प्रकाश केव्हा भवनी भरेल?
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मदीय या मानस-मंदिरात। तमोमयी सतत घोर रात्र
कुठे असे दीप? कसा मिळेल?। प्रकाश केव्हा भवनी भरेल?॥
जशी विजेची कळ दाबताच। प्रकाश सर्वत्र करीत नाच
कुठे असे ती कळ मंदिराची। सदैव हे धुंडित हात साची॥
मदीय हे हात दमून गेले। मदीय डोळे बनतात ओले
कधीच का ना कळ सापडेल। असाच का दास सदा रडेल?
तुझा सदा मी करितो पुकारा। पुन्हा पुन्हा दावितसा नकारा
असे प्रभो कोठवरी टिकेल। प्रकाश केव्हा भवनी भरेल?
रवी शशी अंबरी लाविलेस। निज प्रकाशे भरलेस विश्व
मदंतरी ज्योति न लावितोस। दिसे स्मशानासम गेह ओस॥
क्षणी परी येइ मनी विचार। उचंबळे तत्क्षणी मोदपूर
मना मुक्याने प्रभुपाय चेप। प्रकाश येईल पहा अपाप॥
असे विजेची कळ सत्पदांत। पदा धरी तेज भरे घरात
सदैव जो दाबिल पाय त्याचे। घरात नाचे बिजली तयाचे॥
अहा मला त्वत्कळ रे मिळाली। मदीय चिंता सगळी पळाली
अता न सोडीन कधीच पाय। चिर-प्रकाशे तम दूर जाय॥
प्रकाश येता मम मंदिरात। बसेन मी नाचत गीत गात
तव प्रभु! प्रेमसुधा पिऊन। खराखुरा पागल मी बनेन।
नुरेल माझे मज देहभान। न भूक लागेल न वा तहान
सुखाश्रु नेत्रांतुन चालतील। तनूवरी रोम उभारतील॥
प्रकाश नाचेल अनंतरंग। सुदास नाचेल डुलेल दंग
बनेल वेडाच बनेल मत्त। तुझ्यात जाईल मिळून भक्त॥
जलात जाती मिळुनी तरंग। सदैव एकत्रच अंग रंग
धरुन राही सुम नित्य वृंत। तुझ्यात जाईल मिळून भक्त॥
प्रकाश येवो सदनात थोर। हो समस्त प्रभु चित्तघोर
सदा प्रकाशास्तव मी भुकेला। प्रकाश द्यावा प्रणती पदाला॥
-नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2018
TOP