व्यतिपात, वैधृति अथवा सूर्यसंक्रान्ति यांवर जर पुत्रजन्म होईल, तर दारिद्रय, धननाश व मृत्यु हीं प्राप्त होतात यांत संशय नाहीं. स्त्रियांस शोकदुःखादि होऊन सर्वनाश होतो; यास्तव, नवग्रहांसहित गोप्रसवशान्ति करावी, योग्य काळीं संकल्पादिक करुन पांचच द्रोण भाताची रास करावी यावर अडीचच द्रोण तांदुळाचि रास करावी आणि त्यावर सव्वाच द्रोण तिलराशि करावा. त्यावर विधिपूर्वक कलशस्थापना करुन, त्यावरच्या सुवर्णाच्या प्रतिमेंत सूर्याचें आवाहन करावें. त्याच्या दक्षिणेस अग्नि व उत्तरेस रुद्र यांचीं आवाहनें केल्यावर त्या तीन देवतांची व्यतीपातशान्तींत व संक्रान्तिशान्तींत पूजा करावी. व्यतीपात व संक्रान्ति हे दोन्ही योग जर जन्मकालीं असले तर दोन्ही शान्तींचा एकतंत्रानेंच संकल्प करुन, एका शान्ति करावी. अशा वेळीं पूजा व होम यांची प्रसंगसिद्धि म्हणजे तीं दोन्ही एकदांच करणें होतें, किंवा प्रधानदेवतेचा होम दुप्पट करावा असें वाटतें. ग्रहपीठस्थ देवतांचें अन्वाधान झाल्यावर ---
’सूर्य उत्सूर्यो बृहदिति मंत्रेण समिदाज्यचर्वाहुतिभिः प्रतिद्रव्यमष्टोत्तरशतसंख्याभिः अग्निं रुद्रंच तैरेव द्रव्यैः प्रत्येकमष्टविंशति संख्याहुतिभिः अग्निंदूतमिति त्र्यम्बकमिति मंत्राभ्यांमृत्युंजयमष्टोत्तरशततिलाहुतिभिः शेषेणेत्यादि’
असें अन्वाधान करावें. अभिषेकानन्तर गाय, वस्त्र, सुवर्ण वगैरे दानेंद्यावींत, व शंभर ब्राह्मणांना भोजन द्यावें. याप्रमाणें व्यतीपातसंक्रान्ति यांची शान्ति समजावीं.