चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३२

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


यावानहं यथाभावो यद्रूपगुणकर्मकः ॥ तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् ॥३२॥

॥ टीका ॥
मी जेवढा जैसा तैसा ॥ जग न होऊनि जगत्वाऐसा ॥ ऐसा स्वरूपतेचा पूर्ण ठसा ॥ तुज प्राप्त हो हे दशा अनुग्रहें माझ्या ॥४१०॥
तत्वगुणेंवीण सत्वस्थिती ॥ जेणें करी धरी हरी त्रिजगती ॥ परी आंगीं नलागे अहंकृती ॥ हा भाव प्रजापती प्राप्त हो तुज ॥११॥
मी सगुण निर्गुण रूपें धरीं ॥ परी न विकारें रूपाकारीं ॥ ये स्वरूपतेची निजथोरी ॥ प्राप्त हो झडकरी विधात्या तुज ॥१२॥
रूपीं असोनि अरूपता ॥ गुणीं वर्तोनि गुणातीतता ॥ हे मदनुग्रहें पूर्णावस्था ॥ पावसी तत्त्वतां परमेष्ठी तूं ॥१३॥
जेवीं जळीं असोनि गगन ॥ बोलें हो नजाणे आपण ॥ तेंवीं माझें कर्माचर्ण ॥ अकर्तात्मता पूर्ण परमात्मयोगें ॥१४॥
सृष्टिस्रजनालागीं तत्त्वतां ॥ सकळ कर्मी अकर्तात्मता ॥ मदनुग्रहें पावसी विधाता ॥ ह्मणोनि माथां ठेविला हात ॥४१५॥
कृपा पद्महस्त ठेवितां माथां ॥ ब्रह्मावबोध पावे विधाता ॥ करस्पर्शें निवाला विधाता ॥ तें सुख सांगतां सांगतां नुरे ॥१६॥
एवं स्वयंभू ऐशिया परी ॥ संबोधूनि केला ब्रह्माधिकारी ॥ हे जाणोनि आपली थोरी ॥ पूर्णत्वाचा करी प्रबोध त्यासी ॥१७॥
सद्गुरूनें अनुग्रहिल्यापाठीं ॥ शिष्याची स्वरूपीं प्रवेशे दृष्टी ॥ हें पुरुषोत्तम जाणोनि पोटीं ॥ करसंपुटीं आश्वासिला ॥१८॥
विष्णुविरिंचीसंवादकथन ॥ कल्पादीचें जुनाट ज्ञान ॥ तेथें श्रोतीं द्यावें अवधान ॥ आनंदघन वोळला ॥१९॥
साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं ॥ यालागीं हरीशी कळवळ मोठी ॥ गुह्यज्ञानाची गोड गोष्टी ॥ उठाउठी हरी सांगें ॥४२०॥
पुत्र जाहला ब्रह्माधिकारी ॥ येणें उल्हासे श्रीहरी ॥ जें गुह्यज्ञन असे जिव्हारीं ॥ तें काढून बाहेरी सांगे तयासी ॥२१॥
विधात्यासि विचारितां ॥ स्वयें देवचि माता पिता ॥ तो उभयस्नेहो एकात्मता ॥ निजगुह्य तत्त्वतां सांगेल त्यासी ॥२२॥
श्रीहरीस पुत्रस्नेह अमुप ॥ त्यासि दाटूनि सांगे ‘ तप तप ’ ॥ आपलें दाखवूनि निजरूप ॥ ज्ञान निर्विकल्प आदरें सांगे ॥२३॥
पित्यानें जोडिलें जें वित्त ॥ पुत्र अधिकारी होय तेथ ॥ यालागीं गुह्यज्ञान समस्त ॥ देईल निश्चित विधात्यासी ॥२४॥
इतरासी ज्ञान सांगतां ॥ अमूप वाढेल ग्रंथकथा ॥ पुत्रस्नेहें कळवळोनि आतां ॥ चौंश्लोकीं निजात्मता उपदेशी देवो ॥४२५॥
यालागीं श्रोते सज्जन ॥ धांवा पावा सावधान ॥ कल्पादी जें पुरातन ॥ अनादि ज्ञान हरी सांगे ॥२६॥
ज्ञानधन नारायण ॥ देऊंरिघे पुत्राकारणें ॥ एका जनार्दनाचें तानें ॥ विभागी परी नेणें वांटा मागों ॥२७॥
यालागीं श्रीजनार्दनें ॥ मर्‍हाटी वाटा मजकारणें ॥ दीधला ज्ञानें समसमानें ॥ माउली जाणे कदां तान्हें न करी ॥२८॥
यालागीं संस्कृताचा ज्ञानार्थू ॥ मर्‍हाटियामाजीं सांगतू ॥ निडारिला घमघमितू ॥ असे नांदतु परमानंदें ॥२९॥
पहाता चारी श्लोक नेमस्त ॥ तेणें हाता चढे परमार्थ ॥ थोडेचि जोडे निजस्वार्थ ॥ संसाराचें खत समूळ फाटे ॥४३०॥
विषयाचें धरणें उठी ॥ अहंकाराची विरे गांठी ॥ हे चतुःश्लोकींची गोष्टी ॥ सर्वथा धाकुटी ह्मणों नये ॥३१॥
हें चतुःश्लोकी भागवत ॥ स्रष्ट्याशी सांगे श्रीभगवंत ॥ तेथें श्रोतीं व्हावें दत्तचित्त ॥ श्रवणें परमार्थ जिवासी जोडे ॥३२॥
पुढील ज्ञान सांगावयासी ॥ अनुग्रहिलें विधातयासी ॥ मग उल्हासें हृषीकेशी ॥ काय त्यापासीं बोलत ॥३३॥
जें समस्तज्ञानाची आदी ॥ जें सृष्टिकर्माचेही आधी ॥ तें स्वरूप सांगेन त्रिशुद्धी ॥ आइक सुबुद्धी विधातया ॥३४॥
जें निजज्ञानाचें निजमूळ ॥ जें विज्ञानाचें परिपक्क फळ ॥ जें स्वरूप शुद्ध केवळ ॥ सांगेन अढळ आत्मभूतुज ॥४३५॥
जें समस्त गुह्याचें निजसार ॥ जें प्रेमाचें निजभांडार ॥ ज्याचा वेदशास्त्रां नकळे पार ॥ तें परात्पर सांगेन ॥३६॥
जो आनंदाचा निजानंदू ॥ जो बोधाचाही निजबोधू ॥ जेणें होय परमानंदू ॥ तो पूर्णबोधू परियेसी विधातया ॥३७॥
जें सुखाचें परमसुख ॥ जें अमृताचें निजपीयूष ॥ जेणें निवारे जन्मदुःख ॥ तें ब्रह्मतारक ऐक विधात्या ॥३८॥
जें मनें नाहीं देखिलें ॥ जें बुद्धीनें नाहीं ओळखिलें ॥ तें निजस्वरूप आपुलें ॥ सांगेन संचलें परमेष्ठी ॥३९॥
ज्यापूर्वीं कोणी नाहीं ॥ शेवट ठाईं नपडे कांहीं ॥ ऐसें स्वरूप जें कांहीं ॥ तें सांगेन पाही परमेष्ठी ॥४४०॥
मीचि एक असुळ विसुळ ॥ मीच एक सकळीं सकळ ॥ मीचि एक सूक्ष्मस्थूळ ॥ तें स्वरूप प्रांजळ परियेसी ॥४१॥


References : N/A
Last Updated : July 30, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP