नान्दीश्राद्धांत जें पिण्डदान करावयाचें असतें तें, कुलधर्माला अनुसरुन वैकल्पिक आहे. दहीं, मध, बोर, द्राक्षें व आंवळे--हे पदार्थ पिण्डांत घालावेत. द्राक्षें व आंवळे यांची दक्षिणा द्यावी. प्रथमान्त विभक्तीनें संकल्प करावा. जेथें जेथें म्हणून उच्चार करा-याचा प्रसंग येईल तेथें तेथें ---नातें (संबंध) नांव आणि गोत्र--हीं वर्ज्य करावींत. मालती, मोगरी, केतकी व कमळें--यांच्या माला ब्राह्मणांना द्याव्या. तांबडीं फुलें उपयोगांत आणूं नयेत. सर्वांनीं---केशर, चंदन, वगैरे लावावींत. नान्दीश्राद्धाला आरंभ झाल्यानंतर दुसरा पाक करुन, सर्व शाखांच्या लोकांनीं साग्निक व निरग्निक वैश्वदेव करावा. दोन दोन ब्राह्मणांना जें एकदम आमंत्रण द्यावें, त्याचा प्रकार असाः--
"भवद्भयां क्षणःक्रियतां । ॐ तथा प्राप्रुतां भवन्तौ ।
प्राप्रुवावं । शंनोदेवी०’
या मंत्रानें अभिमंत्रण करुन यव टाकावेत.
’यवोसि सोमदेवत्त्यो गोसवे देवनिर्मितः ।
प्रत्नवद्भिः प्रत्तःपुष्टया नान्दीमुखान् पितृनिमांल्लोकान्प्रीणयाहिनः स्वाहा नमः’
हा मंत्र पितृकर्मांत योजावा. गन्धेत्यादि उपचार दोन दोनदां करावेत. ब्राह्मणांच्या हातावर करण्याचा जो होम तो:-
अग्नये कव्यवाहनाय स्वाहा ।
सोमाय पितृमते स्वाहा ॥’
या मंत्रानें करावा. नान्दीश्राद्धांत अपसव्य करुं नये, तीळ वापरुं नयेत व पितृतीर्थानें (हाताचा अंगठा व त्याच्या शेजारचें बोट यांच्या मधल्या भागानें) दान करुं नये. ’पावमानी’ व ’शंवन्ती’ या ऋचा, शकुनिसूक्त आणि स्वस्तिसूक्त,---हीं ब्राह्मणांना ऐकवावींत. ’मधुवाता०’ या तीन ऋचांच्या ऐवजीं ’उपास्मै गायतां०’ या पांच ऋचा व ’अक्षं नमीमदन्त०’ ही (सहावी) अशा ऋचा म्हणाव्या. तृप्तिप्रश्नाच्या जागीं ’संपन्नम्’ असा उच्चार करावा. देवकर्मांत ’रुचिरम्’ असा प्रश्न करावा. पूर्वेकडे शेंडे करुन मांडलेल्या दूर्वा अथवा दर्भ यांवर एकेकाला दोन दोन पिण्ड द्यावेत. ’अक्षय्यम्’ या बद्दल ’नान्दीमुखाः पितरः प्रीयताम्’ असें म्हणावें. स्वधावाचनांत ’नान्दीमुखान्पितृन्वाचयिष्ये’ असें म्हणावें; ’स्वधा’ म्हणूं नये. ’त्यमूषुवाजिनं०’ या मंत्रानें ब्राह्मणांचें विसर्जन करावें. कोणी ग्रंथकार सांगतात कीं, नान्दीश्राद्धाच्या शेवटीं वैश्वदेव करावा. नान्दीश्राद्धांत, श्राद्धांत जें तर्पण असतें तें करुं नये. अग्निहोत्र्यांनीं पिण्डदान करावें. बापाचे-आई वगैरे जे तीन वर्ग (मागें) सांगितले, त्या बाबतींतलें जर नान्दीश्राद्ध असेल, तर ’पितुर्मातामहीचैव तथैव प्रपितामही’ वगैरे श्लोक म्हणावा. द्वारलोपपक्ष असल्यास, ज्या पार्वणाचा लोप असेल त्या पार्वणासंबंधाच्या श्र्लोकाचा एकदेशलोप करावा. केवळ मातृपार्वणयुक्त नान्दीश्राद्ध असल्यास देव करुं नयेत. ’एता भवन्तु सुप्रीताः’ असा उच्चार करावा. सांकल्प विधीनें संक्षिप्त नान्दीश्राद्ध करण्याचा प्रयोग, प्रयोगरत्नादि ग्रंथांत पाहावा. याप्रमाणें येथें नान्दीश्राद्धासंबंधाचा विचार संपला.