चतुर्थी, षष्ठी, चतुर्दशी, अष्टमी, पौर्णिमा व अमावास्या या तिथींशिवाय बाकीच्या तिथि योग्य होत. सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार, हे (चार) वार शुभ होत. मूळ, मघा, रेवती व ज्येष्ठा हीं नक्षत्रें त्याज्य समजावींत. भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा व विशाखा हीं नक्षत्रें मध्यम होत. बाकीचीं शुभ समजावींत. सर्वकार्यांना जें गोचरी चंद्रबळ अवश्य लागतें; तें पुढीलप्रमाणें पाहावें :- अन्नलाभ, धननाश, सौख्य, रोग, कार्यनाश, संपत्ति, स्त्री, मृत्यु, राजभय, सुख, धनलाभ, आणि धननाश-याप्रमाणें आपल्या जन्मराशीपासून बारा राशींवर असतां क्रमानें (चंद्र) फल देतो. शुक्लपक्षांतला चंद्र जसा श्रेष्ठ, तद्वतच--दुसरा, पांचवा व नववा---हेही चंद्र शुभच होत. ज्याला अनेक बायका असतात. अशाचा स्त्रियांना जर एकाच काळीं ऋतुप्राप्ति होईल, तर विवाहक्रमानें किंवा ऋतुप्राप्तिक्रमानें गर्भाधानें करावींत. ऋतुकाळीं गमन न केल्यानें घडणार्या दोषाला अपवाद:- व्याधि, बन्धन, प्रवास व पर्वदिवस यांमुळें गमन न केल्यास दोष नाहीं. तद्वतच---थेरडी बायको, वन्ध्या, दुर्वृत्ता, मृतवन्ध्या, विटाळ गेलेली, मुली होणारी किंवा अनेक मुलगे असलेली--यांपैकी को्णच्याही प्रकारची असल्यास, तिच्याशीं गमन न केल्यास दोष नाहीं.