स्त्री अथवा गाय वगैरेंच्या पोटीं जेव्हां विपरीत प्रकारच्या जीवाचा जन्म होतो, तेव्हां देशावर आपत्ति येते, मनुष्य, पशु, गाई, अश्व, मृग, पक्षी इत्यादिकांच्या पोटीं-विजातीय, सदन्त, अक्राळविक्राळ, अनेक डोक्याचे, मस्तकरहित, अनेक कानांचे, कर्णरहित, एक दोन तीन शिंगांचे, तीन चार हातांचे लांब किंवा मोठया कानांचे, हत्तीसारख्या कानांचे वगैरे (विपरीत प्रकारचे) मानवी प्राणी जन्मतात, तेव्हां श्रेष्ठ अशा राजकुलांचा, घनाचा व कुलाचा नाश होतो. या बाबतींत चरु, घृत व पलाशसमिधा यांचा १००८ होम करावा. पूर्वींच्या शान्तींत सांगितल्याप्रमाणें ब्राह्मणांना तृप्त करावें. मस्तकरहित किंवा दोन मस्तकांचा प्राणी जन्मेल, तर तें सूर्यासंबंधाचें अद्भुत होय. यास्तव, सूर्यपूजन करुन, दहीं, घृत व रुईच्या समिधा यांनीं होम करावा. हरिणीला जेव्हां सर्प, बेडूक, मनुष्य वगैरेपैकीं कांहीं होईल तेव्हां तें अद्भुत बृहस्पती संबंधानें असल्यानें बृहस्पतीची पूजा करुन, दहीं व तूप यांत भिजविलेल्या उंबराच्या समिधांनीं होम करावा. स्त्रीचा गर्भपात होईल, तिला जुळें होईल, दांतांसह मूल निपजेल किंवा जन्म झाल्याबरोबर मूल हंसेल, तर तें बुधाचें अद्भुत असल्यानें बुधासंबंधाची पूजा व होम हीं करावींत. याप्रमाणें विपरीतजननासंबंधाच्या शान्ति यथामति थोडक्यांत सांगितल्या. या माझ्या कृतीनें भगवान् विठ्ठल संतुष्ट होवो.