॥ श्लोक ॥
तस्मै स्वलोकं भगवान्सभाजितः संदर्शयामास परं न यत्परम् ॥ व्यपेतसंक्लेशविमोहसाध्वसं स्वदृष्टविद्भिर्विबुधैरमिष्टुतम् ॥९॥
॥ टीका ॥
तें वैकुंठ जाण साचार ॥ सर्व लोकां वरिष्ठवर ॥ त्यानहून परतें नाहीं पर ॥ यालागीं परात्पर ह्मणतीं त्यातें ॥६०॥
जेथें परमात्मा नांदे स्वयंजोती ॥ त्या वैकुंठाची वैभवस्थिती ॥ वर्णितां खुंटली परेची गती ॥ यालागीं ह्मणती वैकुंठ लोक ॥६१॥
ज्या लोकाचिये ठायीं ॥ क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं ॥ मोहाची वार्ता कांहीं ॥ कोणी स्वप्नींही न देखती ॥६२॥
नित्य देखतां हरीचे पाय ॥ क्षुधातृषा जिरोनी जाय ॥ तेथें मोहक्लेश कैंचा राहे ॥ आनंदें नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥
ज्या वैकुंठाचें नांव घेतां ॥ काळ पळे मागुता ॥ तेथें कैंची भयाची वार्ता ॥ जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥
ज्या लोकाचिये ठायीं ॥ मरणाचें नांव नांहीं ॥ जरा प्रगटे निजदेहीं ॥ हें जन कोणी जाणेचिना ॥१६५॥
ज्या लोकाचें स्तवन ॥ सदाशिव करी आपण ॥ इंद्रादिदेवगण ॥ वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥
मृत्युलोकींचे मुनिगण ॥ पावावया वैकुंठभुवन ॥ अद्यापि करिती अनुष्ठान ॥ भगवद्भजन निजनिष्ठा ॥६७॥
तोचि वैकुंठलोक ॥ पांचश्लोकीं श्रीशुक ॥ वर्णितसे आत्यंतिक ॥ ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