एकच वेड - मातृभूमि! माझ्या चित्ता ए...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मातृभूमि! माझ्या चित्ता एक वेड लागे
मायभूमि! चिंतनि तव गे जीव नित्य जागे
झोपबीप न सुचे माते हायहाय वाटे
हीन दीन त्वस्थिति बघुनी अंतरंग फाटे॥
काय आइ! करू मी कोठे जाउ गे त्वदर्थ
परतंत्र्य पाहून वाटे जन्म सर्व व्यर्थ
चित्त वित्त बुद्धी माझी देह हा मदीय
जरी तुझ्या कामी येती धन्य धन्य होय॥
मला सदा वाटे द्यावे सर्वही त्वदर्थ
तुला वैभवावर नेता होउ दे मदस्त
देह इंद्रिये ही सारी सर्वदा खपावी
त्वदुद्धारकार्यी आई धन्य धन्य होय॥
तुझ्या ध्यानरंगी रंगो हे मदंतरंग
मुखी वसो गोड तुझ्या सत्कीर्तिचे अभंग
हात पाय बुद्धि अखंड श्रमो त्वदुद्धारा
दूर करिन झिजुनी झटुनी पारतंत्र्यभारा॥
थोर महात्म्यांना जे जे स्फुरति गे उपाय
आचरेन न गणीन मनी संकटे अपाय
तुझा शिपाई मी आई ‘का’ न मी म्हणेन
पुढे घुसुन धारातीर्थी झुंजता पडेन॥
घाव घालण्याला उत्सुक, शृंखला तुझ्या मी
तोडुनी, तुला चढविन गे आइ! मोक्षधामी
तुझ्यासाठि आई! लाखो सुत तुझे खपोत
तुझ्या शृंखला भंगू दे अंगि ना खुपोत॥
विपत् तुझी जाइल विलया दैन्य हे हरेल
तेज दिव्य त्वन्मुखकंजी माउली! फुलेल
कलाज्ञानवैभवयोगे आइ! शोभशील
निकट विश्व घेशिल राष्ट्रे सर्व हर्षतील॥
धन्य तो न दिन येइल का जो असे मदायु?
न यो, त्वदुद्धारी परि मज्जन्म सर्व जाऊ
आइ! सर्व जीवन तुझिया अर्पिले पदाला
हा विचार देइल अंती शांति मन्मनाला॥
तुझ्या पोटि जन्म पुन्हा मी घेइन प्रमोदे
पुन: पुन्हा जन्मुन सेवा करुनिया मरु दे
आइ गोड सेवा तव गे अमृतमधुर मेवा
प्रभो! देइ जन्मोजन्मी मला मातृसेवा॥
मातृसेवनाविण देवा! मागणे न काही
एक मात्र आनंद असे मजसि हाच पाही
चंदनापरी मदगात्रे सर्वदा झिजू दे
अहर्निश श्रमुनी श्रमुनी शांतिने पडू दे॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP