गौरी वगैरे मातृकादेवतांचें पूजन करणें हें नांदीश्राद्धाचें अंग आहे. ज्या कर्मांत नान्दीश्राद्ध करीत नाहींत, त्यांत मातृकापूजन करण्याचेंही कारण नाहीं. प्रथम मातृपावर्ण, नंतर पितृपावर्ण आणि नंतर सपत्नीक मातामहपार्वण अशा तीन पार्वणांचें मिळून नान्दीश्राद्ध होतें. आई जिवंत असून सावत्र आई जरी मेलेली असली, तरी मातृपार्वण नाहीं. तद्वतच आईची आई (आजी) जिवंत असून सावत्र माता जरी मेलेली असली तरी मातामह (आईचा बाप) वगैरेंना सपत्नीकत्व नाहीं. याचप्रमाणें आई जिवंत असून सावत्र आई जरी मेलेली असली, तरी बापवगैरेंना दर्शांत सपत्नीकत्व नाहीं. या नान्दीश्राद्धांत ’स्वधा’ शब्दाच्या जागीं ’स्वाहा’ या शब्दाचा उपयोग करुन, सर्व क्रिया सव्यानेंच कराव्या. प्रत्येक पार्वणाला व देवपार्वणाला दोन दोन ब्राह्मण सांगावेत. विवाहादि मंगलकार्यांच्या अङ्गभूत असणार्या नान्दीश्राद्धांत दर्भांच्या ऐवजीं दूर्वा वापराव्यात व यज्ञादि कर्मांतल्या (नान्दीश्राद्धा) करितां मुळें तोडून टाकलेले दर्भ घ्यावेत. दूर्वा व दर्भ हीं नेहमीं दोन दोन घ्यावींत. श्राद्धांत त्याचा कर्ता पूर्वाभिमुख व ब्राह्मण उत्तराभिमुख, किंवा कर्ता उत्तरांभिमुख व ब्राह्मण पूर्वाभिमुख असावेत. काल पूर्वाह्नच घ्यवा. सर्वकर्म प्रदक्षिण (डावे हाताकडून उजवेहाताकडे) करावें. आधानाच्या अंगभूत जें नान्दीश्राद्ध तें मात्र अपराह्नकाळीं करावें. पुत्रजन्मानिमित्त जें नान्दीश्राद्ध करावयाचें तें रात्रींसुद्धां करावें. विश्वेदेवांच्या नांवानें आठ ब्राह्मण सांगावेत व सामर्थ्य नसल्यास चारच सांगावेत. नान्दीश्राद्धांत ’सत्यवसु’ नांवाचे विश्वेदेव घ्यावेत. सोमयाग, गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, आधान वगैरे कर्मांतल्या नान्दीश्राद्धांत ’ऋतुदक्ष’ नांवाचे विश्वेदेव घ्यावेत. गर्भाधानादिसंस्कार, विहीर, देवप्रतिष्ठा इत्यादि पूर्वकर्में, पूर्वीं न केलेलें आधान (अग्निस्थापन) वगैरे कर्में, संन्यास घेणें, काम्यवृषोत्सर्ग,गृहप्रवेश, तीर्थयात्रा, श्रवणाकर्म, सर्पबलि, आश्वयुजीकर्म, आग्रयण इत्यादि पाकसंस्थांचा प्रथमारंभ या कर्मांत नान्दीश्राद्ध अवश्य करावेंच लागतें. सोमयोगावांचून करावयाचें जें पुनराधान, वारंवार करावयाचें जें कर्म आणि अष्टकादि जीं श्राद्धें त्यांत नान्दीश्राद्ध करुं नये. गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, चौल, मुंज, व विवाह यांच्या वांचू च्या इतर कर्मांत नान्दीश्राद्ध हें वैकल्पिक आहे. जातकर्म जर जन्मकाळींच करावयाचें असेल तर ’पुत्रजन्मनिमित्तकं जातकर्माङ्गंच वृद्धिश्राद्धं तंत्रेण करिष्ये’ असा संकल्प करुन (दोहोंच्या ऐवजीं) एकदांच (नान्दीश्राद्ध) करावें. जातकर्म जर नामकरणाबरोबर करावयाचें असेल, तर पुत्रजन्मनिमित्तक नान्दीश्राद्ध जन्मकालींच हिरण्यानें (दक्षिणा देऊन) करुन, जातकर्मांतलें नान्दीश्राद्ध नांव ठेवायच्या (नामकरणार्या) वेळीं करावें. जन्मकाळीं केलें नसल्यास, नामकरणाच्या वेळीं ’पुत्रजन्मनिमित्तकं चौलान्तसंस्काराङ्गंच नान्दीश्राद्धं तंत्रेण करिष्ये’ असा संकल्प करावा. चौल व इतर कर्में एकदम करावयाचीं असलीं तर प्रत्येक कर्मांबद्दल निरनिराळें नान्दीश्राद्ध न करितां, सर्वांबद्दल एकच करावें. जुळ्या मुलांचा संस्कार बरोबरच करायचा असल्यासहि एकच नान्दीश्राद्ध करावें. ऋक्शाखीय आणि कात्यायन यांनीं ’पितृपितामहप्रपितामहाः’ असा बापाच्या नांवापासून त्रयीचा उच्चार करावा. जे इतर शाखांचे असतील त्यांनीं, ’प्रपितामहपितामहपितरो नान्दीमुखाः’ असा आजाच्या नांवापासून उच्चार करावा. मातृपार्वणांत ’नान्दीमुख’ याच्या जागीं ’ङीप’ प्रत्यय वैकल्पिक असल्यानें, ’नान्दीमुख्यः’ किंवा ’नान्दीमुखाः’ असे जे दोन पक्ष त्याच्या उच्चाराच्या बाबतींत होतात, त्यांतला कोणचा तरी एक घ्यावा. ’नख व मुख अशी एकदन्त प्रातिपादिक जर कोणाची संज्ञा असली, तर त्या पुढें ङीप होत नाहीं’ असा जो निषेध सांगितलेला आहे, तो येथें लागूं होत नाही, असें पुरुषार्थचिन्तामणीकार सांगतात.