दुसर्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या दत्तकाची मुंज (उपनयन) जर पालकाच्या गोत्रानें केली असेल, किंवा मुंजीनंतर जर दत्तक घेतला असेल, तर दत्तकानें अभिवादन, श्राद्ध वगैरे कर्मांत दोन्ही गोत्रांचा उच्चार करावा. चूडाकर्मापासूनच (शेंडी राखणें) सारे संस्कार जर पालक-बापानें केले असतील, तर फक्त पालकाच्याच गोत्राचा उच्चार करावा. लग्नासंबंधानें सर्व दत्तकांनीं बाप व पालक अशा दोघांही पित्यांच्या गोत्रांतील व प्रवरांतली मुलगी करुं नये. या बाबतींत सात किंवा पांच पुरुष वर्ज्य करावेत असा नियम कोठें आढळत नाहीं. जनकपित्याच्या गोत्रानें जर दत्तकाची मुंज झाली असेल, तर जनक माता व पिता यांच्या कुलांत सात पुरुष व पांच पुरुष इतकें सापिण्डय करावें. पालक-पित्याच्या गोत्रानें तीन पुरुषांपर्यंत सापिण्डय करावें. पालक-पित्याच्या गोत्रानें जर मुंज झाली असली तर, दोन्ही पितृकुलांत पांच पुरुषांपर्यंत व दोन्ही मातृकुलांत तीन पुरुषांपर्यंत सापिण्डय करावें. जातकर्मापासून उपनयनापर्यंतचे सर्व संस्कार जर पालकपित्यानें केले असतील, तर पालकपित्याच्या कुलांत सात पुरुषांपर्यंत, आणि मातेच्या कुलांत पांच पुरुषांपर्यंत सापिण्डय करावें. जन्म देणार्या पित्याच्या कुळांत याहून कमी सापिण्डय करावें. कांहीं ग्रंथकाराचें असे म्हणणें आहे कीं, दत्तकाचा प्रवेश झाल्यावर दोन्ही कुलांत कमी सापिण्डय होतें. दत्तकाच्या सन्ततीच्या सापिण्डयाविषयींही हाच निर्णय समजावा. दत्तक मुलगा जर मरेल तर पहिला व दुसरा अशा दोन्ही बापांनीं तीन दिवसपर्यंत सुतक धरावें व सपिण्डांनीं एक दिवस धरावें. मुंज झालेला दत्तक मुलगा जर मेला तर पालकपिता व सपिण्ड यांनीं दहा दिवस सुतक धरावें, असें नीलकण्ठांनी दत्तकनिर्णयांत म्हटलें आहे. याप्रमाणेंच पहिला अथवा दुसरा पिता जर मेला तर दत्तक मुलानें तीन दिवस सुतक धरावें. पहिले अथवा दुसरे सपिण्ड यांपैकीं जर कोणी मरेल, तर एक दिवस सुतक धरावें. पहिला अथवा दुसरा पिता यांच्या मरणानंतरच्या (और्ध्वदेहिक) क्रियाकर्मासंबंधानें मात्र दहा दिवस सुतक धरावें. दत्तक मुलाचे मुलगे, नातु (पुत्र, पौत्र) वगैरेंच्या जन्ममरणासंबंधानें सपिण्डांनीं एक दिवस सुतक धरावें. सगोत्र व सपिण्ड यांपैकीं जर मुलगा दत्तक दिला असेल तर मात्र दहा दिवस सुतक धरावें. पालक-पित्याची (दत्तक घेणार्याची) बायको, मुलगी वगैरे असतांही दत्तक मुलगा पालकपित्याच्या धनाचा वारस होतो. मुलगा दत्तक घेतल्यावर जर औरस मुलगा झाला तर दत्तक मुलाला फक्त चतुर्थांश हिस्सा मिळतो, सर्व मिळत नाहीं. दत्तक घेणार्या बापानें जन्मकर्मापासून मुंजीपर्यंतचे सर्व संस्कार व दत्तविधान हीं जर केलीं असतील, तर औरस पुत्राच्या बरोबरीनें दत्तक मुलाला हिस्सा मिळतो. नुसते संस्कार मात्र केलेले असून, दत्तविधान जर केलें नसेल, तर त्याचा विवाह मात्र करावा. त्याला इतर धन मिळत नाहीं. कांहीं संस्कार केले असल्यास चतुर्थांश द्रव्य मिळतें, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. दत्तक मुलगा असून औरसही जर असेल, तर औरसालाच मातापित्यांच्या पिण्डदानाचा अधिकार आहे. जनकपित्याचें पिण्डदान करणारास दुसरा पुत्र जर नसेल, तर दत्तक दिलेल्या मुलानेंच जन्म देणारा व दत्तक घेणारा---अशा दोन्ही बापांचें श्राद्ध करावें व दोघाचेंही धन घ्यावें, असा नीलकण्ठानें निर्णय दिलेला आहे. याप्रमाणेंच दत्तक दिलेल्या कन्येचाही स्वीकार--वर सांगितलेल्या विधीनें करावा. परगोत्रांत जन्म झालेली मुलगी जर दत्तक घेतली, तर तिच्या लग्नासंबंधानें दोन्ही गोत्रें--वरच्याप्रमाणेंच वर्ज्य करावींत. मुलगा अथवा बायको यांच्या अभावीं, दत्तक मुलगी बापाच्या धनाची भागीदारीण होते. याप्रमाणें दत्तकासंबंधाचा सर्व निर्णय येथें समाप्त झाला.