पंचमी व षष्ठी, दशमी व एकादशी, पौर्णिमा व अमावास्या आणि प्रतिपदा-या तिथींच्या सन्धिकालाच्या ज्या दोन घटका (म्हणजे वरील प्रत्येक जोड तिथीच्या शेवटची एक व आरंबहची एक घटका मिळून दोन घटका ) त्यांना तिथिगण्डान्त असें म्हणतात. कर्क व सिंह, वृश्चिक व धनु आणि मीन व मेष-या लग्नांच्या संधिकालांतली जी एक घटका (म्हणजे वरील तिन्ही लग्नांच्या मध्यांतली पहिल्या राशीची शेवटची अर्धी व दुसर्या राशीच्या आरंभाची अर्धी मिळून एक घटका) त्यांना तिथिगण्डान्त असें म्हणतात. तिथिगण्डान्तांतल्या पूर्वार्धीं जर बालकाचा जन्म झाला, तर तत्काळ स्नान करुन एक बैल दान द्यावा किंवा त्याच्या किंमतीचें द्रव्यदान करावें आणि सोयर संपल्यावर शान्ति करावी. उत्तरार्धांत जन्म झाला असल्यास फक्त शान्ति तेवढी करावी. लग्नगण्डान्ताच्या पूर्वार्धांत जन्म झाल्यास सोनें दान देऊन शान्ति करावी. उत्तरार्धांत जन्म झाल्यास फक्त शान्तिच करावी. कलशावर सोन्याच्या वरुणाच्या प्रतिमेची पूजा करुन त्याच्या नांवानें समिधा, चरु, तूप, तिळ व यव यांच्या प्रत्येकीं १०८ आहुतींनीं होम करावा व दक्षिणा म्हणून-यव, तांदूळ, उडीद, तिळ व मूग--हीं द्यावींत.