मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
सत्याचा जगतात खून करिती, ...

खरा हुतात्मा! - सत्याचा जगतात खून करिती, ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


सत्याचा जगतात खून करिती, सत्यास फासावरी
देती हे मदमत्त पापनिरत स्वार्थांध हे आसुरी
अन्याया अभिषिक्त आज करिती निर्लज्ज सिंहासनी
जे जे सत् अवकाश त्यास नुरला त्या न विचारी कुणी॥

दंभाला कवटाळिती सतत हे पापासची पूजिती
संपददैवत अर्चिती गरीब जे त्यांचे बळी अर्पिती
सारासार-विवेकअल्प न दिसे सदबुद्धि झाली मृत
लोकी या भरले किती तरी पहा सर्वत्र हे दुष्कृत॥

ऐशा या समयी जगास सगळ्या सत्पंथ जो दावितो
ध्येयध्यास उदात्त आत्मकृतिने लोकांस जो लावितो
क्रांती जीवनि जो अपूर्व घडवी पाडी उभारीतसे
विश्वा उन्नत जो करी मनि धरा की तो हुतात्मा असे॥

विश्वाला कवटाळितो पसरुन प्रेमे भुजा आपुल्या
प्रेमाने बदलावया बघतसे ज्या कल्पना हो खुळ्या
क्रांती रक्तविहीन जो करितसे दीना जना उद्धरी
सोशी कष्ट अनंत त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

क्लेशाने हसतो न धार खचतो हासेल फासावरी
ध्येयप्राप्ति करावयास पशिता ती ना कधी आदरी
होवो अल्प तरीही तुष्ट हृदयी आशा सदा अंतरी
कर्तव्यार्थ जगे, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

येती संकटराशी घोर ठिक-या त्यांच्या प्रतापे करी
स्वार्थापासुन नित्य दूर, अचव श्रद्धा अमर्त्या वरी
ज्याचे निर्मळ हेतु, दंभ लव ना, निष्पाप बाळापरी
वैराग्याकर थोर, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

केले साध्य जगात काय न बघा, ते यत्न केले किती
साध्यासाठि नरे, तयावरुनिया घ्या तत्परीक्षेप्रती
ध्येयासाठि उदंड यत्न करि जो आजन्म, जाती जरी
सारे बंधु विरुद्ध, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

सोशी नित्य दुरुक्ति शांत हृदये, दारिद्र्य ज्याचे धन
जाई धावुन देखताच दुबळा दु:खार्त कष्टी जन
पापीही जवळी करी निजगुणे पावित्र्य देई, धरी
प्रेमे त्या हृदयी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

धिक्कारी न कुणा, गुणास बघतो, तत्त्वा न सोडी कधी
देशद्रोह धरी दुरी, शिरति ते ज्याच्या मनी ना कधी
देवा एक भजे तयास हृदयी ध्यातो, न भीती धरी
कोणाचीहि जगी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

द्रव्ये मानमरातबे न, पदवीदाने न होई वश
सत्तेने दबला न जात विलसे निर्दोष ज्याचे यश
चारित्र्यावर डाग नाही इवला, घालून तेला जरी
डोळ्यांमाजि बघाल, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी॥

ध्येयी जीवनि भिन्नती न उरली ते ध्येय यज्जीवन
ना रात्री दिन वा बघे श्रमतसे खर्ची तदर्थ क्षण
ध्येयाचे अनिवार वेड, न जगी त्यागा यदीया सरी
ऐशा थोर नरास दिव्य पदवी शोभे हुतात्मा खरी॥

ऐशी थोर महा विभूति दिसते जेव्हा धरित्रीवरी
स्वार्थी दुष्ट असत्य दंभमति जे ते कापती अंतरी
सत्या स्थापुन प्रेम निर्मुन जगा देतो धडे उज्वल
जे होता पडले तयांस उठवी दे दुर्बळाला बळ॥

ऐसा एक जगात आज मजला गांधी महात्मा दिसे
दीनांसाठी सदा जळे तळमळे सत्यास पूजीतसे
होती जी मळली धुळीत पडली ती भारती संस्कृती
देवोनी उजाळा तिला करि नवी वानू किती तत्कृती॥

गांधी धर्मच, मूर्त सत्य गमती, धर्मार्थ तज्जीवन
गांधी प्रेमच मूर्त, निर्मळ सदा प्रेमार्द्र त्यांचे मन
गीता चालति बोलती मज गमे, गीतार्थ त्यांची कृती
ऐशी थोर विभूति लाभत अम्हां, भाग्यास नाही मिती॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP