प्राजापत्याचे प्रतिनिधि (प्रत्यान्माय) गायत्रीमंत्राचा दहा हजार जप करावा. गायत्रीमंत्रानें एक हजार तिलहोम करावा. व्याहृति मंत्रानें तिलहोम करावा असेंही कांहीं ग्रंथांत म्हटलें आहे. दोनशें प्राणायाम करावेत. बारा ब्राह्मणांना भोजन घालावें. एकदां स्नान केल्यावर केंस वाळेपर्यंत थांबून पुन्हा स्नान अशीं बारा स्नानें तीर्थावर करावींत. वेदांच्या संहितेचें पारायण करावें. चार कोस (एक योजन) यात्रा करावी. बारा हजार नमस्कार घालावे. अहोरात्र उपास करुन, एकशेंबत्तीस प्राणायाम केल्यावर पूर्वेकडे तोंड करुन उभें राहावें. गोमूत्रमिश्रित यव खाल्ले असतां एका दिवसांत कृच्छ्र होतो. रुद्राच्या एकादशिनीचा जप केल्यानेंही कृच्छ्र होतो असें कोणी एक ग्रंथकार म्हणतो. पावकेष्टि करावी. पावमानेष्टि करावी. सहा उपास करावे. हे सारे प्राजापत्याचे प्रत्यान्माय होत. एका ब्राह्मणाला जेवूं घालणें हा उपासाचा प्रतिनिधि होय. अगदींच असमर्थता असल्यास हजार गायत्री जप किंवा बारा प्राणायाम हा उपासाचा प्रतिनिधि असल्याचें स्मृत्यर्थसार नांवाच्या ग्रंथांत सांगितलें आहे. प्राजापत्त्यकृच्छ्र करण्यासाठीं जर असमर्थता असली, तर दूध देणारी गाय दान करावी. गाय देण्याची शक्ति नसल्यास निष्क, अर्धनिष्क अथवा पाव निष्क द्यावें. ऐशीं गुंजांचा एक कर्ष होतो व चार कर्षांचा एक निष्क होतो. निष्क, अर्धा निष्क किंवा पाव निष्क यांपैकीं कोणच्याही प्रमाणांतलें सोनें अथवा रुपें, गाईची किंमत म्हणून द्यावें. दोन गाई दिल्या असतां अतिकृच्छ्र होतो. याप्रमाणेंच दोन गाई दिल्यानें सान्तपनही होतो. तीन गाई दिल्यावर पराक व तप्तकृच्छ्र होतात. कृच्छ्रातिकृच्छ्रासाठीं तीन किंवा चार गाई द्याव्या. आठ, पांच, चार किंवा तीन गाईअ दिल्यानें चान्द्रायण होतें. एक महिना पाणी व पिणें, जव खाणें, उपास करणें वगैरे व्रतांसाठीं पांच गाई द्याव्या. महिनाभर गोमूत्र पिणें व यव खाणें या व्रतासाठीं सहा गाई द्याव्या.