चन्द्रग्रहणांत किंवा सूर्यग्रहणांत जर जन्म झाला तर, निःसंशय मृत्यु येतो व रोग, पीडा, दारिद्रय, शोक, कलह वगैरे अरिष्टें उत्पन्न होतात. अशा प्रसंगीं गोमुखशान्ति करावी असें वाटतें. ग्रहमख करावा किंवा करुं नये.
’सूर्यग्रहणकानिकप्रसूतिसूचितनिरसनद्वारा०’
वगैरे संकल्प करावा. ग्रहणकाळाचें नक्षत्र अथवा नक्षत्रदेवता यांची प्रतिमा करावी. सूर्यग्रहण असल्यास सूर्याची सोन्याची प्रतिमा करावी व चन्द्रग्रहण असल्यास चन्द्राचें रौप्यबिम्ब करावें. तद्वतच कोणचेंही जरी ग्रहण असलें तरी राहूची शिशाची नागाकार प्रतिमा करावी. गाईच्या शेणानें सारवून शुद्ध केलेल्या जागेवर पांढरें वस्त्र ठेवून त्यावर (वरील) तीन देवतांची (प्रतिमांची) पूजा करावी. याप्रसंगीं कलशस्थापना करुं नये.
’आकृष्णेनेति०’
या मंत्रानें मध्यभागीं सूर्याचें, ’स्वर्भानोरथ०’ या मंत्रानें दक्षिणेस राहूचें व उत्तरेस नक्षत्रदेवता यांचीं आवाहनें करुन पूजा करावी. चन्द्रग्रहण असल्यास ’आप्यायस्व०’ या मंत्रानें मध्यभागीं चंद्राचें आवाहन व पूजा करुन दक्षिणोत्तर दोन बाजूंस अनुक्रमें राहु व नक्षत्रदेवता यांचें आवाहन व पूजा वरीलप्रमाणेंच करावींत. जेव्हां सूर्यग्रहण असेल तेव्हां
’सूर्यअर्कसमिदाज्यचरुतिलैः प्रत्येकमष्टोत्तरशतसंख्यया राहुं दूर्वाज्यचरुतिलैस्तावत्संख्यैर्नक्षत्रदेवतां जलवृक्षसमिदाज्यचरुतिलैस्तावत्संख्यया शेषेणेत्यादि०’
असें अन्वाधान करावें. चन्द्रग्रहण असल्यास,
’चन्द्रं पालाशममिदाज्यचरुतिलैःप्रत्येक मष्टोत्तरशतसंख्यया०’
वगैरे वरीलप्रमाणेंच अन्वाधान करावें. शेवटीं कलशांतल्या पाण्यानें किंवा पंचगव्य, पंचत्वचा (साली) पंचपल्लव वगैरेनीं युक्त अशा प्रसिद्ध (लौकिक) जलानें अभिषेक करावा. वेधकालांत जन्म झाल्यास शान्ति करुं नये असें जरी आहे तरी, तो दुष्ट काल असल्यानें रुद्राभिषेक करावा असें वाटतें.