गर्भाचें स्पष्ट ज्ञान झाल्यावर दुसर्या, चौथ्या, सहाव्या अथवा आठव्या महिन्यांत करावा, किंवा सीमन्तोन्नयनाबरोबरही करावा. शुद्धपक्षांतल्या पंचमीपासून वद्यपक्षांतल्या पंचमीपर्यंतच्या-चतुर्थी, नवमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या तिथींखेरीजकरुन बाकीच्या तिथि व रविवार, मंगळवार आणि गुरुवार हे दिवस-शुभ होत. क्वचित् ग्रंथांत-सोमवार, बुधवार व शुक्रवार हेही सांगितले आहेत. नक्षत्रांपैकीं जीं पुरुष नक्षत्रें प्रशस्त म्हणून सांगितलीं आहेत तीं हीं:-पुष्य, श्रवण, हस्त, पुनर्वसु, मृग, अभिजित, मूळ, अनुराधा आणि अश्विनी. यांतलें पुष्यनक्षत्र मुख्य आहे. त्याच्या अभावीं श्रवण, त्याच्या अभावीं हस्त असा क्रम घ्यावा. अनवलोभन (गर्भाच्या तिसर्या महिन्यांत करण्याचा शुद्धीकरण संस्कार) संस्काराचाही हाच काळ जाणावा; कारण पुंसवनाबरोबरच अनवलोभन करावें असें सांगितलें आहे. पुंसवन व अनवलोभन हे गर्भसंस्कार असल्यानें प्रत्येक गर्भारपणांत करावेत. गर्भाधान व सीमंतोन्न्यन हे संस्कार असल्यानें प्रत्येक गर्भारपणीं करुं नयेत, फक्त पहिल्याच गर्भारपणांत करावेत. पहिल्या गर्भारपणीं (हे संस्कार) न केले तर लोप होतो म्हणून, प्रत्येक गर्भकाळीं प्रायश्चित्त करणें अवश्य आहे, कारण पहिल्या गर्भाच्या वेळीं या (गर्भाधान व सीमन्तोन्नयन) संस्काराचें प्रायश्चित्त केल्यानें दुसर्या, तिसर्या वगैरे गर्भांच्या संस्कारांची सिद्धि होत नाहीं. प्रायश्चित्त केल्यानें दोषाचा मात्र परिहार होतो. पुण्याची प्राप्ति संस्कारविधि केल्यानेच होते; यास्तव, प्रत्येक गर्भकाळीं प्रायश्चित्त करणेंच योग्य आहे. पुंसवन व अनवलोभन हे संस्कार तेवढे गर्भसंस्कार असल्यानें, ते जरी पहिल्या गर्भाच्या वेळीं केले असले, तरी पुढेंही प्रत्येक गर्भाच्या वेळीं करावेत. जाणूनबुजून केले नसल्यास दुप्पट प्रायश्चित्त करावें. पुंसवनसंस्कार नवर्यानें करावा. त्याला करणें अशक्य असल्यास दीर वगैरेंनी करावा.