मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
होतो मी कासावीस। झुरतो मी...

झुरतो मी रात्रंदिवस - होतो मी कासावीस। झुरतो मी...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


होतो मी कासावीस। झुरतो मी रात्रंदिवस॥
श्रद्धेच्या दुबळ्या हाती। त्वत्प्रकाश धरण्या बघतो
बाळ जसा भूमीवरुनी। चंद्राला धरण्या धजतो
अंधारामधुनी देवा। त्वन्निकट यावया झटतो
मूल मी कळेना काही
कावराबावरा होई
डोळ्यांना पाणी येई
अंतरी तुझा मज ध्यास॥ झुरतो....॥

त्वत्प्रसाद मज लाभेल। होती मम हृदयी आशा
तू प्रेम मला देशील। होती मम हृदयी आशा
तू पोटाशी धरशील। होती मम हृदयी आशा
परि माय माउली रुसली
या बाळावर रागवली
ती येईना मुळि जवळी
ये माझ्याजवळी बैस॥ झुरतो....॥

रात्रीच्या समयी शांत। सळसळती तरुची पाने
मी खिडकीपाशी जात। सोत्कंठ बघे नयनाने
प्रभु माझा बहुधा येतो। घेतली धाव का त्याने
बाहेर खिडकीच्या हात
धरण्याला त्याचा हात
मी काढितसे सोत्कंठ
ठरला परि केवळ भास॥ झुरतो....॥

आकाशी बघुनी तारे। गहिवरते माझे हृदय
हे थोर थोर पुण्यात्मे। का करिति प्रभुस न सदय
दिसती न तयांना काय। अश्रू मन्नेत्रि जे उभय
हे मंगल निर्मळ तारे
कथितिल प्रभुला सारे
हृदयातिल माझे वारे
बाळगितो ही मनि आस॥ झुरतो....॥

प्रभु आला ऐसे वाटे। तो दिसे निबिड अंधार
हृदयात जरा आनंद। तोच येइ शोका पूर
सुमनांचा वाटे हार। तो करित भुजंग फुत्कार
रडकुंडिस येई जीव
कोमेजे हृद्राजीव
करितो न प्रभुजी कींव
प्राशावे वाटे वीष॥ झुरतो....॥

पंकांतुन यावे वरती। रमणीय सुगंधी कमळे
भूमीतुन यावे वरती। अंकुरे मृदुल तेजाळे
दु:खनिराशेतुन तेवी। उघडी मम आशा डोळे
परि हिमे कमळ नासावे
अंकुरा किडीने खावे
आशेने अस्ता जावे
दु:खाची देउन रास॥ झुरतो....॥

आसनिराशेचा खेळ। खेळुनी खेळुनी दमलो
वंचना पाहुनी माझी। सतत मी प्रभुजी श्रमलो
हुंदके देउन देवा! ढसाढसा कितिकदा रडलो
तुज पाझर देवा फुटु दे
त्वन्मूर्ति मजसि भेटू दे
त्वच्चरण मजसि भिजवू दे
हसवी हा रडका दास॥ झुरतो....॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP