रात्रीचे तीन भाग करुन, त्यांतल्या पहिल्या दोन भागांत जर विटाळशी होईल, तर पूर्वींचा जो दिवस तो पहिला दिवस समजावा व तिसर्या भागांत झाल्यास, पुढच्या दिवसाला पहिला दिवस समजावा. किंवा याचा दुसरा प्रकार असा कीं, अर्धरात्रीच्या आधीं झाल्यास पूर्वींचा पहिला दिवस व अर्धरात्रींनंतर झाल्यास पुढचा तो पहिला दिवस असें समजावें. जनन व मरण यांच्या अशौचासंबंधानेंहि हाच निर्णय जाणावा. जी स्त्री बहुधा एक महिन्यानें विटाळशी होते, ती जर पुनः सतरा दिवसांच्या आंत ऋतुमती होईल, तर स्नान केल्यानें शुद्ध होते. अठराव्या दिवशीं झाल्यावर एक रात्रे विटाळ धरावा, एकोणिसाव्या दिवशीं झाल्यास दोन रात्री धरावा आणि विसाव्या दिवसापासुन पुढें तीन रात्री विटाळ धरीत जावा. जी स्त्री दर पंधरवडयाला विटाळशी होते, ती जर दहा दिवसांच्या आंत पुन्हा होईल, तर स्नानानें शुद्ध होते. अकराव्या दिवशीं झाल्यास एक रात्र विटाळ धरावा, बाराव्या दिवशीं झाल्यास दोन रात्री व त्यापुढें केव्हांहि झाल्यास तीन रात्री विटाळ धरावा. रोगानें जर रोज विटाळ जात असेल, तर त्याचा जरी विटाळ नाहीं, तरी तशा अवस्थेंत स्वयंपाक, देवकर्म, पितृकार्य वगैरे बाबतींत मात्र ती अनधिकारी असते. रोगानें होणार्या रजोदर्शनावांचून मनोविकारानेंहि रजोदर्शन होतें, त्याबद्दाल स्त्रीनें सावध होऊन तीन रात्री विटाळ धरावा. प्रसूत होण्यापूर्वी रोगामुळें जी स्त्री विटाळशी होईल तिनें तीन दिवस विटाळ धरावा. प्रसूतीनंतर एक महिन्यांतच जर रजोदर्शन होईल, तर स्नानानें शुद्धि होते. एक महिन्यानंतर झाल्यास तीन रात्री विटाळ धरावा. उष्टेपणीं जर रजोदर्शन होईल, तर शुद्धीनंतर तीन दिवस तिनें उपास करावा. अधरोच्छिष्टावस्थेंतच जर रजोदर्शन होईल, तर एक दिवस उपास करावा. रजोदर्शन झालें असून, तें समजण्यांत न आल्यानें तिच्या घरांत वावरण्यानें स्पर्शित झालेल्या-दूध, मातीचीं भांडीं, पाणी वगैरे-वस्तूंचा त्याग करुं नये. कारण सुतकाप्रमाणेंच अज्ञानांत दोष नसल्याचें सांगितलें आहे. समजल्यापासून तीन दिवस पर्यंत अशुचित्व असतें असें कांहीं ग्रंथकार सांगतात. दुसर्या वगैरे दिवशीं विटाळशीपणा समजल्यास, सुतकाप्रमाणेंच बाकी राहिलेल्या दिवसांचेंच अशुचित्व असतें. असें इतर ग्रंथकार सांगतात.