चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३७

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ॥ भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥३७॥

॥ टीका ॥
ह्या परमगुह्यज्ञानार्था ॥ म्यां सांगितलें निजात्ममता ॥ येणें मतें समस्ता ॥ सृजी मी अलिप्तता ब्रह्मांड कोटी ॥२९॥
मी अव्यक्तपणें व्यक्तीतें धरीं ॥ मी निर्गुणपणें गुणकार्य करीं ॥ मी निःसंग येणें मतें करीं ॥ आंगावरी जग व्यालों ॥६३०॥
नवल या मताची मातू ॥ मी निजांगेंवीण जग होतू ॥ अव्यक्तही व्यक्तिआंतू ॥ न रिघोनि रिघें ॥३१॥
या मताचेनि निजनेटें ॥ मी नामरूपी अवघा वेठें ॥ परी नांवरूपाआंतुवटें ॥ अणुमात्र नपालटे स्वरूप माझें ॥३२॥
येणें मतें मी महाशून्य जालों ॥ शून्यस्वरूपेंसी आकारलों ॥ अतींद्रिय इंद्रियें व्यालों ॥ विऊनि ठेलों वांझोटा मी ॥३३॥
मी विदेहपणें देह धरी ॥ मी अचक्षुपणें डोळें घरीं ॥ मी अकर्ता सर्व कर्में करी ॥ या मतमुद्रेवरी विरिंची ॥३४॥
मज अश्रोत्रा येणें श्रवण ॥ मज अगोत्रा येणें गोत्रपण ॥ मज अघ्राणया येणें घ्राण ॥ मज अचळा चंळपण या मतमुद्रा ॥६३५॥
मज निरसा येणें रसन ॥ मज अभोक्त्या येणें भोजन ॥ मज निःशब्दा येणें गायन ॥ मज अमना मन येणें कल्पनारहित ॥३६॥
मी अजन्मा येणें जन्म धरीं ॥ मी अकर्मा येणें कर्म करीं ॥ मी अनामा येणें नाम धरीं ॥ या मताची थोरी माझी मीच जाणें ॥३७॥
मज अबाहुसि येणें हस्त ॥ मज अचरणा येणें चरण होत ॥ मज अगम्या गमन होत ॥ आप आपल्यांत येणें मतमुद्रा ॥३८॥
या मतयुक्तीचेंनि समसाम्यें ॥ मी न जन्मोनि जन्में ॥ तिर्यग्योनी मत्स्यशूकरादिकूर्में ॥ हे अवतार संभ्रमें पुराणीं वर्णिजे ॥३९॥
या माताचेंन निजबळें ॥ माया आपधाकें पळें ॥ द्वैत निर्दाळितां या मताभिमेळें ॥ मी अकळ आकळे या मतामाजीं ॥६४०॥
नवल या मताचा परिपाकु ॥ मी एकचि होये अनेकु ॥ अनेकीं मी येकला येकू ॥ हा मतविवेकू अतर्क्य ॥४१॥
अभिनव या मताची थोरी ॥ मी एक विस्तारें नानापरी ॥ परी एकपणाच्या अंगावरी ॥ नाहीं दुसरी चीर गेली ॥४२॥
या मताचेनि महायोगें ॥ निजलें ठायीं मी जागें ॥ जागाही निजें, निजोनि जागें ॥ यापरी दाटुगें मत हें माझें ॥४३॥
हें मत नातुडे अष्टांगओगें ॥ हें मत नातुडे महायोगें ॥ हें मत नातुडे स्वर्गभोगें ॥ शिखात्यागें नातुडे मत ॥४४॥
हें मत नातुडे तपें ॥ हें मत नातुडे मंत्रजपें ॥ हें मत नातुडे दिगंबररूपें ॥ शास्त्रपाठें आटोपें नव्हें तैसें ॥६४५॥
हें मत नाटोपें वेदाध्ययनें ॥ हें मत नाटोपे महाव्याख्यानें ॥ हें मत नाटोपे महादानें ॥ बैसतां धरणें नाटोपे मत ॥४६॥
हें मत नाटोपे स्वधर्माचारें ॥ हें मत नाटोपे बहुधाविचारें ॥ हें नाटोपे तीर्थसंभारें ॥ मतमतांतरें नाटोपे हें ॥४७॥
