चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३१

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


यदंघ्रिकमलद्वंद्व द्वंद्वतापनिवारकं ॥ तारकं भवसिंधौ च श्रीगुरुं प्रणमाम्यहं ॥
श्रीभगवानुवाच ॥
ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं ॥ सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया ॥३१॥

॥ टीका ॥
जो ॐकाराचा तरुवरू ॥ स्वानंदसुखाचा सागरू ॥ सत्यसंकल्प सर्वेश्वरू ॥ तो परात्परु स्वमुखें बोले ॥९१॥
शास्त्रव्युत्पत्ती व्याख्यान ॥ जालिया वेदांत श्रवण ॥ त्यावरी उठी जें जाणपण ॥ त्यानांव ज्ञान शास्त्रोक्त ॥९२॥
विषयवासनेविण ॥ वृत्तीसी जें विवेकस्फुरण ॥ त्यानांव बोलिजे ज्ञान ॥ सत्य जाण स्वयंभू ॥९३॥
चिद्रुपें वृत्तीचें स्फुरण ॥ तें जाणिवें नाकळे ज्ञान ॥ तेंचि स्वयें होइजे आपण ॥ त्यानांव विज्ञान विधातया ॥९४॥
हृदयीं जें आत्मपण ॥ तें स्वयें होईजे आपण ॥ जेथें हरपे देहाचें स्फुरण ॥ तें सत्य विज्ञान विधातया ॥३९५॥
जळीं मेनलिया लवण ॥ सर्वांगें विरे संपूर्ण ॥ जळींचें हारपे क्षारपण ॥ यापरी विज्ञान वस्तुत्वाचें ॥९६॥
देहींचें जाऊनि अहंपण ॥ ‘ ब्रह्माहभस्मि ’ स्फुरे स्फुरण ॥ ते स्फूर्तिही विरे संपूर्ण ॥ त्यानांव विज्ञान पूर्णत्वाचें ॥९७॥
हे पावावया पूर्णप्राप्ती ॥ भावें करावी भगवद्भक्ती ॥ ते भक्तीची निजस्थिती ॥ ऐक तुजप्रती सांगेन ॥९८॥
भगवद्भाव सर्वांभूतीं ॥ यानांव मुख्य माझी भक्ती ॥ हेंचि भजन ज्यासि अनहंकृती ॥ विज्ञानप्राप्ती तैं त्यासी ॥९९॥
हे भक्ती करी जो निजांगें ॥ विज्ञान त्याच्या पायां लागे ॥ ते भक्ती उपजे जेणें योगें ॥ ते भक्तिचि अंगें हरी सांगें ॥४००॥
माझें नाम माझें स्मरण ॥ माझी कथा माझें कीर्तन ॥ माझ्या चरित्रांचें पठण ॥ गुणवर्णन नित्य माझें ॥१॥
माझा जप माझें ध्यान ॥ माझी पूजा माझें स्तवन ॥ नित्य करितां माझें चिंतन ॥ विषयध्यान विसरले ॥२॥
भक्तांचें विषयसेवन ॥ तेंही करिती मदर्पण ॥ यानांव भक्तीचीं अम्गें जाण ॥ स्वयें नारायण विधीसी सांगे ॥३॥
ज्ञान विज्ञान उत्तमभक्ती ॥ सांग सांगेन तुजप्रती ॥ कृपेनें तुष्टला कृपामूर्ती ॥ धन्य प्रजापती निजभाग्यें ॥४॥
जगाचें गुह्य मी आपण ॥ त्या गुह्याचें गुह्य संपूर्ण ॥ पूर्ण गोप्याचें गुप्तधन ॥ तुज मी सांगेन स्वयंभू ॥४०५॥
ऐसें गोप्याचें जे अति गोप्य ॥ कोणा नाहीं सांगितलें अद्याप ॥ माझें निजानंदनिजरूप ॥ तुज मी सुखरूप सांगेन ॥६॥
कृपेनें तुष्टला जनार्दन ॥ जीवीं जीव घालूं पाहे आपण ॥ आकळावया ज्ञान विज्ञान ॥ अनुग्रहपूर्ण आवडी करी ॥७॥
आवडीं सद्गुरुनाथू ॥ ज्म्व मस्तकीं न ठेवी हातू ॥ तोंवरी शिष्याचा निजस्वार्थू ॥ पूर्णपरमार्थू सिद्धी नपवे ॥८॥
यालागीं श्रीनारायण ॥ वरदहस्तें संपूर्ण ॥ अनुग्रही चतुरानन ॥ तेंचि निरूपण श्रीशुक सांगे ॥९॥


References : N/A
Last Updated : July 30, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP