जन्मदिवशीं जातकर्म केल्यानंतर नामकरणाचा काळ सांगितला आहे. ब्राह्मणाचें नामकरण बाराव्या किंवा क्वचित् अकराव्या दिवशीं करावें. अशौच असतांही दहाव्या दिवशीं नामकरण करण्याचें वचन असल्यानें, तें तसें करावें असें कोणी ग्रंथकार सांगतात. क्षत्रियाचें नामकरण तेराव्या किंवा सोळाव्या दिवशीं करावें. वैश्याचें तेराव्या किंवा सोळाव्या दिवशीं करावें. शूद्राचें बाविसाव्या दिवशीं किंवा एक महिन्यानें करावें. एक महिना, शंभर दिवस, एक वर्ष वगैरे--ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना--अनुक्रमें नामकरणाला गौण काल आहेत. नामकरण मुख्य काळीं करण्यास ब्राह्मणानें---शुभतिथि, शुभ नक्षत्र, चन्द्रबल वगैरे पाहाण्याचें कारण नाहीं. मुख्य काळ जर टळेल, तर शुभनक्षत्रादिक अवश्य पाहावींत. वैधृति, व्यतीपात, संक्रान्ति, ग्रहणदिवस, अमावास्या, भद्रा वगैरे जर योग्य काळीं असलीं तर नामकरण वगैरे कर्म करुं नये. या बाबतींत मलमास, गुरुशुक्रांचे अस्त वगैरेचे दोष नाहींत, असें सांगितलें आहे. अपराह्नकाळीं व रात्रीं नामकरण करणें वर्ज्य आहे. उक्त कालाचा अतिक्रम झाल्यास इष्ट अशी शुभ तिथि वगैरे--चतुर्थी, षष्ठी, नवमी, द्वादशी, चतुर्दशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावास्या यांशिवाय बाकींच्या तिथि प्रशस्त होत. सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे शुभ होत. अश्विनी, तीन उत्तरा, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती --हीं नक्षत्रें आणि वृषभ, सिंह व वृश्चिक हीं लग्नें प्रशस्त होत.