगितले आहेत, त्यांपैकीं एकेका दोषानें दूषित अशा वेळीं जर जन्म होईल, तर शिवावर रुद्राच्या एकादशिनीचा अभिषेक करावा. दोन, तीन इत्यादि अनेक दोषांचा जर (जन्मकालीं) समुदाय असेल तर ग्रहयज्ञ, पिंपळाला प्रदक्षिणा वगैरे अधिक प्रायश्चित्तें करावींत शिवाच्या मन्दिरांत भक्तीनें तुपाचा दिवा लावावा. ’गणपतिसूक्त, पुरुषसूक्त, सौर, मृत्युञ्जय, शान्तिपाठ व रुद्रजप- हे शुभ पाठ केल्यानें मृत्यूवर जय मिळतो’ असें वचन आहे; यास्तव, (जन्मसमयीं) जर अनेक दोष असतील, तर वर सांगितलेले जप करावेत.