हें मत नाटोपे पढणी पढतां ॥ हें मत नाटोपे त्रिवेणीं बुडतां ॥ हें मत नाटोपे थोरें रडतां ॥ जाणिवा चरफडितां नाटोपे हें ॥४८॥
हें मत नाटोपे वेदविधी ॥ हें मत नाटोपे अष्टमहासिद्धि ॥ हें मत नातुडे नानाछंदीं ॥ हें जीवबुद्धीसी नाटोपे ॥४९॥
हें मत नाटोपे ध्येयध्यानें ॥ हें नाटोपे दृढमौनें ॥ हें मत नातुडे अनुष्ठानें ॥ ज्याचें देखणे तोचि जाणें ॥६५०॥
हे मत नातुडे घराचारीं ॥ हें नातुडे आश्रमांतरीं ॥ हें नातुडे गिरिगव्हरीं ॥ रिघतां कंदरीं नातुडे मत हें ॥५१॥
हें मत नातुडे सिद्धीसाठीं ॥ हें मत नातुडे करितां गोष्टी ॥ हें मत नातुडे कपिलपीठीं ॥ भेददृष्टीं नाटोपे ॥५२॥
हें मत नातुडे तीर्थवासीं ॥ हें नातुडे क्षेत्रसंन्यासीं ॥ हें नातुडे वैराग्यासी ॥ कामक्रोधासी न जिंकितां ॥५३॥
हें मत नातुडे प्रयागस्नानीं ॥ हें नातुडे महास्मशानीं ॥ हें नातुडे गयावर्जनीं ॥ कष्टतां त्रिभुवनीं नाटुडे मत ॥५४॥
हें नातुडे पृथिवी फिरतां ॥ हें नातुडे तीर्थें करितां ॥ हें नातुडे ध्यान धरितां ॥ साधनीं सर्वथा नातुडे हें ॥६५५॥
हें मत नातुडे कथा ऐकतां ॥ हें नातुडे कथा करितां ॥ हें नातुडे शास्त्रार्था ॥ गुरुकृपेविण हातां नये हें मत ॥५६॥
हें मत नातुडे क्षीरसागरीं ॥ हें मत नातुडे वैकुंठशिखरीं ॥ हें मत नातुडे सगुणसाक्षात्कारीं ॥ साम्यसमाधीवरी गुरुकृपें लाभें ॥५७॥
विवेकवैराग्य यथाविधी ॥ विषयविरक्ती निरवधी ॥ सर्वत्र होय समबुद्धी ॥ तैं गुरुकृपा प्रबोधी हे मतसिद्धी माझी ॥५८॥
विवेकाचे निजनेटीं ॥ धडधडीत वैराग्य उठी ॥ विषयाची काढुनी काटी ॥ समाधिदृष्टी समसाम्य प्रगटे ॥५९॥
ऐशी सर्वत्र समबुद्धी ॥ या नांव परमसमाधी ॥ ते समाधीवरी त्रिशुद्धी ॥ माझ्या मताची सिद्धी गुरुकृपा लाभे ॥६६०॥
सर्वत्र जे समसाम्यता ॥ यानांव समाधी तत्त्वतां ॥ परी तटस्थादि काष्ठावस्था ॥ समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥
समाधिमाजीं जो तटस्थ ॥ तो जाणावा वृत्तियुक्त ॥ वॄत्ति असतां समाधिस्थ ॥ तें मी अनंत सत्य नभानी ॥६२॥
मूर्छित वृत्ति असतां पोटीं ॥ समाधि ह्मणणें गोष्टी खोटी ॥ जेथ अहं सोहं विरल्या गांठी ॥ ते समाधि गोमटी मी मस्तकीं वंदी ॥६३॥
ज्वर असतांनाडी आंत ॥ आरोग्य स्नान तोचि घात ॥ तेवीं व्रत्ती असतां, समाधिस्थ ॥ तो जाण निश्चित आत्मघाती ॥६४॥
सर्वभूतीं निजात्मता ॥ तिसी पावोनि जाली सर्व समता ॥ ते बोलती चालती समाधि अवस्था ॥ मजही सर्वथा मानिली ॥६६५॥
ऐशी सर्वत्र समताबुद्धी ॥ त्या नांव परमसमाधी ॥ ते म्यां तुज गुरुकृपें त्रिशुद्धी ॥ यथाविधी प्रबोधिली ॥६६॥
या समाधीच्या समदृष्टीं ॥ संकल्पें सृजी ब्रह्मांडकोटी ॥ विकल्पें संहारीतां शेवटीं ॥ कर्तेपण पोटीं उठोंविसरे ॥६७॥
निजसमाधी समसाम्यता ॥ देखोनी पळाली देह अहंता ॥ तेथमी एक सृष्टीचा कर्ता ॥ या स्फुरणाची वार्ता स्फुरों केलाहो ? ॥६८॥
सिंधुमाजीं पडलें सैधवघन ॥ विरे तंव स्फुरे रवेपण ॥ तें विरालिया संपूर्ण ॥ ‘ मी झालों जीवन ’ हेंही नराहे ॥६९॥
तेवीं मज एक होती बद्धता ॥ आता पवलों मुक्तता ॥ येहिविषींची कथावार्ता ॥ तुज सर्वथा स्फुरेना ॥६७०॥
ऐशीया पूर्ण समता ॥ सृष्टी तुज करितां हरितां ॥ आंगीं न लागे मोहममता ॥ सत्य सर्वथा स्वयंभू ॥७१॥
देशकालें स्वभावतां ॥ कल्पविकल्पमहाकल्पांता ॥ सृष्टि सर्जनाची मोहममता ॥ तुज सवथा बाधीना ॥७२॥
हें मी तुज सांगों काये ॥ अनुभव तूंचि पाहे ॥ जें तुज पूर्णत्व प्रकाशिलें आहे ॥ तेथें होय नव्हे रिघेना ॥७३॥
रोग गेलियाचीं लक्षणें ॥ रोगी नेणे, वैद्य जाणे ॥ तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें ॥ हें नारायणें जाणितलें ॥७४॥
लक्ष भेदितां धनुर्धरें ॥ जेवीं कां निविजे निजकरें ॥ तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें ॥ हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥६७५॥
जें बोधा आलें शिष्यासी ॥ तें न सांगतां कळे श्रीगुरूसी ॥ तेवीं जाणोनियां हृषीकेशी ॥ ह्मणे ब्रह्मयासी सावधान ॥७६॥
‘निजानुभाव पाहे पूर्ण ’ ॥ ऐसें ऐकतां सद्गुरुवचन ॥ चमत्कारला चतुरानन ॥ देहीं देहपण विदेहत्वा आलें ॥७७॥
जीवदशा वोवाडितां ॥ निजात्मता पावोंजाता ॥ ते संधीं सत्वावस्था ॥ असिसप्रेमता वोसंडे ॥७८॥
निजात्मरूपीं पडतां दृष्टी ॥ सुखाचा पुर लोटे पोटीं ॥ हर्षें बाष्प दाटे कंठीं ॥ परेंसी गोष्टी सद्गदित वाचा ॥७९॥
नेत्रीं आनंदाश्रूचिया धारा ॥ सुखोर्मीं कांपे थरथरां ॥ हर्षे उचलल्या रोममुद्रा ॥ स्वेदामृतपुरा सार्द्रत्व ॥६८०॥
अहं सोहं जाले लीन ॥ मनें मन झालें उन्मन ॥ चित्त झालें चैतन्यघन ॥ जीव परिपूर्ण ब्रह्म जाला ॥८१॥
जेथें एक ना दुसरें ॥ सन्मुख ना पाठिमोरें ॥ जें जागें ना निदुसरें ॥ जें सहजान्वयें खरें सदोदित ॥८२॥
जें केंलें ना झालें ॥ जें गेलें ना आलें ॥ जें होतें ना हरपलें ॥ संपूर्णत्वें संचलें परिपूर्ण ॥८३॥
जेथें न साहे रूपनाम ॥ जेथें नसाहे क्रियाकर्म ॥ जेथें न रिघे धर्माधर्म ॥ तें पूर्णब्रह्म परमेष्ठी झाला ॥८४॥
जेथें न रिघे हेतूमातू ॥ जेथें न रिघे दृश्यदृष्टांतु ॥ जिचा नसे आदिअंतू तें वस्तु ॥ सदोदितू विरंची झाला ॥६८५॥
ज्याचा न लागे लागमाग ॥ ज्यासिन लगे अवयव अंग ॥ आंगेवीण अव्यंग ॥ निजवस्तु सांग स्वयंभु झाला ॥८६॥
जेथें दुःखत्वें निरघे दुःख ॥ सुखत्वें निरघे सुख ॥ जिचें हरिहरां न करवे तुक ॥ ते वस्तु सम्यक् स्रष्टा झाला ॥८७॥
जेणें सुखें आनंदमय शंभू ॥ जेणें सुखें सुखरूप झाला स्वयंभू ॥ ते सुखरूप पावला स्वयंभू ॥ आनंदलाभु सद्गुरुकृपा ॥८८॥
भावें सद्गुरूतें भजतां स्रष्टा ॥ पावला स्वस्व रूपता ॥ यालागीं गुरुभक्ती परता ॥ मार्ग परमार्था असेना ॥८९॥
जरी साच चाड परमार्था ॥ तरी भावें भजावे गुरुनाथा ॥ सकल साधनांच्या माथां ॥ जाण तत्त्वतां गुरुभक्ति ॥६९०॥
ज्याचे मुखीं गुरूचें नाम ॥ ज्यासि गुरुसेवा नित्यकर्म ॥ तो देहासहित परब्रह्म ॥ त्यासि कर्माकर्म बाधीना ॥९१॥
ज्यासि स्वानंदें गुरुभक्ती ॥ त्याच्या चरणतीर्था तीर्थें येतीं ॥ वेद बंदीजन होती ॥ सुरनर वंदिती पदरज त्याचे ॥९२॥
गुरुभक्ती नांदे ज्याचे घरीं ॥ यम त्याची तराळकी करी ॥ काळ आज्ञा वाहे शिरीं ॥ तो पूजिजे हरी परमात्मभावें ॥९३॥
गुरुभक्तीचे पवाडे ॥ वर्णितां वेदासि मौन पडे ॥ गुरुभक्तीवरतें चढे ॥ ऐसें चोखडे साधन नाहीं ॥९४॥
शिष्यें करावें माझें भजन ॥ ऐसें वांछी जरी गुरूचें मन ॥ तो गुरुत्वां मुकला जाण ॥ अभिमानें पूर्ण नागवला ॥६९५॥
जगीं दाटुगा ज्ञानाभिमान ॥ धनालागीं विकती ज्ञान ॥ ते जाण शिश्नोदरपरायण ॥ तेथ अर्धक्षण ज्ञान नथारे ॥९६॥
मुख्यत्वें गुरूचें लक्षण ॥ ज्ञान असोनि निरभिमान ॥ सर्वांगीं शांतीचें भूषण ॥ तो सद्गुरू पूर्ण परबह्म ॥९७॥
त्या सद्गुरूची निजभक्ती ॥ सद्भावें करूनि प्रजापती ॥ पावला स्वस्वरूपप्राप्ती ॥ स्वानंदस्थिती निजबोधें ॥९८॥
यापरी चतुरानन ॥ नारायणवचनें जाण ॥ सांडूनि देहाभिमान ॥ ब्रह्म परिपूर्ण स्वयें जाला ॥९९॥
येवढें पद पाप्त झालें ॥ परी न ह्मणे नवें आजि आलें ॥ अनाद्सिद्ध आपुलें ॥ स्वतःसिद्ध संचलें रूप माझें ॥७००॥
ऐसें अनुभवाचे पूर्णोद्गार ॥ जाणोनि सुखावे उपेंद्र ॥ जैसा देखोनियां पूर्णचंद्र ॥ भरितें समुद्र उल्हासे ॥१॥
बालका कीजती सोहळे ॥ तेणें माउलीचे निवती डोळे ॥ तेवीं शिष्य निजबोध आकळे ॥ तंव सुखाचे सोहळे सद्गुरूसी ॥२॥
सेवक परचक्र विभांडी ॥ राजा हर्षाची उभवी गुडी ॥ शिष्य स्वानंदीं दे बुडी ॥ तेणें सुखोर्मी गाढी सद्गुरूसी ॥३॥
तेणें सुखें नारायण ॥ चारी भुजा पसरोन ॥ आलिंगिला चतुरानन ॥ परमानंदें पूर्ण सुखावोनी ॥४॥
आधींच प्रीती पुत्रावरी ॥ तोही जाला ब्रह्माधिकारी ॥ तेणें पूर्णानंदें श्रीहरी ॥ निजहृदयावरी आलिंगी ॥८०५॥
साजचि ब्रह्मा जन्मला पोटीं ॥ यालागीं हरीसी कळवळ मोठी ॥ पूर्णब्रह्म चौश्लोकांसाठीं ॥ त्यासि उठाउठी वोपिता झाला ॥६॥
नमाखतां शब्दाचें वदन ॥ नायकतां श्रोत्राचे कान ॥ नदेखतां वृत्तीचे नयन ॥ चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥७॥
आतळों न देतां गगन ॥ नलागतां सूर्यकिरण ॥ प्राणस्पर्श नहोतां जाण ॥ चतुश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥८॥
दूरीं दुरावोनि अज्ञान ॥ जागें न होतां शहाणपण ॥ मौनेंचि जीवें जीवमारून ॥ चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥९॥
ऐशिया युक्तीं नारायण ॥ निजपुत्रालागीं आपण ॥ थोडे निरूपणें जाण ॥ ब्रह्मपरिपूर्ण केला देवें ॥७१०॥
येथें नघडे हें निरूपण ॥ शिष्य जालिया ब्रह्मसंपन्न ॥ पुत्रस्नेह बापुडे कोण ॥ त्यासि सद्गुरू संपूर्ण पूज्यत्वें मानी ॥११॥
ब्रह्मसंपन्नतेपुढें ॥ पुत्रसुख कायसें बापुढें ॥ हे गुरुकृपा जयासी घडे ॥ त्यासि करी रोकडें ब्रह्मपूर्ण ॥१२॥
जें बोला बुद्धी नतुडे ॥ जें वृत्तीच्या हाता नचढे ॥ तें द्यावया निजनिवाडें ॥ खेवाचें धडपुढें मिस केलें ॥१३॥
हृदया हृदय एक झालें ॥ ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ॥ यापरी न बोलतां बोलें ॥ पूर्णत्व दिधलें प्रजापतीसी ॥१४॥
जेवीं दोन्ही दीप एक होती ॥ तेथें प्रकाशें प्रबळदीप्ती ॥ तेवीं विष्णुविरिंची खेवो देती ॥ प्रबळ चिच्छक्ती कोंदाटे ॥८१५॥
ब्रह्मयाचे नुरेचि ब्रह्मपण ॥ नुरेचि नारायणीं नारायण ॥ कोंदाटलें चैतन्यघन ॥ ब्रह्मा परिपूर्ण ब्रह्म जाला ॥१६॥
तेथें बोधना अबोध ॥ स्वानंद ना निरानंद ॥ गुरुशिष्य जाले एकवद ॥ पूर्ण परमानंद सदोदित ॥१७॥
गुरुशिष्य जाले अभिन्न ॥ खुंटला बोलपडिलें मौन ॥ निःशेष विरालें मीतूंपण ॥ अद्वय आलिंगन ऐसें पडिले ॥१८॥
स्वरूपाचें नवलपण ॥ आंगीं मुरालें ब्रह्मस्फुरण ॥ निःशेष झालें विस्मरण ॥ अव्ययज्ञान पावला विधाता ॥१९॥
यापरी श्रीनारायण ॥ आपुलें देऊनि पूर्णपण ॥ पुधें करावया सृष्टिस्रजन ॥ अकर्तात्मबोधे पूर्ण पबोधिला विरिंची ॥७२०॥
मुख्य बिंबीं नहोतां भिन्न ॥ सूर्यापुधें प्रकाशती किरण ॥ तेवीं न देखोनि वेगळेपण ॥ सुटलें आलिंगन हरिबह्मयांचें ॥२१॥
जळीं जळावरी वसती कल्लोळ ॥ कल्लोळीं असे सबाह्य जळ ॥ तैसा आलिंगन मळ ॥ जाला वेगळ हरिबह्मयांचा ॥२२॥
जेवीं दीपें दीप लाविला ॥ तेथें न कळे वडील धाकुला ॥ तेवीं चिद्रूपें समत्वा आला ॥ हरिरूप जाला प्रजापती ॥२३॥
सृष्टी नकरवे सर्वथा ॥ करितां येईल अहंता ॥ ऐसा ब्रह्मा ह्मणत होता ॥ तोचि यापरी तत्त्वतां अनुग्रहिला देवें ॥२४॥
जो सृष्टि नकरवे ह्मणत होता ॥ तोचि आपुल्या अकर्तात्मता ॥ सृष्टी करावयाची योग्यता ॥ पावला विधाता पूर्णबोधें ॥७२५॥
पुढीं सांठविले बुद्धिबळ ॥ तेचि खेळतां विस्तारिले खेळ ॥ तेवीं पूर्वसृष्टि सकळ ॥ ब्रह्मा तत्काळ विस्तारी स्वयें ॥२६॥
पूर्ण पावोनि समाधान ॥ श्रीनारायणाचे चरण ॥ वंदिता जाला चतुरानन ॥ उल्हासे पूर्ण पूर्णानंदबोधें ॥२७॥
हेकल्पादीची गुह्यज्ञान कथा ॥ येणें ज्ञानसंपन्न जाला विधाता ॥ तेचि कथा ऐकतां आतां ॥ साधका तत्वतां लाभ काय ॥२८॥
सृष्टीपूर्वील कथा जीर्ण ॥ जीर्णपणें वीर्यक्षीण ॥ परीक्षिती तूं ऐसें नह्मण ॥ हे नित्य नूतन टवटवित ॥२९॥
कल्पादीचा हा दिनकर ॥ वृद्धपणें अति जर्जर ॥ याचेनी नलोटे अंधकार ॥ ऐसा विचार मूर्खही नकरी ॥७३०॥
बहुकाळ ठेविला पुरोनि ॥ अग्निहोत्रींचा जुना अग्नि ॥ ह्मणोनी ठेऊं जातां वळचणीं ॥ धडधडी तत्क्षणीं नित्य नूतनत्वें ॥३१॥
तेवीं कल्पादि हें गुह्यज्ञान ॥ गुरुमुखें ऐकतां सावधान ॥ साधक होती ज्ञानसंपन्न ॥ यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३२॥
स्वभुस्वयंभूगुह्यज्ञान ॥ ऐके परीक्षिती सावधान ॥ सुखरूप होइजे आपण ॥ यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३३॥
कथा नित्य नूतन आणि गोड ॥ निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड ॥ साधका नित्य सुरवाड ॥ पुरवी कोड श्रोतयाचे ॥३४॥
ऐसी नित्य नूतन सुखरूपता ॥ हरिस्रष्ट्यांची ज्ञानकथा ॥ हे सृष्टीपूर्वील व्यवस्था ॥ कैसेनी हाता आली पै ॥७३५॥
मी नेणें वेदशास्त्रव्यवस्था ॥ वंशी मूर्ख ह्मणती वस्तुता ॥ त्या मज निजभाग्यें अवचिता ॥ आतुडला हाता गुरु लोष्ट परिस ॥३६॥
परिस सर्वथा कोठें नाहीं ॥ जरी असला येखादे ठायीं ॥ तो काष्ट लोष्ट पाषाण मूर्ख मही ॥ मज जोडला पाही चिद्रत्नाचा ॥३७॥
माझ्या अंगीं मूर्खपण ॥ नेणें मी परिसलक्षण ॥ त्या मज ज्ञानदाता परिपूर्ण ॥ श्रीगुरुचरण जनार्दनाचे ॥३८॥
परिस लोहाचें करी सुवर्ण ॥ परी लोहाचा परिस नव्हे जाण ॥ श्रीजनार्दनाचे चरण ॥ मी पाषाणचि पूर्ण तो मज परिस केला ॥३९॥
ऐसा महानिधि श्रीगुरुजनार्दन ॥ तेणें मज देखोनी अतिदीन ॥ कल्पादीचें गुह्यज्ञान ॥ कृपा करोनी वोपिलें ॥७४०॥
एक चिन्मात्र एका क्षर ॥ उमाशिव हे द्व्यक्षर ॥ विठ्ठल हा त्र्यक्षर ॥ एक पंचषडक्षर द्वादशाक्षर पैं ॥४१॥
माझा मंत्र चतुराक्षर ॥ चतुरचित्तप्रबोधकर ॥ ज्ञानब्धीचा पूर्णचंद्र ॥ आर्तचकोरअमृतांश ॥४२॥
या मंत्राचें एकाक्षर ॥ क्षराक्षरातीत पर ॥ स्वयें क्षरचि अक्षर ॥ तो हा महामंत्र जनार्दन ॥४३॥
स्रष्ट्या उपदेशी नारायण ॥ तोचि मजलागीं झाला जनार्दन ॥ तेणें पूर्ण कृपा करून ॥ अनादिगुह्यज्ञान वोपिलें मज ॥४४॥
मज वोपिलें ह्मणों जातां ॥ जनार्दन मजआंतौता ॥ तोचि ज्ञान तोचि ज्ञाता ॥ यापरी ज्ञानार्था अर्थविलें ग्रंथीं ॥७४५॥
यालागीं श्रीजनार्दन ॥ माझेनि नांवें आपण ॥ करितां होय ग्रंथनिरूपण ॥ तेथें झाडा घ्याया मीपण कैचें आणूं ॥४६॥
आतां तो कर्ता मी अकर्ता ॥ हेंही बोलणें मूर्खता ॥ याही बोला बोलता ॥ जाणता तत्त्वतां जनार्दन ॥४७॥
जनार्दन स्वयें जाण ॥ स्रष्टा अनुग्रहुनी संपूर्ण ॥ अदृश्य होऊं पाहे आपण ॥ तेंचि निरूपण श्रीशुक सांगे ॥४८॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP