निराधार - फुलापरी दंवापरी हळु मदीय ...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
फुलापरी
दंवापरी
हळु मदीय मन
विजेपरी
विषापरी
कठोर सारे जन॥
तृषा मला
क्षुधा मला
मदीय कंठ प्राण
कण न मिळे
जळ न मिळे
मजसि मारित बाण॥
नयन झरे
हृदय भरे
कुणाचे पाहु दार
दार लाविती
हाकलुन देती
कुणि न मज आधार॥
अंधार पडे
गगन रडे
वणवण मी करित बाळ
तुझ्या दारी
आलो तारी
करि तू तरि सांभाळ॥
अंगावरुन
हात फिरवून
घे मला जवळ
डोळे पुशी
बोले मशी
प्रेमे दे कवळ॥
अंकि निजव
गीते रिझव
ताप मम सरो
तूहि निष्टुर
होशि जरि दूर
तरि हा दारी मरो॥
-त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2018
TOP