चतुःश्लोकी भागवत - आरंभ
एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीएकनाथाय नमः ॥ श्रीसच्चिदानंदाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
॥ श्लोक ॥
गुरुचरणप्रतापें पुण्यपापें जळालीं ॥ त्रिभुवनसमतीर्थें ज्ञानगंगें मिळालीं ॥ शुभअशुभ पहातां भावना राम झाली ॥ निशिदिनिं सद्गुरुराया उन्मनी झोंप आली ॥१॥
आदीं वंदूं गणनायका ॥ नरकुंजरा अलोलिका ॥ नरगजस्वरूपें तूं एका ॥ नमन श्री विनायका सद्गुरू ॥१॥
तुज सद्भावें करितां नमन ॥ विघ्नचिहोय निर्विघ्न ॥ यापरी तुझी कृपा पूर्ण ॥ चैतन्यघन गणराजा ॥२॥
सालंकृतशुक्लांबरी ॥ हंसारुढी परमेश्वरी ॥ सद्गुरुरूपें वागेश्वरी ॥ म्यां मजमाझारीं वंदिली ॥३॥
वाच्यवाचक वदता ॥ तिहींसी आली एकात्मता ॥ यापरी येथें वाग्देवता ॥ गुरुत्वें तत्वतां वंदिली ॥४॥
पूर्वपरंपरा पूज्यता ॥ एकरूप एकनाथा ॥ आह्मां सद्गुरुची कुळदेवता ॥ एकात्मता एकवीरा ॥५॥
तिचेनी नांवें माझेंही नांव ॥ ह्मणोनी मिरवी कवि - वैभव ॥ तंव नामरूपा नुरोचि ठाव ॥ हा निजानुभव कुळदेव्या ॥६॥
आतां वंदूं संतसज्जन ॥ जे सर्वांगी चैतन्यघन ॥ ज्यां सगुण निर्गुण समसमान ॥ जे निजजेवन सद्भावा ॥७॥
ज्यांची सद्भावें ऐकतां गोष्टी ॥ चैतन्यघन होय सृष्टी ॥ लागे परमानंदीं दृष्टी ॥ ऐसी कृपादृष्टी साधूंची ॥८॥
आतां वंदूं श्रीजनार्दन ॥ ज्याचें ऐकतां एकवचन ॥ त्रैलोक्य होय आनंदघन ॥ जें निजजीवन सच्छिष्या ॥९॥
त्याचे चरणींची माती ॥ अवचटें लागल्या स्वचित्तीं ॥ जन्ममरणा होय शांती ॥ चारी मुक्ती वोळगण्या ॥१०॥
तो जिकडे पाहात जाय ॥ तो दिशा सुखरूप होय ॥ त्याचे जेथें लागती पाय ॥ तेथें धांवे लवलाहें परमानंदु ॥११॥
यालागीं त्याचे वंदितां चरण ॥ जीवासी वोडवे शिवपण ॥ चरणस्पर्शें स्वानंद पूर्ण ॥ अगाध महिमान गुरुचरणीं ॥१२॥
त्याची सद्भावें जैं घडे सेवा ॥ तैं जीवत्व शोधितां नमिळे जीवा ॥ तंव शिवही मुकला शिवभावा ॥ हा अभिनव ठेवा सेवेमाजीं ॥१३॥
तो ज्यासी आश्वासी आपण ॥ त्यासी हरिहर वंदिती पूर्ण ॥ कळिकाळ घाली लोटांगण ॥ रिघती शरण कामक्रोध ॥१४॥
ऋद्धिसिद्धिही अंगें आपण ॥ त्याचे घरींचें वाहती जीवन ॥ एवढें गुरुदास्याचें महिमान ॥ सभाग्यजन पावती ॥१५॥
गुरुसेवेहोनी वरुता ॥ उपाय नाहीं परमार्था ॥ हे सत्य सत्य माझी वार्ता ॥ वेदशास्त्रार्था संमत ॥१६॥
ते गुरुसेवेची अभिनव खूण ॥ स्वामीसेवक न होती भिन्न ॥ नुरवुनियां मीतूंपण ॥ सेवका जनार्दन संतुष्टे ॥१७॥
हें वर्म जंव नये हातां ॥ तंव सेवा न घ डे गुरुभक्ता ॥ ज्याचेहाता चढे एकात्मता ॥ तो शिष्य सरता गुरुचरणीं ॥१८॥
