मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
प्रभु मम हृदयि आज येणार! ...

प्रभु - प्रभु मम हृदयि आज येणार! ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


प्रभु मम हृदयि आज येणार!
मम जीवन-मरुभूमीत अता शत पाझर फुटणार
परम शांतिचे परम सुखाचे अमित मळे पिकणार॥ प्रभु....॥

मुक्या बिचा-या जीवपिकाला कंठ आज फुटणार
हृदयमंदिरी नवगीतांचा मधुरध्वनि उठणार॥ प्रभु....॥

प्रभु- करुणेचा वसंतवारा जीवनवनि सुटणार
वठलेल्या मत्सदवृत्तींना नव अंकुर फुटणार॥ प्रभु....॥

मालिन्याची कार्पण्याची मग वस्त्रे गळणार
पोषाख मला नवतेजाचा नवरंगी मिळणार॥ प्रभु....॥

भ्रम मम जातिल संशय शंका आज सकल फिटणार
शतजन्मांची चिरचिर माझी कायमची मिटणार॥ प्रभु....॥

सकल बंधने आज तटातट तुटुन धुळित पडणार
मन्नयनांतुन भावभक्तिची गंगा घळघळणार॥ प्रभु....॥

म्लान असा मद्वदनचंद्रमा सकल आज खुलणार
सुकलेले मम बागबगीचे सहज सरस फुलणार॥ प्रभु....॥

कुविचारांचे धुके सकल ते आज उडुन जाणार
हृदयमंदिरी चित्सूर्य अता चिर मंगल जळणार॥ प्रभु....॥

जीवात्माचे शतजन्माचे ग्रहण आज सुटणार
चिदंबरी मज उंच उडाया पंख दिव्य फुटणार॥ प्रभु....॥

दैन्य दुराशा निराशा सकल आज हटणार
अभिनव- मंगल- मधुर- मनोहर तेजे मी नटणार॥ प्रभु....॥

अमित युगांची येरझार मम आज सकल खुटणार
परमैक्याच्या परमानंदा अगणित मी लुटणार॥ प्रभु....॥

परमैक्याच्या झोल्यावरती प्रभुसह मी झुलणार
प्रेमसमाधी लागुन माझी परममुदे डुलणार॥ प्रभु....॥

शब्द अंबरी तडित अंबुदी प्रभा रवित शिरणार
तरंग अंभोधीत तसा मज्जीव शिवी मिळणार॥ प्रभु....॥

-नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP