सुसंस्कृत कोण? - अन्यां करील जगती निज जो ग...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
अन्यां करील जगती निज जो गुलाम
तो दुष्ट, संस्कृति न त्या शठ तो हराम
तो रानटी मज गमे न मनुष्य खास
जो मानवा करुन ठेवितसे स्व-दास॥
पापी कृतघ्न अतिदांभिक वित्तदेव
अन्यांस नित्य लुटणे कृति ही सदैव
ऐसे असून ‘अम्हि संस्कृत’ बोलतात
ना लाज ती जणु अणूहि तदंतरात॥
जातील तेथ करिती भयद स्मशान
अन्यांस नागवुनिया करितात दीन
जे कोणि या पशुंस संस्कृत नाव देती
त्यांना नसे लव विचार उदार चित्ती॥
==
अन्यांस जो तुडवितो पशू त्या गणावे
त्या व्याघ्र वा वृक म्हणा, नर ना म्हणावे
तो रानटी पतित, संस्कृति ती न त्याला
न स्थान यन्मनि असे लव बंधुतेला॥
ओतीत तोफ वरती फिरवी विमाने
माने तसा विहरतो मिरवे मदाने
ही संस्कृती जरि असे, वृकव्याघ्ररीस
त्यांना सुसंस्कृत म्हणा मनुजापरीस॥
स्वार्थांध नित्य बनुनी करिती लढाई
शस्त्रे पहा अमुचि! हीच सदा बढाई
रक्तार्थ जे तृषित चाटित ओठ नित्य
माझे सुसंस्कृत तया वदती न ओठ॥
जेथे असे विजय, जेथ असेल वित्त
तेथेच सुसंस्कृत असे, न असेच सत्य
मोठे यदीय मन, सर्व समान मानी
त्यालाच संस्कृति असे, नच ती विमानी॥
मानव्य ना अवगणी न कुणाहि जाची
जो काळजी निज करी करिही पराची
अन्यापदा बघुन धावत शीघ्र जाई
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणा न दुजा कुणाही॥
कोणी न या जगि असो कधिही गुलाम
नांदो स्वतंत्र सगळे, मनि हाच काम
दीना साहाय्य करण्या निरपेक्ष धावे
त्याला ‘सुसंस्कृत’ विशेषण हे मिळावे॥
ज्याला समस्त जग हे अपुलेच वाटे
दु:खी कुणीहि बघुन स्वमनात दाटे
ज्यालास्वदेश सगळे निजबंधु सारे
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणाल तरी खरे रे॥
पोळी तुपात भिजवील न आपुलीच
संसार जो करि न अन्य लुटून नीच
मोदे मरेल इतरां हसवावयाला
तुम्ही ‘सुसंस्कृत’ खरा म्हणणे तयाला॥
ना आढ्यता, सरलता मधुरा समीप
डोळे यदीय गमती अनुराग-दीप
कापट्य ना मनि, विनम्र विशुद्ध शील
त्याला ‘सुसंस्कृत’ अशी पदवी खुलेल॥
लावीत शोध म्हणुनी न सुधारलेला
ओतील तोफ म्हणुनी न सुधारलेला
ज्याचे उदार मन अंतर ते विशाल
त्याला ‘सुसंस्कृत’ असे म्हणणे खुशाल॥
जाईन मी मरुन, ना दुसरे मरोत
जाईन मी शिणुन ना दुसरे शिणोत
ऐसे म्हणे, हृदयि जो धरि दीनरंक
त्याला ‘सुसंस्कृत’ तुम्ही म्हणणे विशंक॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP