मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
नाशी मोह प्रभुजि अथवा प्र...

निर्वाणीचे सांगणे - नाशी मोह प्रभुजि अथवा प्र...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


नाशी मोह प्रभुजि अथवा प्राण घेऊन जाई
नेई देह त्वरित अथवा ही अहंता हरावी
माझे चित्त स्थिर करि न वा थांबव श्वास देवा
पाशां तोडी सकळ, धरवे धीर ना, मृत्यु देवा॥

आनंदाने हृदयि धरु का बदबुदांचे पसारे?
मृत्युंजा का परम- रतिने पूजु सोडून तारे?
पीयूषाची प्रभुजि मजला लागलीसे पिपासा
कांजी लावू कशि मग मुखा? सिद्ध मी सर्वनाशा॥

माते प्रेमामृतजलनिधे मंगले हे उदारे
दृश्यादृश्या सृजिशि सगळे हे तुझे खेळ सारे
मच्चित्तांतर्गत तम हरी, दे प्रकाशांशु एक
आहे मी क्षुद्विकल बहुता जन्मिचा काहि फेक॥

मच्चित्ती जी सतत उठती वादळे शांत व्हावी
विध्वंसावी मम मदगृहे सर्व आसक्ति जावी
येवो चित्ती स्मरण न कधी कामिनीकांचनांचे
माते! हे दे मजसि, अथवा प्राण फेकीन साचे॥

त्वत्कारुण्यांबुधिमधिल ना बिंदू लाभे जरासा
माते! माते जरि, तरि गळ्यालागि लावीन फासा
आई होशी कृपण कशि तू बाळ जाई सुकून
त्वत्कारुण्ये जलद भरले पाठवी बिंदु दोन॥

विश्वाधारे। अगतिक तुला बाळ हा हाक मारी
दारी आला सहृदये! तारि वा त्यास मारी
हे प्रेमाब्धे! परमकरुणालंकृते! हे अनंते!
दे आधारा मज न रडवी वत्सले! स्नेहमृत!॥

त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP