गर्भाधानादि संस्कारांचा (न कळत) लोप झालेला असल्यास प्रत्येक संस्काराबद्दल पादकृच्छ्रप्रायश्चित्त करावें. व जाणूनबुजून लोप झाला असल्यास अर्धकृच्छ्रप्रायश्चित्त करावें. जातकर्मसंस्काराचा जर काल टळून गेला तर, तन्निमित्त कराव्या लागणार्या घृतहोमाच्या आधीं (जें प्रायश्चित्त) करावें तें असें :---
’जातकर्मणः कालातिपत्तिनिमित्तकदोषपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रायश्चित्तहोमं करिष्ये’
असा संकल्प करुन, अग्निस्थापन व इध्मास्थापनादिक पाकयज्ञाच्या तंत्रासहित किंवा अग्निस्थापन आज्यसंस्कार पाकसंस्कार यांसह
’भूर्भुवः स्वः स्वाहा’
या समस्तव्याहृतिमंत्रानें घृतहोम करावा. होमसमाप्तीनंतर-
’गर्भाधान पुंसवनानवलोभनसीमन्तोन्नयनलोपजनितदोषपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं एतावतः पादकृच्छ्रांबुद्धिपूर्वकलोपे अर्धकृच्छ्रान्तत्प्रत्याम्नायतोनिष्क्रयीभूत यथाशक्ति रजतद्रव्यदानेनाहमाचरिष्ये’
अशा प्रायश्चित्त संकल्पानंतर द्रव्य द्यावें. जातकर्म व नामकर्म हीं जर एकदमच करणें असतील तर पूर्वीं सांगितल्याप्रमाणें जातकर्म संकल्पवाक्य उच्चारुन,
’अस्य कुमारस्याभिवृद्धिव्यवहारसिद्धिबीजगर्भसमुद्भवैनोनिबर्हणद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं नामकर्म च तन्त्नेण करिष्ये’
असा संकल्प करुन पुण्याहवाचनादिक करावींत. त्यांत
’जातकर्मनामकर्मणोः पुण्याहंभवन्तो ब्रुवन्तु’
असें म्हणून ’अस्य कुमारस्य जातकर्मणे एतन्नाम्ने अस्मै च स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु’
असें ’स्वस्ति शब्दाच्या ऐवजीं म्हणावें व याच्याच अनुरोधानें ब्राह्मणांनीं प्रतिवचन म्हणावें. फक्त नामकर्मसंस्कारच करावयाचा असल्यास
’नामकर्मणः पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु’
असें म्हणून’स्वस्ति’ शब्दाच्या ऐवजीं ’अमुकनाम्ने अस्मै स्वस्ति’ असें प्रतिवचन म्हणावें. पहिलीं तीन नांवें ’शर्मा’ पदरहित लिहून व्यावहारिक नांवाना ’शर्मा’ हें पद लावावें. अभिवन्दन करण्यासंबंधानें जेथें जेथें म्हणून नाक्षत्रनामाचा उच्चार करावयाचा असेल, तेथें तेथें ’शर्मा’ हें पद जोडावें. बाकीचा प्रयोग प्रयोगग्रंथांत पहावा.