गर्भार स्त्रीच्या नवर्यानें तिच्या इच्छेप्रमाणें सर्व पदार्थ तिला द्यावेत, म्हणजे ती चिरायु पुत्र प्रसवते. वांच्छा तृप्त न केल्यास नवर्याला दोष लागतो. समुद्रस्नान, झाड तोडणें , क्षौर, प्रेताला खांदा देणें, परदेशीं जाणें, नखें व केश कापणें, चौल, प्रेताच्या मागें जाणें व विवाह या गोष्टी सातव्या महिन्यापासून वर्ज्य कराव्या. क्षौर, पिण्डदान व प्रेतक्रिया--या गोष्टी ज्याचा बाप जिवंत आहे त्यानें--गर्भारशीच्या नवर्यानें नेहमींच वर्ज्य कराव्या. येथें नखें व केश कापण्याबद्दलचाही निषेध सांगितला. क्षौराचा जरी निषेध सांगितला, तरी नखें व केश कापावींत’ असें जें वाक्य आहे, तें बाप जिवंत असलेल्याच्या संबंधाचें आहे. याविषयीं जो अपवाद आहे तो असा:- निषेध असला तरी नेहमींप्रमाणें हजामत करवावी. गर्भिणीपति असला तरी आईबापांची प्रेतक्रिया करावी. अन्वष्टक्य व अष्टका या श्राद्धांत गर्भिणीपतीनें पिण्डदान करावें. कोणी कोणी आईबापांच्या दरवर्षींच्या श्राद्धांत पिण्डदान करतात. दर्शश्राद्ध व महालय--यांत पिण्डदान करुं नये.