मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
काय करावे मी मेघासम विचरा...

मेघासारखे जीवन - काय करावे मी मेघासम विचरा...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


काय करावे
मी मेघासम विचरावे॥

तनुवर दु:खाचे कांबळे
चिंता-चपला हृदयी जळे
शांति क्षणभर मज ना मिळे॥ काय....॥

कधि सन्मित्रसंगतीमधे
घटकाघटका रमती मुदे
कधि मी फटिंग कोठे उडे॥ काय....॥

कधि मी शुभ्र रुप्याच्या परी
कधि सोनेरी वेषा करी
परि ना ओलावा अंतरी॥ काय....॥

कधि मी जनमतवा-यासवे
जाऊ देतो मजला जवे
होतो सुज्ञ परी अनुभवे॥ काय....॥

कधि किति अधोगती पावतो
थोराथोरांशिहि झगडतो
टपटप अश्रू मग ढाळितो॥ काय....॥

कधि मी वरवर किति जातसे
मन हे चिदंबरी रमतसे
इवलेही मालिन्य न दिसे॥ काय....॥

कधि मी होतो मुनि जणु मुका
बघतो प्रसन्न प्रभुच्या मुखा
लुटितो अनंत आंतर सुखा॥ काय....॥

कधि मी जगा सुपथ दावितो
मोठ्यामोठ्याने गरजतो
हाका मारुन मी शिकवितो॥ काय....॥

येते कधि मन ओसंडुन
येतो प्रेमे ओथंबुन
तप्ता शांतवितो वर्षुन॥ काय....॥

कधि गगनाहुन गुरु होतसे
कधि बिंदुकले मी बनतसे
ब्रह्मस्वरुप अनुभवितसे॥ काय....॥

कधि मी हासतो रडतो कधी
कधि मी पडतो चढतो कधी
कधि कुमती मी परि कधि सुधी॥ काय....॥

कधि वाक्पटू केवळ कोरडा
कधि मी भरलेला हो घडा
कधि जनसंगत कधि मी सडा॥ काय....॥

ऐशा अनंत करितो कृति
अनुभवितो मी विविध स्थिति
अंती मिळविन परि सदगति॥ काय....॥

जीवन यापरि मी नेइन
दिन मी ऐसे मम कंठिन
मजला आणिक ते मार्ग न॥ काय....॥

कधि तरि पूर्णत्वा पाहिन
रसमय अंतर्बहि होइन
सेवा करुनी मग राहिन॥ काय....॥

गळेन शिणलेली तनु यदा
सिंधुत बुडेल हा बुडबुडा
मिळविन मंगल सच्चित्पदा॥ काय....॥

-अमळनेर, छात्रालय १९२६

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP