ज्याचें मुख निष्कलंक चंद्राप्रमाणें आहे. अज्ञानी जनांनीं ज्याला नमन केलें असतां तें निष्फल होत नाहीं, श्रीवत्स, कौस्तुभ आणि लक्ष्मी हीं ज्याच्या वक्षस्थळावर शोभत आहेत आणि ज्याच्या चरणकमलांच्या आश्रयानें थोर साधु आनंद पावतात, त्या पांडुरंगाला मी वंदन करतों.
ज्याला भीमा नदी प्रिय आहे, जो करुणेचा सागर, तत्काल प्रसन्न होणारा दीनेच्छा पुरविणारा, पातकसमूहसागराचें शोषण करणारा, रुक्मिणीचें मन आकर्षण करणारा व हृदयांत राहाणारा-परम पुरुष पांडुरंगाला मी नमन करतों.
पातकांचा नाश करुन कल्याण करणारा असा जो शंकर, त्याला मी नमस्कार करतों. तो आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर रात्रंदिवस ठेवो. पार्वती, विघ्नेश गणराज, ब्रह्मदेव आणि सरस्वती या सर्वांना मी प्रणिपात करतों.
श्रीलक्ष्मी, गरुड, शेष, प्रद्युम्न, ईश, हनुमान्, श्रीसूर्य, चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, शनि, कार्तिकस्वामी, इंद्रादिदेव, गुरु, माता, अनन्त नांवाचा बाप व माध्वादिक जे श्रेष्ठ, त्या सर्वांना नमस्कार करुन, मी हा धर्माब्धिसार नांवाचा ग्रंथ रचितों.
जुने व नवे असे पूर्वींचे ग्रंथ पाहून, विशेषतः त्यांतलीं मूलवचनें सोडून, त्यांचे अर्थ मात्र मी अज्ञानी (जिज्ञासू) जनाकरितां लिहितों.
पहिल्या व दुसर्या परिच्छेदांत क्रमानें कालनिर्णय सांगून, गृह्यसूत्रांना मान्य असणारे जे गर्भाधानादि संस्कार व धर्म, ते आतां सांगतों. दयाळु सत्पुरुषांचा माझ्यावर अनुग्रह असो. अनन्तोपाध्यायांचा पुत्र मी काशीनाथ, यांत जो निर्णय सांगतों आहें, त्याचा विद्वानांनीं (विचारपूर्वक) शोध करावा.