प्रेंखं श्रिता या कुसुमाकरानुगैर्विगी यमाना प्रियकर्म गायती ॥ ददर्श तत्राखिलसात्वतां पतिं श्रियः पतिं यज्ञपतिं जगत्पतिम् ॥१४॥
॥ टीका ॥
शृंगारवाटिकेमाजी डोल्हारा ॥ लावूनीयां सुवर्णसूत्रा ॥ लक्ष्मी निजभावें निजवरा ॥ नानोपचारा सप्रेमभजे ॥२००॥
शृंगारवाटिकेचेंवन ॥ वसंतें शृंगारिलें संपूर्ण ॥ पराग उधळती पुष्पांतोन ॥ सुवासित पूर्ण वन झालें ॥१॥
मृगमद अत्यंत शीतळ ॥ ढाळीं झळके मलयानीळ ॥ पंचम कूजती कोकिळ ॥ झंकारें अळिकुळ भ्रमती तेथें ॥२॥
कंकुमकेशरकस्तूरीरोळा ॥ एकवटपणें कर्दम केला ॥ सुगंध चंदन उधळला ॥ नाना सुमनमाळा सुवाशित ते ॥३॥
चंद्रकांतीचें शीतळनीर ॥ शुद्ध सुमनांचे विचित्र हार ॥ हंस त्राहाटिले शेजार ॥ त्यावरी अरुवार शतपत्राचें ॥४॥
ऐसी देखोनी शेज मनोहर ॥ संतोषोनी पहुडला श्रीधर ॥ तेथें होल्हारीयाचा दोर ॥ अंतःस्थिर हालवी रमा ॥५॥
येथें हरिगुण चरित्र ॥ शुक बोलती विचित्र ॥ हरिखें कुजताती मयूर ॥ जेवीं कवीश्वर गर्जती नामें ॥६॥
कोकिळांचे पंचमस्वर ॥ जैसें सामगायन गंभीर ॥ मधुर भ्रमरांचें झणत्कार ॥ सारंगधरगुण वर्णिती पैं ॥७॥
ऐसें ऐकतां हरिगुण ॥ रमा झाली स्वानंदें पूर्ण ॥ तेही संतोषोनी आपण ॥ अगाध त्याचे गुप्प गाऊं लागली ॥८॥
ऐकतां हरिनामगुणकीर्ती ॥ ज्यासी उल्हास नुपजे चित्तीं ॥ तो परम अभाग्य त्रिजगतीं ॥ जाण परीक्षिती निश्चित तूं ॥९॥
मी हरीचें निजअर्धांग ॥ ह्मणें परीन देखें अंगसंग ॥ सांग नाहीं ह्मणती श्रीरंग ॥ व्यापुनी सर्वांगे वर्तवी मातें ॥१०॥
माझें लावण्यसमर्थपण गुण ॥ रमा आणि रमारमण ॥ अवघे श्रीहरिनारायण ॥ माझें वर्ते मीपण तयाचेनी ॥११॥
त्यातें मी मानी आपुला कांत ॥ त्म्व मीपण नुरे त्या आंत ॥ मज सबाह्य श्रीभगवंत ॥ असे वर्तत निजानंदें तो ॥१२॥
आतां त्याची कीर्ति गावी कैशीं ॥ तंव वाच्य वाचक हृषीकेशी ॥ या स्थितीकरितां कीर्तनासी ॥ कीर्तिवंतासी निजलाभ होय ॥१३॥
देवा तूं सर्वभूतनिवासी ॥ ह्मणतां भूतमात्रा नातळासी ॥ भूतें भूतात्मा तूंच होसी ॥ नमो हृषीकेशी परमात्मया ॥१४॥
नमो आदिपुरुषा अव्यक्ता ॥ सच्चिदानंदा गुणातीता ॥ विश्वात्मका सदोदिता ॥ नमो अच्युता अव्यया तुज ॥२१५॥
तूं योगीजनां अगोचर ॥ वेदशास्त्रां नकळे पार ॥ भक्तजनासी प्रियकर ॥ दिधला चरणादर निजसेवे त्वां ॥१६॥
हरिचरण सेवेपरता ॥ ठाव नाहीं परमार्था ॥ मिथ्यामोक्षसायुज्यता ॥ हाणती लाता हरिभक्त पैं ॥१७॥
हातीं जोडिल्या हरिचरण ॥ भक्तां नाहीं जन्ममरण ॥ यापरता परमार्थ कोण ॥ अभाग्य जन नमानिती हे ॥१८॥
थिजलेंविरघलें तूप देख ॥ तैसें सगुणनिर्गुण दोन्ही एक ॥ हें स्वयें जाणती हरिसेवक ॥ नेणती नास्तिक वेदबाह्य जे ॥१९॥
सर्वांभूतीं वासुदेव ॥ स्वतःसिद्ध असतां स्वयमेव ॥ हा भेदवाद्यां नुपजे भाव ॥ हृदयस्थ देव दुणविला स्वयें ॥२०॥
भेदवादी अभेदवादी ॥ वंदी अथवा जो का निंदी ॥ तो भगवद्रूपची त्रिशुद्धी ॥ हें सवेंचि विधि अनन्यभक्तां ॥२१॥
भावे हरिभक्ति करितां ॥ भेदी प्रकटे अभेदता ॥ भक्तांसी नित्यमुक्तता ॥ भावें भजतां हरिचरणीं ॥२२॥
ज्ञानाभ्यासी विषय त्यागिती ॥ त्यागिती ते अतिदुःख पावती ॥ भक्त विषय भगवंतीं अर्पिती ॥ तेव्हांचि ते हाती नित्यमुक्त ॥२३॥
ऐसें उल्हासें रमा बोलें पूर्ण ॥ माझा सद्गुरु स्वयें नारायण ॥ त्याचे सेवितां सद्भावें चरण ॥ स्वयें ब्रह्मज्ञान पायां लागे ॥२४॥
यापरी रमा आपण ॥ आनंदें गाय हरीचे गुण ॥ हें ही करावया गुणवर्णन ॥ तो रमारमण वाचा वदवी ॥२५॥
सांडुनिया अहंमती ॥ रमाकरी साकार स्तुती ॥ देव संतोषला निजात्मस्थिती ॥ यालागीं श्रीपती बोलिजे त्यातें ॥२६॥
श्रियेची जे निजस्थिती ॥ तिसी चाळविता निजात्मशक्ती ॥ यालागीं त्यातें श्रीपती ॥ वेदशास्त्रार्थीं बोलिजे ॥२७॥
न भागतां भक्तांची आर्ती ॥ निवारी निजांगें कृपामूर्ती ॥ यालागीं त्यातें सात्वतपती । सज्ञान बोलती सद्भावें पां ॥२८॥
याज्ञिक यागहोम करितां ॥ कल्पनेसारिखें फळदाता ॥ यालागीं यज्ञपति तत्त्वतां ॥ होय बोलता श्रीव्यास ॥२९॥
जग सृजुनी प्रतिपाळिता ॥ शेखीं उदरीं सामावितां ॥ एवढी सत्ता श्रीभगवंता ॥ यालागीं तत्त्वतां जगत्पात होय ॥२३०॥
ऐसा भक्तपती श्रीपती ॥ यज्ञपति आणि जगत्पती ॥ भक्तांसमान वैकुंठपती ॥ देखे प्रजापती टवकारला ॥३१॥
मागें बोलिले भगवद्भक ॥ जे भजनभावें नित्यमुक्त ॥ ते हरिलागीं प्रिय सात्वत ॥ ब्रह्मा देखत पार्षदगण ॥३२॥