मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
बा नीज, सख्या! नीज गड्या ...

प्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या! नीज गड्या ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


बा नीज, सख्या! नीज गड्या लडिवाळा!
राजसा परम वेल्हाळा॥

या सकळ जगी उठले विषमय वारे
द्वेषाचे उडत फवारे
ही अखिल मही सूडबुद्धिने भरली
हृदयेच जणु कुणा नुरली
जगि झाला रे सुळसुळाट कामाचा
क्रोधाचा मात्सर्याचा
परि भिऊ नको तू, बाळ!
धरि प्रेमवृत्ति तू अढळ
प्रेम हेच तव दिव्य बळ
या प्रेमाच्या सामर्थ्ये जगताला
देशील वळण नव, बाळा॥ बा नीज....॥

सत्प्रेमाची आहे अदभुत शक्ती
प्रेम हीच खरि चिच्छक्ती
या प्रेमाचे वर्णन कोण करील
तोकडे शब्द पडतील
तू प्रेमाचा सागर हृदयी जमवी
सुकलेले जग हे फुलवी
शमवाया विश्वद्वेष
ये घेउन तू प्रेमास
भरपूर वाटि जगतास
तू देशील प्रेम जरी जगताला
बदलशिल आजच्या काळा॥ बा नीज....॥

ना जगति कधी प्रेम दिल्याने सरते
हे प्रेम कधी ना मरते
ते दिधल्याने वाढतसे, जागविते
परहृदयि सुप्त जे असते
परहृदयाचा विकास करिते प्रेम
प्रेम एक जगदभिराम
बाळ तू नजोनी आज
प्रेमाने हृदयी साज
हो सज्ज पुढे किति काज
तू नीज अता येइल तव कृतिवेला
करि तेव्हा प्रेम-सुकाळा॥ बा नीज....॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, डिसेंबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP