मूळ वगैरेवर पुत्रजन्म झाला असल्यास पित्यानें त्याचें मुख पाहातांच स्नान करावें. बाप जर देशांतरीं असेलं तर पुत्रजन्म झाल्याचें समजतांच स्नान करावें. स्नान करण्याच्या आधीं कोठेंहि कोणास बापानें स्पर्श करुं नये. याप्रमाणेंच जन्मानंतर स्नान व स्नानाच्या आधीं अशौच, हीं कृत्यें कन्या झाली असतांही करावींत. सपिंडाचें सोयर असतांनाच जर जनन होईल, तर पित्याला-स्नान, दान व जातकर्म करण्यास तत्काळ शुद्धि आहे. मृताशौच (सुतक) असतांना जर जनन होईल, तर सुतक फिटल्यावर जातकर्म करावें असें कांहीं ग्रंथकार सांगतात. नालच्छेदनाच्या आधीं संपूर्ण सन्ध्यावन्दनादि कर्में करण्यास अशौच नाहीं. पहिल्या, पांचव्या, सहाव्या व दहाव्या दिवशीं दानाच्या देण्याघेण्यांत दोष नाहीं. शिजलेलें अन्न घेऊं नये. ज्योतिष्टोम यज्ञाची जर दीक्षा घेतलेली असेल, तर ती घेणारानें स्वतः अथवा दुसर्याकडून जातकर्म करुं किंवा करवूं नये. यज्ञाच्या शेवटीं अवमृथस्नान होऊन दीक्षा संपल्यावर स्वतःच तें (जातकर्म) करावें. ज्येष्ठानें कनिष्ठाकडून पुंसवनादि संस्कार करवूं नयेत; पण जातकर्म करविण्यास हरकत नाहीं. आधीं करायचें राहिल्यास मागाहून जें करणें तें स्वतः (बापानें) करावें. महारोग्यानें जातकर्म करुं नये. नाभिच्छेदनापूर्वी संस्कारङ्गभूत नान्दीश्राद्ध करावें. पुत्र या शब्दांत कन्या शब्दाचाही अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणें संस्काराशिवाय पुत्रजन्मानिमित्त वेगळें नान्दीश्राद्धही करावें. हें रात्रीं सुद्धां करावें, पण द्रव्यानें करावें; अन्नादिकांनीं करुं नये. पित्यानें स्नान करुन अलंकार धारण करावेत आणि नालच्छेदन न केलेल्या, स्तनपान न केलेल्या व दुसर्यांनीं स्पर्श न केलेल्या अशा पुत्राला घेऊन पाण्यानें धुतल्यावर त्याच्या मातेच्या मांडीवर ठेवावें. नंतर आचमन करुन देशकालादिकांचा उच्चार केल्यावर
’अस्य कुमारस्य गर्भाम्बुपान जनितदोष निवर्हणायुर्मे
धाभिवृद्धिबीज गर्भसमुद्भवैनो निबर्हणद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जातकर्म करिष्ये ।
तदादौ स्वस्तिपुण्याहवाचनं मातृकापूजनंच करिष्ये ।
हिरण्येन पुत्रजन्मनिमित्तकं जातकर्मांगंच नान्दीश्राद्धं तंत्रेण करिष्ये’
असा संकल्प करावा व आपल्या गृह्यसूत्रांप्रमाणें प्रयोग करावा. नंतर सोनें, गाय, भूमि, घोडा, रथ, छत्र, मेंढा, पुष्पमाला, अंथरुण, आसन, घर व तिलपूर्ण अशीं दोन सुवर्णपात्रें--यांचीं दानें करावींत. सोयर असलेल्याच्या घरीं जर अन्नभक्षण करण्यांत आलें, तर ब्राह्मणानें चान्द्रायण प्रायश्चित्त करावें. सुतकांत सकुल्यांना म्हणजे सगोत्र व सपिण्ड यांना दोष नसल्याबद्दलचें मनूचें वचन आहे.