दुर्घट वाटेल एकात्मता ॥ तंव गुरुशिष्य आंतौता ॥ एकचि परमात्मा तत्त्वतां ॥ हे एकात्मता स्वतःसिद्ध ॥१९॥
एकात्मता श्रीजनार्दन ॥ नुरवूनियां मीतूंपण ॥ शिष्याची सेवा संपूर्ण ॥ सर्वकर्मीं आपण अंगीकारी ॥२०॥
नुरवूनी मीतूंपणाची वार्ता ॥ वदविताहे ग्रंथकथा ॥ तेथें मी एक कविकर्ता ॥ हे कोणें अहंता धरावी ॥२१॥
मज नाहीं ग्रंथअहंता ॥ ह्मणोनि श्रोत्यांतें विनविता ॥ ते विनवणीच तत्वतां ॥ अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥
तंव माझें जें कां मीपण ॥ तें सद्गुरु झाला आपण ॥ तरी करितांही विनवण ॥ माझें मीपण मज नलगे ॥२३॥
माझी क्रिया कर्म कर्तव्यता ॥ सद्गुरुचि झाला तत्वतां ॥ आतां माझ्या मीपणाची अहंता ॥ मजसी सर्वथा संबंध नाहीं ॥२४॥
आतां अवधारा ग्रंथकथन ॥ कल्पादि हें पुरातन ॥ हरिब्रह्मयाचें जुनाट ज्ञान ॥ तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥
जेणें संतोषती ज्ञानसंपन्न ॥ सुखें सुखरूप होती मुमुक्षुजन ॥ तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान ॥ तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥
जो जडमूढ होता तटस्थ ॥ तो चौश्लोकीं जाण नेमस्त ॥ ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ ॥ तो अगाध ज्ञानार्थ अवधारा ॥२७॥
पावोनि चतुःश्लोकींचें ज्ञान ॥ ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न ॥ करितां सृष्टीचें सर्जन ॥ तिळभरी अभिमान बाधीना ॥२८॥
त्या ज्ञानाची रसाळ कथा ॥ मर्हाटीयां सांगेन आतां ॥ येथें अवधान द्यावें श्रोतां ॥ हें विनवणी संतां सलगीची ॥२९॥
पोरोण सलगी दिधली स्वामी ॥ ह्मणोनि निःशंक झालों आह्मी ॥ परी जें जें बोलेन ज्ञानांग मी ॥ तें सादर तुह्मीं परिसावें ॥३०॥
ऐसें प्रार्थुनी श्रोतेजन ॥ प्रसन्न केले साधुसज्जन ॥ पुढील कथेचें अनुसंधान ॥ एका जनार्दन सांगेल ॥३१॥
आदिकल्पाचिये आदीं ॥ एकार्णव जळामधीं ॥ ब्रह्मा झाला जडमूढबुद्धीं ॥ सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥
यापरी केवळ अज्ञान ॥ नाभिकमळीं कमळासन ॥ विसरला आपणा आपण ॥ मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥
यालागीं श्रीनारायण ॥ द्यावया निजात्मशुद्धज्ञान ॥ आपुली निजमूर्ती चिद्घन ॥ तिचें दर्शन देऊं पाहे ॥३४॥
श्रीनारायणाची दिव्य मूर्ती ॥ देखतांचि स्फुरे स्फुर्ती ॥ तोचि इतिहास परीक्षिती ॥ ज्ञानगर्भ स्थिती शुक सांगे ॥३५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2017
TOP