तं नारदः प्रियतमो रिक्थादानामनुव्रतः ॥ शुश्रूषमाणः शीलेन प्रश्रयेन दमेन च ॥४१॥
॥ टीका ॥
तो नारद महापवित्र ॥ ब्रह्म्याचा मानसपुत्र ॥ परमार्थालागीं तत्पर ॥ सर्वस्वें सादर पितृसेवेसी ॥८४॥
तोचि आर्तीचा पूर्णचंद्र ॥ विवेकाचा क्षीरसमुद्र ॥ वैराग्याचा महारुद्र ॥ आचरे नरेंद्र शमदमयुक्त ॥७८५॥
पितृसेवा तोचि स्वार्थ ॥ मानुनी सेवेसी नित्यरत ॥ सदा सेवेचें दृढव्रत ॥ निज परमार्थ साधावया ॥८६॥
शमें ज्ञानेंद्रियां उपशम ॥ दमें कर्मेंद्रियां नित्यकर्म ॥ सेवा करोनी उत्तमोत्तम ॥ नारद परमप्रिय जाहला ॥८७॥
ज्ञानार्थीं अति उद्भट ॥ अंतर्निग्रही एकनिष्ठ ॥ आज्ञाधारी अतिश्रेष्ठ ॥ परमवरिष्ठ सुशीलभावें ॥८८॥