चतुःश्लोकी भागवत - श्लोक १ ते ४

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
श्रीशुकउवाच ॥
आत्ममायामृते राजन्परस्यानुभवात्मनः ॥ नघटेतार्थसंबंधः स्वप्न द्रष्टुरिवांजसा ॥१॥
बहुरूप इवाभाति मायया बहुरूपया ॥ रममाणौ गुणश्वेस्या ममाहमिति मन्यते ॥२॥
यर्हि वाव महिम्नि स्वे परस्मिन्कालमाययोः ॥ रमेत गतसंमोहस्त्यक्त्वोदास्ते तदोभयम् ॥३॥
आत्मतत्त्वविशुध्यर्थं यदाहभगवानृतम् ॥ ब्रह्मणे दर्शयन् रूपमव्यलीकव्रतादृतः ॥४॥
श्रीमद्भागवत, द्वितिय स्कंध अध्याय ॥९॥

॥ टीका ॥
अज्ञानें जीव जीवभाव ॥ त्यासि द्यावया निजात्म ठाव ॥ शुक सांगे सुगम उपाव ॥ इतिहास पाहाहो हरिविरिंचींचा ॥३६॥
जें श्रीमुखें श्रीभगवंतें ॥ सांगीतलें विधातयातें ॥ संतोषोनि उत्तम वृत्तें ॥ निजरूपातें दावोनि तेणें ॥३७॥
जीवासी दृढ देहबुद्धि ॥ भगवंतही देहसंबंधी ॥ तैं त्याचे भजनें मोक्षसिद्धी ॥ नघडे त्रिशुद्धि जीवासिया ॥३८॥
ऐसी उठों पाहे आशंका ॥ तेविषयींचें उत्तर आइका ॥ जीवा आणि जगन्नायका ॥ देहसमत्व देखा नघडे ॥३९॥
जाति पाहतां दोन्ही दगड ॥ परी रत्न गार नव्हे पाडिपाड ॥ तेवीं देवाजीवा समत्व दृढ ॥ हें केवळ मानिती मूढ न ज्ञाते ॥४०॥
धूम्र ज्वाळा पाहतां दोन्ही ॥ जरी जन्मती एके स्थानी ॥ तम निवारे ज्वाळांपासुनी ॥ धूमा नमानी तम दाटे ॥४१॥
जेव ज्ञानस्वरूप सत्य ज्ञानी ॥ परी तो झाला देहाभिमाने ॥ ज्ञान वेंचलें विषयध्यानीं ॥ यालागीं दृढबंधनीं तो पडला ॥४२॥
आपणियाचिसारिखा देख ॥ हरि मानी पंच भौतिक ॥ त्या परममूर्खातें देख ॥ आकल्प दुःख सरेना पैं ॥४३॥
ऐसेहि जे जडमूढ मूर्ख ॥ भावार्थें झाल्या भजनोन्मुख ॥ त्यांचें निःशेष झडे दुःख ॥ ते निजात्मसुख पावती देखा ॥४४॥
भग वद्देह चैतन्यघन ॥ तेथें वसेना देहाभिमान ॥ यालागीं करितां त्याचें भजन ॥ अज्ञान जन उद्धरती ॥४५॥
आनंदोनि बोले शुकमुनी ॥ परीक्षिती भक्तशिरोमणी ॥ जो निजदेहीं निरभिमानी ॥ तो मी मानी परमेश्वर ॥४६॥
जो निःशेष निरभिमान ॥ त्याचा देह तो चैतन्यघन ॥ त्याचें करितां भजन ॥ जडमूढ जन उद्धरती ॥४७॥
निरभिमानाहोनी परता ॥ ठाव नाहीं गा परमार्था ॥ तो तैच ये आपुल्या हाता ॥ जैं अनन्यता हरिभक्ती ॥४८॥
हा मुख्य भगवंत भजतां ॥ जीवासी केवि उरे अहंता ॥ यालाईं भजनीं मुक्तता ॥ जाण तत्त्वता परीक्षिती तूं ॥४९॥
भगवद्देहाचें श्रेष्ठपण ॥ विशेषेंसी अतिगहन ॥ त्या देहाचें होतां दर्शन ॥ जडमूढ जन सज्ञान होती ॥५०॥
ऐसें निजदेहाचें लक्षण ॥ जाणोनियां नारायण ॥ हरावया ब्रह्मयाचें अज्ञान ॥ निजात्मदर्शन देऊं इच्छी ॥५१॥
न करितां भगवद्भक्तीं ॥ ब्राम्ह्यासी नव्हे ज्ञान प्राप्ती ॥ तेथें इतरांची कोण गती ॥ अभजनीं प्राप्ती पावावया पैं ॥५२॥
जीवाचें निरसावया अज्ञान ॥ मुख्यत्वें असे भगवद्भजन ॥ स्वयें करिताहे चतुरानन ॥ तेंचि निरूपण शुक सांगे ॥५३॥
केवळ चैतन्य विग्रहो ॥ सत्यसंकल्प भगवद्देहो ॥ त्याचे दर्शनार्थ पहावो ॥ तपादि उपावो हरी प्रेरी ॥५४॥
कामनारहित निष्पाप ॥ श्रद्धापूर्वक सद्रूप ॥ निष्कपट करितां तप ॥ भगवत्स्वरूप तैं भेटे ॥५५॥
नकरितां भगवद्भजन ॥ ब्रह्मा होऊं न शके पावन ॥ यालागीं तपादि साधन ॥ स्वयें निजभजन हरी प्रेरी ॥५६॥
या ब्रह्मयाची निजस्थिती ॥ कल्पाचिचे आदिप्राप्ती ॥ कैशी होती परीक्षिती ॥ ते मी तुजप्रती सांगेन पां ॥५७॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP