चतुःश्लोकी भागवत - श्लोक ८

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
दिव्यं सहस्राब्धममोघदर्शनोजिता निलात्मा विजितोभयेंद्रियः ॥ अतप्यतस्माखिललोकतापनं तपस्तपीयांस्तपतां समाहितः ॥८॥

॥ टीका ॥
मनुष्याचा जो जाणिजे मास ॥ तो देवांचा एक दिवस ॥ ऐसी संख्या सहस्रवरुष ॥ तपसायास करी ब्रह्मा ॥११५॥
ऐसीं सहस्रवरुषेंवरी ॥ ब्रह्मया कमलासनीं तप करी ॥ त्याच्या तपाची थोरी ॥ व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥
हे आदिकल्पींची जुनाट कथा ॥ होय श्रीव्यासची वक्ता ॥ तेणें आणोनियां वेदार्था ॥ यथार्थ वार्ता निरूपिली ॥१७॥
तीच श्रीशुकें परीक्षिती ॥ निरूपिती कृपामूर्ती ॥ या विंरिचीची तपप्राप्ती ॥ उत्कृष्ट स्थिती अवधारा ॥१८॥
ब्रह्मा कमलासनीं तप करी ॥ नवल त्याचे धारिष्टाची थोरी ॥ नानाइंद्रियविकारी ॥ परी झाला अविकारी निजनिष्ठ ॥१९॥
शमदमाचेनी निजमेळें ॥ जिंतिले मनपवनांचे उल्लाळे ॥ इंद्रियांचे अपार पाळे ॥ तेणें तपोबळें आक्रमिले ॥१२०॥
मन अमन पाहों आदरिलें ॥ तंव तें चंचलत्व विसरलें ॥ चित्तविषयचिंते मुकलें ॥ चित्तीं चिंतलें चैतन्य पैं ॥२१॥
बुद्धीनें दृढबोध धरिला ॥ तेथें अहंकार कापिन्नला ॥ तेणें सोहंभाव बळकावला ॥ तेव्हां प्राण परतला दचकोनी ॥२२॥
देहीं दशधा धांवत होता ॥ तो एकवठुनी आंतौता ॥ धरूनि सोहंचा सांगाता ॥ पश्चिमपंथा चालिला ॥२३॥
यापरी मनपवनांसी ॥ जिंतिलेसें निजनिष्ठेसी ॥ तंव बहिरिंद्रियांसी ॥ द्शा आपैसी बाणली ॥२४॥
डोळ्यां डोळे देखणें झालें ॥ तेणें दृश्याचें देखणें ठेलें ॥ श्रवण अनुहतध्वनी लागले ॥ तंव शब्दा वरिलें निःशब्दें ॥२५॥
स्पर्शें स्पर्शावें जंव देहीं ॥ तंव देहीं देहत्वस्फुरण नाहीं ॥ देहींच प्रकटला विदेही ॥ तेथें स्पर्शें काई स्पर्शावेंपें ॥२६॥
चित्कळा वोळली वोरसें ॥ गोडी रसनेमाजीं प्रवेशे ॥ रसना लाजे विषयतोषें ॥ सर्वांग तेणें रसें अतिगोड ॥२७॥
घ्राणी घेऊं जातां गंधासी ॥ प्राण चालिला पश्चिमेसी ॥ मागें कोण सेवी गंधासी ॥ एवं विषयासी विरक्ति स्पष्ट ॥२८॥
मन इंद्रियद्वारें विषयीं धांवे ॥ त्यासी प्रत्याहार लाविला सवें ॥ यालागीं तें जीवेंभावें ॥ झालें निजस्वभावें निर्विषय ॥२९॥
ज्ञानेंद्रियें जिंकिलीं ऐसीं ॥ तैं कर्मेंद्रियांची स्थिति कैसी ॥ तेंही सांगेन तुजपाशीं ॥ ऐके राजर्षि नृपवर्या ॥३०॥
जेवीं धूर जिंकिलिया रणीं ॥ कटक जिंकिलें तेंचि क्षणीं ॥ तेवीं मनोजयाची बांधावणी ॥ तोचि करणीं सर्व विजय समजे ॥३१॥
विजय बांधावा राजद्वारीं ॥ तंव गुढिया उभविजे घरोघरीं ॥ तेंवीं मनोजयाची थोरी ॥ तेंचि इंद्रियद्वारीं नांदत ॥३२॥
वाचा वदली सत्यासत्य ॥ तिसी रामनामें दिलें प्रायश्चित्त ॥ वाच्यवाचक स्फुरेना तेथ ॥ वाचा स्फुरत तच्छक्ती ॥३३॥
जैं भेटोंनिघे मना मन ॥ तैं हात मोकळे संपूर्ण ॥ तेव्हां क्रियेमाजीं अकर्तेपण ॥ आपुलें आपण हातावरी ॥३४॥
क्रिया रतली चिच्छक्ती ॥ तेणें ज्ञानगम्य चरणांची गती ॥ तेव्हां गमनप्रत्यावृत्ती ॥ समाधान स्थिती आसनस्थ ॥१३५॥
यापरी जिंतूनी चरण ॥ दिव्यसहस्र वरुषें जाण ॥ दृढ घालूनियां आसन ॥ प्राणापान वश्य केले ॥३६॥
मनीं कामाचा अतिसाटोप ॥ तेणें खवळला उटी कंदर्प ॥ तें मन चिंती जें चिद्रूप ॥ तैं कामकंदर्प असतांच नाहीं ॥३७॥
जेथें मन असे इंद्रियें उरलें ॥ तेथें कंदर्पाचें चालोंशकलें ॥ चित्त चिद्रूपध्यानीं गुंतलें ॥ तैं कांही नचले काम कंदर्पाचें ॥३८॥
देखोनी रंभेचा साटोप ॥ शुकापोटीं नुठे कंदर्प ॥ ज्याचे हृदयीं नुठे कामसंकल्प ॥ तो निर्विकल्प सर्वार्थीं ॥३९॥
काम तापसांचा उघड वैरी ॥ मन जिंकोंनेणे त्यातें मारी ॥ जे गुंतलें चिदाकारीं ॥ त्यांचे तोडरीं अनंग रुलत ॥१४०॥
गुदेंद्रियाचा स्वभाव क्षर ॥ तंव ध्यानबळें साचार ॥ क्षरीं प्रगट होय अक्षर ॥ क्षराक्षर नुरवुनी तेथें ॥४१॥
ज्ञानकर्मेंद्रियें दाही ॥ अकरावें मन ते ठायीं ॥ यापरी उभयेंद्रियें पाही ॥ जिंतूनी दूढदेही तो झाला ॥४२॥
अंतरीं निग्रह दृढ केला ॥ शम शब्दें तो वाखाणिला ॥ बाह्येंद्रियां नेम केला ॥ तो दम बोलिला शास्त्रज्ञीं ॥४३॥
हृदयींचेनी विवेकमेळें ॥ वैराग्याचे अनुतापवळें ॥ शमदमाचेनी निखळें ॥ तप प्रांजळें दूढ केलें ॥४४॥
परी तें तप जाहलें कैसें ॥ लोक प्रकाशे निजप्रकाशें ॥ एवढी महिमा आली दशे ॥ त्रैलोक्य भासे त्या तपामाजीं ॥४५॥
ऐसा निष्टेचा निजप्रताप ॥ तेणें तप जाहलें सफळरूप ॥ ब्रह्म अजाहला सत्यसंकल्प ॥ तपवक्त्याचें रूप देखोनियां ॥४६॥
यालागीं सफळदर्शन ॥ विरिंचीचें तें तपाचरण ॥ आचरला निजांगें जाण ॥ ब्रह्मा आपण नेमनिष्ठा ॥४७॥
तपाचे निजनेमेंसी कष्ट ॥ साधिले स्वनिष्ठें चोखट ॥ यालागीं तो अतिश्रेष्ठ ॥ जाहला वरिष्ठ तपस्व्यांमाजीं ॥४८॥
देखावें तपवक्त्याचें रूप ॥ ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प ॥ यालागीं वैकुंठपीठदीप ॥ कृपाळु सत्यसंकल्प स्वरूप दावी ॥४९॥
न होतां गुरुकृपा संपूर्ण ॥ कदा न साधे आत्मज्ञान ॥ त्या गुरुत्वालागीं नारायण ॥ आपुलें आपण स्वरूप दावी ॥५०॥
नसेवितां सद्गुरुचरण ॥ स्रष्ट्यासी नव्हें ब्रह्मज्ञान ॥ त्या गुरुत्वाचें महिमान ॥ श्रीनारायण स्वयेंदावी ॥५१॥
मागें उपदेंशीलें ‘ तप तप ’ ॥ परी प्रत्यक्ष नव्हे सद्गुरुरूप ॥ गुरुकृपा नव्हतां सद्रूप ॥ शिष्याचे विकल्प नतुटती कदा ॥५२॥
संतोषोनी सद्गुरुनाथ ॥ शिष्याचे माथां जों नठेवी हात ॥ तोंवरी नातुडे परमार्थ ॥ हा निश्चितार्थ हरिजाणे ॥५३॥
यालागीं श्रीनारायण ॥ गुरुत्वें आपुलें आपण ॥ शिष्यासी देऊनी दर्शन ॥ स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥
निष्ठें केली तपस्थिती ॥ तेणें झाली सद्गुरुप्राप्ती ॥ आतां गुरुमुखें प्रजापती ॥ आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥१५५॥
जैं पूर्वपुण्याची निष्कामजोडी ॥ तैं सद्गुरुचरण जोडिती जोडी ॥ गुरुचरणीं आवडी गाढी ॥ तै पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥
गुरूच्या ठायीं नीचपण ॥ शिष्यें देखीलें असें जाण ॥ अणुमात्र केलीया हेळण ॥ ब्रह्मज्ञान कदा नुपजे त्या ॥५७॥
गुरूतें पाहतां मनुष्यबुद्धीं ॥ ज्ञान नव्हेगा त्रिशुद्धी ॥ यालागीं कृष्णकृपानिधी ॥ निजवैभवसिद्धि स्रस्ट्यासी दावी ॥५८॥
गुरूचें अगाध महिमान ॥ दावावया श्रीनारायण ॥ जेथें लक्ष्मी करी संमार्जन ॥ तें वैकुंठभुवन स्वयें दावी ॥५९॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP