भारतास! - मनोहरा भारता! मदंतर देवा!...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मनोहरा भारता! मदंतर देवा! त्वन्मुखकळा
शोभेल कधी दिव्ये तेजे कळे कळेना मला
मोहरात्र संपेल कधी ही उषा कधी येइल
सदभाग्याची सुंदर किरणे कदा बरे पसरिल
स्वार्थ कधी जाईल लयाला, कलह कधी सरतिल
सद्धर्माची परमैक्याची फुले कधी फुलतिल
हे भाइभाइचे परि होतील कधी हिंदिजन
कधी हृदया मिळतिल हृदये, जोडेल मनाला मन
उठतील कधी तेजाने हातात हात घालुन
अलौकिक अपूर्वा कृति करितिल त्वत्सुत कधी निर्मळ
आनंदाश्रू त्वन्नयनांतुन वाहवतिल घळघळ॥
अस्मन्माता करु स्वतंत्रा ध्येय हेच लोचनी
त्वत्पुत्रांच्या दिसुनी केव्हा उठतिल त्वन्मोचना
जपती अजुनी निज शरिरांना अमूल्य ठेव्यापरी
मरणाची ती भीति क्षुद्रा अजुन तदीयांतरी
निज आप्तांच्या निज गेहांच्या मोही हे अडकती
रडती, पडती, प्रखरता न ता पेटवी चित्ताप्रती
तोडितील आई! केव्हा त्वत्सुत हे मायापाश
त्वत्स्वातंत्र्याचा केव्हा लागेल एक त्या ध्यास
त्वदभक्तीचा तो केव्हा दरवळेल तन्मनि वास
देशभक्त तो रक्त एकच व्रती इतर विसरुन
घेइ करी जो वाण सतीचे वज्रमूर्ति होउन॥
नयनी, वदनी, भाळी, ज्यांच्या देशभक्ति रेखिली
नररत्ने ना अशी सहस्त्रावधि अजुनी देखिली
ज्यांचे जीवन तहानलेले स्वातंत्र्यसुधेस्तव
तळमळते जळते मन ज्यांचे, धीर न धरिते लव
उच्चारी आचारी ज्यांच्या अखंडित प्रगटते
स्वातंत्र्याची मंगल गंगा, तरुण असे कितिक ते?
भोगावरती दृष्टि तयांची विलासैकजीवन
अनंतभोगी भ्रमरसम रमे नित्य तयांचे मन
भावना उज्वला नाही मेल्यापरि दिसती तरुण
स्वातंत्र्यरवीचे ज्यांनी आगामी व्हावे अरुण
हसवावे निजजननींचे मुखकमल जयांनी करुण
व्यसनशरण हे तरुण बघोनी जीव किती तडफडे
मदंतराला ठावे, माते! अश्रुसडा मम पडे॥
तुझ्या भारता! वातावरणी जिकडे तिकडे कदा
स्वातंत्र्याचे वारे उठतिल पळावया रिपु-मदा
स्वातंत्र्याचे पुरुषार्थाचे पराक्रमाचे तसे
विचार केव्हा रोमरोमिं ते भरतिल भरपूरसे
देशभक्ति पाजितील केव्हा माता निज लेकरा
देशप्रेमे दिव्ये भरतिल कधी तदीयांतरा
अज्ञानसागरी बुडती, भारतीय माता अजुनी
देशभक्ति पाजील कोण माता जरि पडती निजुनि
देशभक्ती खेळे जो ना मातांच्या नयनी वदनी
तोवरि नाही आशा, देशा! त्वदुद्धृतीची मला
दृश्य असे हे नैराश्याचे पाहुन दाटे गळा
मातापितरे शिक्षक रमतिल देशभक्तिसागरी
जेव्हा तेव्हा आशेला मम पल्लव फुटतिल तरी
जिकडे तिकडे एक दिसावे दृश्य देशभक्तिचे
कानी यावे जिकडे तिकडे शब्द देशभक्तिचे
विचारविद्युत एकच खेळो सर्वांच्या हृन्मनी
ध्येय दिसावे एक सर्वदा सर्वांना निशिदिनी
सर्वांच्या दृष्टीपुढती स्वातंत्र्यचित्र शोभावे
सर्वांनी यत्न करावे त्यासाठी जीवेभावे
प्राणचित्त वित्त असे जे सर्वस्व सुखे वेचावे
लाखो जेव्हा अशा विचारे उठतिल मग तळपला
भाग्यसूर्य तव समज भारता! संशय नाही मला
प्रसन्न होतिल दिशा, निराशानिशा नष्ट होइल
त्वदभाग्याचे जगी पवाडे सत्कवि मग गातिल
त्वन्मुखकंजी लावण्याची दिव्य चढेल प्रभा
गगनमंडपी वृंद सुरांचा राहिल येउन उभा
पुष्पवृष्टि करितील तुझ्यावर मग गंधर्वस्वर
यशोगान तव गातिल डोलत प्रेमाने निर्भर
होईल त्रिभुवनी तेव्हा सोहळा महानंहाचा
बोलतील एकामेका जन सारे नाचा नाचा
शांतीचा मांगल्याचा स्नेहाचा सौभाग्याचा
तो दिन येइल त्वत्पुत्र जरी वेडे त्वदभक्तिने
होतील, करितिल शर्थ जिवाची मरतील स्फूर्तीने॥
-धुळे तुरुंग, जून १९३०
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP