चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३६

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ॥ अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यत्सर्वत्र सर्वदा ॥३६॥

॥ टीका ॥
तत्त्वजिज्ञासीं तत्त्वज्ञानें ॥ अन्वयें सर्वत्र मज भजणें ॥ व्यतिरेकें मज जाणणें ॥ अविकारपणें तें ऐक ॥७७॥
सृष्टी आदि मी स्वयंभू असें ॥ सृष्टिरूपें मी स्वयें आभासें ॥ सृष्टीचे निःशेष नाशें ॥ म्यां उरिजे अविनाशें अविकारित्वें ॥७८॥
अन्वय जाणणें जयातें ॥ वस्तूपासोनि तत्वें समस्तें ॥ उपजती तद्रूप निश्चितें ॥ कार्यकारणत्वें अभिन्न ॥७९॥
श्वानारूढ खंडेरावो ॥ सुवर्णाचा करविला पहाहो ॥ तेथें पाहतां श्वान आणि देवो ॥ सुवर्णान्वयें अभिन्न ॥५८०॥
जेवीं तांब्याचा केला नाग ॥ फणा पुच्छ मध्यभाग ॥ पहातां तांबेंचि सर्वांग ॥ तेवीं अन्वयें जग मद्रूप सर्व ॥८१॥
पेरिजे उंसाची पेरीं बरवीं ॥ तें ऊंसपणें विरूढे हिरवीं ॥ काडोकाडीं निजस्वभावीं ॥ वाढती आघवीं ऊंसरूप ॥८२॥
तेवीं वस्तूपासोनियां जाण ॥ माया महत्तत्व चिद्धन ॥ भूतें भौतिकें चिद्रूप पूर्ण ॥ हें अन्वयलक्षण विरंचि ॥८३॥
जेवीं घृताचिया कनिका ॥ घृतेशी नव्हती आणिका ॥ तेवीं भूता आणि भौतिका ॥ वेगळीक देखा मजसी नाहीं ॥८४॥
ऐशिया अन्वयस्थिती ॥ भावे करितां भगवद्भक्ती ॥ मी परमात्मा सर्वबूतीं ॥ भजतां माझी प्राप्ती मद्भक्ता सुगम ॥५८५॥
सर्वभूतीं भगवद्भजन । हें अंतरीचे गुह्य साधन ॥ तो मज पढियंता संपूर्ण ॥ जो भूतें चिद्घन सदा देखे ॥८६॥
जो भूतें देखे चैतन्यघन ॥ त्यासि मी परमात्मा आपण ॥ जिवें करी निंबलोण ॥ त्याहुनि आन मज प्रिय नाहीं ॥८७॥
तो जेउती वास पाहे ॥ तो तो पदार्थ मी होतु जाये ॥ तों जेथें जेथें ठेवी पाये ॥ ते धरा मी होये धरणीधरू ॥८८॥
अन्वयत्थितीच्या भक्तिपरतें ॥ मज आन नाहीं पढियंते ॥ मज वेगळे नदेखे आपणातें ॥ मद्रूप जगातें चिदन्वयें देखे ॥८९॥
नंद यशोदा श्रीकृष्ण ॥ गोकुळें तीं मृत्तिका पूर्ण ॥ तेवीं नामरूपविकारगुण ॥ जगसंपूर्ण चिन्मात्र ॥५९०॥
जें जें तत्त्व उपजे जाण ॥ मायामहतत्त्वादि तिन्हि गुण ॥ तें तें देखिजे चैतन्यघन ॥ अन्वय भजत यानांव ॥९१॥
ऐशियापरी भगवद्भजन ॥ सभाग्य पावती सज्ञान ॥ ते भक्तिलागी मी आपण ॥ श्रीनारायण स्वयें विकलों ॥९२॥
ऐसें निस्सीम ज्यांचे भजन ॥ ते भक्त मजही पूज्य पूर्ण ॥ श्री समवेत मी आपण ॥ त्यांचें श्रीचरण स्वयें वंदी ॥९३॥
माझिया भक्ताची महती ॥ मी स्वये जाणे श्रीपति ॥ कां जे माझिये भक्तीची पूर्ण प्राप्ती ॥ भक्त जाणती भावार्थी ॥९४॥
ऐसिया अन्वयप्रतीतीकरी ॥ भक्तसमावले मजभीतरी ॥ मीही अन्वय आवडीकरी ॥ भक्तसबाह्याभ्यंतरी स्वानंदें नांदे ॥५९५॥
अन्वयें जें अवलोकन ॥ या पदाच्या पोटींभगवद्भजन ॥ स्वयें बोलिला श्रीनारायण ॥ तेंचि म्यां व्याख्यान सविस्तर केलें ॥९६॥
मागां स्वमुखें श्रीपती ॥ बोलिला होता ब्रह्मयाप्रती ॥ सांगसांगेन भगवद्भक्ती ॥ तेचिये श्लोकार्थी विशद केली ॥९७॥
तत्त्वजिज्ञासुलागीं जाण । स्वरूपप्राप्तीचे निजसाधन ॥ देवो बोलिला भगवद्भजन ॥ तेंचि निरूपण म्यां प्रगट केलें ॥९८॥
ऐसिया अन्वयभक्ती ॥ अति सुगम माझी प्राप्ती ॥ आतां व्यतिरेकाची स्थिती ॥ ऐक प्रजापति सांगेन ॥९९॥
कारणा पासोनि कार्य अभिन्न ॥ या नांव अन्वय जाण ॥ कार्य मिथ्या, सत्य कारण ॥ तें व्यतिरेक लक्षण ॥ विधातया ऐक ॥६००॥
दोरा अंगी सर्पाकारू ॥ भासोनि निमाला भयंकरू ॥ तो नातळतां सर्पविकारू ॥ दोरुतो तो दोरू जैसा तैसा ॥१॥
तेवीं जगाची उत्पत्ति स्थिती ॥ लय पावती प्रळयांती ॥ माझिया स्वरूपाप्रती ॥ विकारवदंती असेना ॥२॥
सुवर्णाचे अलंकार ॥ जेवीं करविले नानाप्रकार ॥ मोडूनि करितां एकाकार ॥ निखळ भांगार घडमोडीरहित ॥३॥
तेवीं प्रपंचाची घडमोडी ॥ माझिया स्वरूपी नलगे वोढी ॥ संचली निजानंदगोडी ॥ व्यतिरेक परवडी यानांव विधातया ॥४॥
लेणें घडितां सोनें नघडे ॥ लेणें मोडितां सोनें नमोडे ॥ तेंवीं माझ्या स्वरूपाकडे ॥ नपडे सांकडे प्रपंचाचें ॥६०५॥
स्वरूपीं स्वरूपस्थिती पाहतां ॥ प्रपंच येक झाला होता ॥ तो लया गेला काळसत्तां ॥ हे कथावार्ता असेना ॥६॥
माया महत्तत्त्व तिन्हीगुण ॥ भूतभौतिकादि जन्मनिधन ॥ होतां नमोदे पूर्णपण ॥ हें मुख्य लक्षण व्यतिरेकाचें ॥७॥
आणिकही साधारण ॥ स्थूल व्यतिरेक लक्षण ॥ भूतीं भूतें होती लीन ॥ सकारण तें ऐका ॥८॥
ज्याचें जेथोनि जन्मस्थान ॥ तें भूत तेथें होय लीन ॥ हें महाभूत परी लीन ॥ होय सकारण महाकारणीं ॥९॥
प्रथम गंधु दुसरा स्वादु ॥ रूप स्पर्श पांचवा शब्दु ॥ हा परस्परें उपमर्दु ॥ होय निर्द्वंद्वू कारणामाजीं ॥६१०॥
तें कारनही आपण ॥ महाकारणीं होय लीन ॥ तेव्हां दुजें ना एक पण ॥ स्वरूप परिपूर्ण पूर्णत्वें ॥११॥
त्या परिपूर्ण स्वरूपासी ॥ प्रपंच जडला दिसे अंगेंसी ॥ तों ठाउका नाहीं त्यासी ॥ जेवीं शुक्तिकेसी रजता कारू ॥१२॥
शिंप शिंपपणें असे ॥ भ्रांतासि तेथें रुपें दिसे ॥ तेवीं वस्तुपणें वस्तु असे ॥ प्रपंच भासे जडमूढां ॥१३॥
वस्तू परमानंदें शुद्ध बुद्ध ॥ तेथें अविवेकी अतिमंद ॥ देखती भूतभौतिकादि भेद ॥ जेवीं कां अगाध गंधर्वनगर ॥१४॥
या परी मिथ्या मायिक संसार ॥ वस्तु नित्यानंद निर्विकारा ॥ हा व्यतिरेक शुद्ध सादर ॥ जाण साचार परमेष्ठी ॥६१५॥
प्रपंच एक झाला होता ॥ हे स्वरूपीं मिथ्या वार्ता ॥ पुढें होईल मागुता ॥ हेंही सर्वथा असेना ॥१६॥
ऐसा लक्षितां व्यतिरेक ॥ जगीं मी एकुला एक ॥ या एकपणाचा गणक ॥ नाहीं आणिक गणावया ॥१७॥
आहाचवाहाच विचारितां ॥ हा व्यतिरेक न ये हातां ॥ गुरुकृपेवीण तत्त्वतां ॥ येथिच्या अर्थां प्राप्ती नव्हीजे ॥१८॥
अन्वय माझी पूर्ण भक्ती ॥ व्यतिरेक शुद्ध स्वरूपस्थिती ॥ साधक जेस्वयें साधिती ॥ त्यांसिस्वरूपप्राप्ती अविनाशी ॥१९॥
येणें अन्वयव्यतिरेकें पाहीं ॥ निजात्मता ठेविल्या ठायीं ॥ तिसी प्रयळकाळे कहीं ॥ व्ययो नाहीं विधातया ॥६२०॥
अन्वयव्यतिरेकाचें सूत्र ॥ साधूनि साधक पवित्र ॥ स्वयें जले वस्तु चिन्मात्र ॥ सर्वदा सर्वत्र अविनाश ॥२१॥
एवं अन्वयव्यतिरेकयुक्तें ॥ साधनमहाराजपंथें ॥ विसेरानि विगळेपणातें ॥ मदैक्यातें साधक येती ॥२२॥
‘ ऐक्या येती ’ हें बोलणें ॥ बोलतां दिसे लाजिरवाणें ॥ तें सर्वदां माझेनि पूर्णपणें ॥ परिपूर्ण असणें स्वानंदें ॥२३॥
येणें पूर्ण परमानंदें ॥ जीवभाव स्वयें उपमर्दे ॥ लाजोनियां निमिजे भेदें ॥ स्वानंदबोधें निजयोगी ॥२४॥
सिंधूमाजीं सैधवाचा खडा ॥ पडोनि होय सिंधुएवढा ॥ तेवींचि अन्वयव्यतिरेकें होडा ॥ योगी धडफुडा मीचि होये ॥६२५॥
जैसा कल्लोळ सागरीं ॥ तैसा योगी मजमाझारीं ॥ वर्तताही देहाकारीं ॥ मज बाहेरी रिघों नेणे ॥२६॥
हे ऐक्यतेची योगयुक्ती ॥ वेदशास्त्रा संमती ॥ तुवां अनुष्ठावी सुनिश्रितीं ॥ हें माझें हृद्गती अतिगुह्य ॥२७॥
ऐसें गुह्यज्ञान पुरुषोत्तमें ॥ निष्कामकामकल्पद्रुमें ॥ स्वमुखें सांगिजे आत्मारामें ॥ कृपासंभ्रमें स्वयंभूसी ॥२८॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP